जि. प. शाळा ते IRS अधिकारी
श्री. विष्णू हरिभाऊ औटी, (IRS)
सहायक आयकर आयुक्त,
भारतीय महसूल सेवा, नागपूर.
“तू ना हारीभाऊ, काही पण खूळ डोक्यात घेतो बुवा. आरं आपून शेतकरी मानसं. आपल्या बापजादात कोणाला पाटी कशी धरायची, आणि पुस्तक कसे धरायचे? हे कदी नीट माहित नाही, आपली पोरं कधी साह्यब होणार, ह्ये काय कोणाचं पण काम नाही. ही कामं वाण्याबामनाची. आपली पोरं हि अशीच वाळलेल्या लाकडामागे बैलांची शेपटं मोडीत फिरणार. त्यांना औत कसे हाकायचे? एवढेच कळणार. धर, हि तंबाखू खा, आणि शांत बस बरं जरा उन्हाच्या पारी.” जवळ बसलेला गडी वैतागून नानाला म्हणायचा.
साधारणतः १९८७ साली आमच्या कुंभारवाडीच्या (ता. पारनेर, जि. अहमदनगर) परिसरात दुष्काळामुळे पाझर तलावाचे काम चालू होते, त्यावेळची हि गोष्ट आहे. उन्हात दिवसभर उन्हात काम चालू असायचे. नानाला नीट दिसायचे नाही. काठ फाटलेल्या घमेल्याने त्यांचा पाय नढघीवर चांगला सोलून निघायचा. पायाला फडके बांधून त्यांचे काम तसेच चालू असायचे. पण त्या दिवशी आधीच्या जखमेवर पुन्हा घमेले लागून पायाला चांगली वीतभर जखम झाली होती. पाय चांगला सोलून निघाला होता. दुपारच्या वेळी जेवणाच्या सुट्टीत, सर्व मजूर लोक जवळपासच्या एखाद्या झाडाच्या सावलीत बसलेले असायचे. आम्ही पोरं पण शाळा सुटली कि तिथे नाना, बाई बरोबर जेवण करायला यायचो. जेवलो कि तिथेच लोकांच्या गप्पा ऐकत बसायचो. एके दिवशी जेवण झाल्यावर सोबत असलेल्या गड्याला बोलता बोलता नाना म्हणाले, “काय रं चंदर?
ह्ये एवढे मोठं काम चाललंय, किती पैसा लागत असंल त्यासाठी? ह्या सगळ्यावर लक्ष ठेवणारे, पैसा आणून देणारे साह्यब किती मोठी मानसं ह्येत? असा साह्यब व्हायला काय शिक्शन घ्यावा लागतं? मपलं पोरगं नाय होनार का आसं साह्यब?”
नानाचे हे बोलणे ऐकून तो शेजारचा माणूस खळखळून हसायचा. हरिभाऊने उन्हाच्या पारी आता जेवण झालंय तर गप बसावं, असं त्याला वाटायचं. पण पायाची जखम आणि त्याचे ओघळणारे रक्त पुसताना नाना जणू काही आपल्या नशिबाची आणि काळजाच्या वेदनेची ठसठस पुसत होते. त्यांना आतल्या आत खूप भरून आल्यासारखे वाटत असणार. आपल्या अंधत्वाशी लढता लढता खडका-मातीशी तुफानी झुंज घेणारा माझा बाप त्या दिवशी मात्र या वेदना सहन करताना आतून बाहेरून ढवळून निघाला होता. अशाच तिरीमिरीत दुपारी जेवण झाल्यावर नानानी माझ्या हाताला धरलं आणि “त्ये साह्यब लोकं बसलेत ना, त्या शेडमधी मला घेवून चल,” असं ते मला म्हणाले. मी नानाला हाताला धरून तिथे घेवून गेलो. कामावर देखरेख करणारी मुकादम, कंत्राटदार मंडळी, इतर साहेब लोक यांना बसण्याची सोय एका झाडाच्या सावलीत बांबूच्या चटया बांधून केलेली होती. ऊन खूप तापलेले होते. पायात चप्पल नाही. उन्हामुळे सगळे भेटेल तिथल्या सावलीत तोंड दडवून बसलेले असायचे. कुणी झोपलेले असायचे. आम्ही दोघे तिथे शेडपाशी गेलो. तिथली मंडळी कुणी झोपली होती तर कुणी हळू आवाजात गप्पा मारत बसली होती. शेडच्या दाराशी आम्ही दोघे उभे राहिलो. आतली हवा अगदी मस्त थंडगार वाटायची. इथून हलूच नये, असे वाटत होतं.
त्या साहेब लोकांकडे बोट दाखवून नाना मला म्हणाले, “ह्ये बग, इथं समदे साह्यब लोक बसतात, सगळ्यांना एकदा बघून घे. शाळा शिकलं म्हंजी मानूस आसं साह्यब व्हतं आन त्याला आसं सावलीत बसायला भेटतं, नाहीतर ह्ये माज्या पायाकडं बग आसं व्हतं.” नानानी त्यांच्या पायावरचे बांधलेले कापड मला काढून दाखवले. नानाच्या पायावर चांगल्या मोठ्या रक्ताळलेल्या जखमा होत्या. त्या जखमा पाहून माझ्या काळजात चर्र झाले. दिसत नसल्याने नानाला किती त्रास होतो? नानाच्या डोळ्यांत अखंड वेदनेचा सागर उचंबळत होता आणि मूकपणे मला, “पोरा तू काहीतरी करून दाखव,” असे सांगत होता. मी काही बोलू शकलो नाही. थोडा वेळ थांबून आम्ही दोघे परत मागे फिरलो. गप्प गप्प आम्ही दोघे चालत होतो. पण दोन्ही ह्रद्यांची भाषा मात्र एकमेकांना कळली होती. नानाने इतक्या सहजपणे त्यांची इच्छा, महत्त्वाकांक्षा माझ्या मनात भरवली होती.
आई बापाने जर मोठे ध्येय उरात बाळगले तर ते पोरांमध्ये उतरते. नानाच्या उरात असलेले ते ध्येय हळूहळू मेहनत घेत प्रथम शिक्षक, नंतर एमपीएससी व आता शेवटी यूपीएससी पास होवून एकदाचे पूर्ण झाले. धन्य आहे त्या नानाची आणि बाईची. त्यांचे आपल्या पोराला मोठा साहेब करण्याचे ध्येय पूर्ण करण्याची आणि त्यांचा अनुभवलेला जीवनसंघर्ष मला “नाना मी साह्यब झालो,” या मी लिहिलेल्या आणि युनिक अॅकॅडमी, पुणे यांचेकडून प्रकाशित झालेल्या पुस्तकातून आपणापुढे मांडण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य मानतो.
.
.
“नाना मी साह्यब झालो.” हे पुस्तक युनिक अॅकॅडमीच्या सर्व शाखांमध्ये, सर्व जिल्ह्यांच्या मुख्य पुस्तक दुकानात आणि ऑनलाईन बुकगंगावर उपलब्ध आहे.