जगातील ११ सर्वश्रेष्ठ योद्ध्यामध्ये छत्रपती शिवराय एक अद्वितीय पुरुष सर्वश्रेष्ठ का ?

हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना अलेक्झांडर ते नेपोलियनपर्यंतच्या अकरा जागतिक योद्ध्यांशी करून छत्रपती शिवराय हे विविध पैलूंनी आणि उदाहरणांवरून एक अद्वितीय पुरुष असल्याचा संशोधनात्मक निष्कर्ष जागतिक इतिहासावर प्रदीर्घ अभ्यासानंतर डॉ. हेमंतराजे गायकवाड यांनी इंग्रजी आणि मराठीत मांडला आहे.यावर विविध देशांमध्ये इतिहास अभ्यासकांमध्ये नव्याने चर्चा सुरू झाली असून त्यावरील भाष्य,

दिल्लीच्या मोगल घराण्याचा सहावा बादशहा औरंगजेब,फ्रेंचच्या क्रांतिकारकांचा नेता नेपोलियन,स्कॉटलंडचा कट्टर देशभक्त, लढाऊ विलियम वॉलस्,रोमचा साम्राज्याचा सामर्थ्यशाली ज्युलिअस सीझर, रोमन सैन्यांतील गुलामांचा नेता स्पाटीकस,वयाच्या २७व्या वर्षी कार्थेजचा सेनापती झालेला हानीबाल, फ्रान्सचा आंदोलक रिचर्ड द लायन हार्ट, अचूक लक्षवेधांसाठी प्रसिद्ध असलेला ‘हून’चा ऍटिला,स्वीडीश साम्राज्याचा महाशक्तीशाली ऍडॉल्फस गस्टावस, मंगोलियाचा कत्तलकिंग चिंगीझ खान आणि मॅसिडोनियाचा जगप्रसिद्ध सम्राट सेनानायक अलेक्झांडर द ग्रेट या अकरा जागतिक स्तरावरील योद्ध्यांमध्ये वस्तुनिष्ठ कसोट्यांवर पारखून पाहता आपले शिवाजी महाराज शंभर नंबरी सोने आहे. शिवाय इतिहासाच्या दालनात लखलखणारा चौसष्टपैलूंचा स्वयंप्रकाशी हीरा आहे. कोणत्याही दोन ऐतिहासिक व्यक्तींची तुलना हुबेहूब जुळणे शक्य नाही. तथापि, अशा तुलनेपासून वर्ण्य व्यक्ती मनात ठसण्यास मदत होते. शिवाजी महाराज अनेक बाबतींत लोकोत्तर पुरुष होऊन गेले. त्यांनी आपल्या राष्ट्राचे गुणावगुण बरोबर ओळखून लोकांचा स्वाभिमान जागृत केला आणि त्यांची एकी करून त्यांस नानाविध पराक्रम करण्यास उद्युक्त केले. शिवाजींपेक्षा जास्त पराक्रम गाजविणारे किंवा जास्त देश जिंकून त्यांच्यावर राज्यकरणारे पुरुष इतिहासात पुष्कळ आढळतील. पण त्यांच्याइतका गुणसमुच्चय एका व्यक्तींत एकत्रित झालेला सहसा आढळत नाही. फार काय शिवाजी महाराजांत अमुक एक दोष दाखवा असा प्रश्न कोणी केल्यास आपणास बहुधा निरुत्तर व्हावे लागते. या सर्वांमध्ये साम्य बरेच आहे. निष्ठा व कल्पक बुद्धी, लोकांवर छाप बसविण्याची विलक्षण हातोटी,राष्ट्र उर्जितावस्थेत आणण्याची अनावर उत्कंठा इत्यादी महान पुरुषांस अवश्यमेव लागणारे गुण सर्वांमध्ये बसत होते.

द्वंद्व : अलेक्झांडर, सीझर, हानीबाल, ऍटिला, रिचर्ड, चिंगीझ खान, ऍडाल्फस, अकबर, औरंगजेब व नेपोलियनया सर्वांनी आपल्या बलाढ्य व शक्तिशाली सैन्यांच्या आधारावर घनघोर युद्धे केली. पण यापैकी कुणीही शिवाजी महाराजांनीअफझलखानाविरुद्ध जसे द्वंद्व युद्ध केले तसे ‘वन टू वन’ (द्वंद्व) केले नाही. इतिहासाचा अभ्यास केल्यावर असे लक्षातयेते की बहुधा सर्व राजे-महाराजे हत्तींवर आरुढ होऊन रणांगणापासून दूर एखाद्या टेकडीवरून युद्धाची पाहणी करीतअसत. रणांगणातील रक्ताचे शिंतोडेसुद्धा काहींच्या अंगावर कधीही उडाले नाहीत.

