राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला त्यांच्या प्रतिमेवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. महात्मा गांधींच्या प्रतिमेची प्रतिकात्मक हत्या करण्याचं कृत्य या विकृतांनी केल्यानंतर अवघ्या देशभरात संतापाची लाट उसळली होती.
सवर्च स्तरातून या घटनेचा मोठ्या प्रमाणावर निषेध नोंदविण्यात आला. हे कृत्य हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी केले होते. त्यांना आता अटक करण्यात आली आहे. नथुराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या केली होती, तोच प्रसंग उभा करण्यासाठी अलीगढमध्ये हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी बापूजींच्या प्रतिमेलाच गोळ्या घातल्या.
एवढेच नाही तर त्यांनी नथुराम गोडसेने गांधीजींना जितक्या गोळ्या घातल्या, तितक्याच म्हणजे तीन गोळ्या घातल्या होत्या. याशिवाय हत्या खरी वाटावी म्हणून विकृतांनी प्रतिमेखाली रक्तही ओतलं होतं. त्यानंतर महात्मा गांधींची प्रतिमा या विकृतांनी पेटवून दिली. ज्या नथुरामने महात्मा गांधींची हत्या केली, त्याचा जयजयकारही यावेळी करण्यात आला होता.
या व्हिडिओमध्ये एका महिलेने हे कृत्य केले होते. तिला आणि तिच्या पतीला आता अटक करण्यात आली आहे.
कोण आहे ती गोळ्या झाडणारी महिला?
गांधीजींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्या त्या महिलेचे नाव पूजा शकुन पांडेय आहे. पूजा ही अखिल भारतीय हिंदू महासभेची राष्ट्रीय सचिव आहे. तिचा पती अशोक पांडेय हा देखील या कृत्यात सहभागी होता. या दोघांना पोलिसांनी दिल्ली-नोएडा सीमेवरील नोएडा सेक्टर 14 A मधून अटक केली आहे.
पूजानेच या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पूजाने अगोदरही अशा प्रकारचे कार्यक्रम केले होते. तिने नथुरामच्या जन्मदिनी मिठाई वाटपाचा कार्यक्रम केला होता.
पोलिसांनी या प्रकरणी ७ जणांना अगोदरच अटक केली होती. पूजा आणि तिचा पती अशोक मात्र फरार झाले होते. दोघांनीही कोर्टात समर्पण याचिका दाखल केली होती. मात्र पोलिसांसमोर येण्याऐवजी दोघांनी पोलिसांना चकवा देत कुंभमेळ्यात आमाव्यस्येला संगमावर स्नान करण्याची घोषणा केली होती.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
Leave a Reply