थर्मोपिली : अलेक्झांडर, सीझर, हानीबाल,ऍटिला, रिचर्ड, चिंगीझ खान, ऍडाल्फस, अकबर, औरंगजेब व नेपोलियन यांनी युद्धांमध्ये भाग घेतला. रणांगणांतील घनघोर युद्धांचे यश हत्ती, घोडे, उंट, तोफा, बंदुकी, सैन्यसंख्या, सेनापतींची रणनीती इत्यादी बाबींवर अवलंबूनअसते. सर्व युद्धांमध्ये एक सारखेपणा पाहायला मिळतो. तुलनेने प्रचंड सैनिकी संख्याबळ व श्रेष्ठ दर्जाची युद्धसामग्री यांचा नेहमी विजय होत असतो. क्वचित सेनापतींची युद्धनीती व सैन्यांचे मनोबल युद्धाचे पारडे भारी करू शकतात. पण भूप्रदेशाचे ज्ञान कसे बाजी मारू शकते हे लिओनिडासने पहिल्यांदाच जगाला थर्मोपिलीच्या युद्धात दाखवून दिले. हेच धोरण स्वतंत्रपणे बाजीप्रभूने घोडखिंडीत अवलंबिले व शिवाजी महाराज आणि स्वराज्यासाठी आपले रक्त सांडून ती खिंड पावन केली. थर्मोपिलीसारखी लढाई कोणत्याही योद्ध्याने केली नाही. फक्त शिवाजी महाराजांनी केली.

स्मारके : अलेक्झांडर, सीझर, हानीबाल, ऍटिला, रिचर्ड, चिंगीझ खान, ऍडाल्फस, अकबर, औरंगजेब व नेपोलियन या सर्वांनी नवी शहरे, मशिदी व महाल स्वत:च्या गौरवासाठी उभारले.याउलट शिवाजी महाराजांना असे करण्याची अमाप संधी होती. पण त्यांनी स्वत:च्या नावाने शहर किंवा किल्ला बांधला नाही. तसेच त्यांनी कोणत्याही शूर मावळ्याचे नाव एखाद्या वास्तूलासुद्धा दिले नाही. कारण शिवाजी महाराजांच्या दृष्टीत सर्व मावळे समान पराक्रमी होते.
सरेआम कत्तल : अलेक्झांडर, सीझर, हानीबाल, ऍटिला, रिचर्ड, चिंगीझ खान, अकबर, औरंगजेब या सर्वांनी सरेआम कत्तल केली. चिंगीझ खानाने ग्रेन्चच्या युद्धात जगातील सर्वात जास्त बिनयांत्रिक कत्तल केली. ऍटिलाच्या क्रौर्यामुळे त्याला ‘स्कर्ज ऑफ गॉड’ (देवाचा चाबूक) म्हटले जात असे. याच्याविरुद्ध आपण सुरतेच्या मोहिमेत पाहिले आहे की, अगदी तीव्रपणे डिवचले गेल्यावरसुद्धा शिवाजी महाराजांनी आपला तोल सुटू दिला नाही व सरेआम कत्तलीची घोषणा केली नाही. म्हणूनच इतिहास त्यांना ‘जिनावा संकेत’चे जनक म्हणू शकतो.

कैद : या योद्ध्यांपैकी फक्त चिंगीझ खान, रिचर्ड व सीझरला कैद झाली. चिंगीझ खान त्या वेळेस फार लहान होता व त्याने पाच वर्षांची कैद मुकाट्याने भोगली. रिचर्ड व सीझरने रीतसर खंडणी देऊन स्वत:ची सुटका करू घेतली. वॉलसलाही फितुरीने पकडले गेले व देशद्रोहाच्या आरोपावरून मृत्युदंड दिला गेला. शिवाजी महाराज हे एकुलते एक योद्धे आहेत ज्यांना आमंत्रण देऊन त्यांना आग्य्राला बोलावले गेले व सन्मानाऐवजी नंतर कैद फर्माविली गेली. ते स्वत: तर निसटलेच पण त्यांचे १५०० साथीदारसुद्धा सुरक्षितपणे मायदेशी परतले. हे पलायन जगातील सर्वात धक्कादायक पलायन आहे. नेपोलिअनला दोन वेळा कैद झाली. पहिल्यांदा तो एल्बाहून निसटला. पण सेंट हेेलेनामधून तो निसटू शकला नाही व तेथेचत्याचा मृत्यू झाला.

बंड : शिवाजी महाराजांविरुद्ध कधीही बंड झाले नाही. त्यांनी स्वराज्याची ज्योत अशा प्रकारे प्रज्ज्वलित केली होती की ते आग्य्रााच्या नजरकैदेत असतानासुद्धा स्वराज्यातील एकही सरदार फितूर झाला नाही.

नवीन युद्धनीती : सर्व योद्ध्यांनी संपूर्ण समाजाची सुधारणा करून स्वतंत्र आरमाराची स्थापना करण्यासारखे कार्य केले नाही. ते शिवाजी महाराजांनी केले. त्याच तोडीचे नसले तरी तसे एक कार्य म्हणजे हानीबालने आल्पसच्या बर्फाच्छादित शिखरांवरून आपले गजदल इटलीत उतरविले. ‘गनिमी कावा’ या युद्धनीतीचे श्रेय जग महाराजांना देते. ‘शिवाजी महाराज हे सार्वकालीन सर्वश्रेष्ठ राज्यकर्ते होते’, या मताशी सारेजण सहमत असतील. तसेच ‘शिवाजी महाराज हे व्यक्ती म्हणूनसुद्धा आजपर्यंतच्या ज्ञातमानवी इतिहासातील सर्वश्रेष्ठ मानव आहेत’ हे महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापनही उभं जग, संशोधक, अभ्यासक मान्य करतील.

साभार:- इतिहास अभ्यासक संशोधक डॉक्टर केदार फाळके
शिवभक्त शिवशक्ती तालीम . शिवशक्ती प्रतिष्ठान महाराष्ट्र . जय हिंद जय शिवराय जय शिवशक्ती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.