पाकिस्तानने आपल्या गजनवी या बॅलेस्टिक मिसाईलचे यशस्वी चाचणी केली असल्याची माहिती पाकिस्तानी सैन्याचे अधिकृत प्रवक्ता मेजर जनरल आसिफ गफूर यांनी २९ ऑगस्ट रोजी ट्विटरवरून दिली.
ही बातमी बाहेर येताच पाकिस्तानद्वारे त्यांची एअरस्पेस बंद करण्याशी या बातमीचे यमक जुळवले. तसं मिसाईल लाँच होण्याचा एअरस्पेस बंद होण्याशी काय संबंध असतो ते अद्याप समजले नाही.
भारतीय विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी सांगितले की या बातमीने आम्हाला धक्का बसला नाही, कारण याबद्दल सरकारला आधीच माहित होते. बॅलेस्टिक मिसाईलच्या संबंधित करारानुसार हे झालं आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात इस्लामाबादमध्ये ३ ऑक्टोबर २००५ रोजी एक करार झाला होता.
Agreement on pre notification of flight testing of ballistic missiles या करारानुसार भारत आणि पाकिस्तान आपापल्या बॅलेस्टिक मिसाईल चाचणीपूर्वी एकमेकांना सूचना देतात. इतर वेळी भारत आणि पाकिस्तान एकमेकांची जिरवायच्या मागे लागलेला असतो, मग या मिसाईल चाचणीच्या वेळी एकमेकांना का सांगतात ? त्यासाठी आधी बॅलिस्टिक मिसाईल काय चीज आहे ते समजून घ्यावं लागेल.
मिसाईल काय असते ?
तोफेने गोळे चालवण्याची एक सीमा असते. ठराविक अंतरापलीकडे ती तोफ काही करू शकत नाही. तेव्हा मिसाईलचा उपयोग होतो. मिसाईल म्हणजे स्वतः बॉम्ब नसते, ते एक वाहन असते ज्यावर बॉम्ब ठेवलेला असतो.
मिसाईलचे काम असते बॉम्बला अपेक्षित ठिकाणी पोहोचवणे. जलद पोहोचवणे आणि असे पोहोचवणे की कुणाला खबर लागत कामा नये. या मिसाईल पन्नासेक प्रकारच्या असतात पण या सर्वात खतरनाक असते ती बॅलेस्टिक मिसाईल !
बॅलेस्टिक मिसाईल : जिला सगळेच घाबरतात
बॅलेस्टिक मिसाईल अशी मिसाईल असते, ज्यात लावलेले रॉकेट बॉम्बला अत्यंत कमी काळात खूप उंचावर घेऊन जाते आणि नंतर बंद होते. त्यानंतर मिसाईल आपल्या वजनाने खाली येते. पण खाली येताना तिचा वेग फारच वाढलेला असतो. त्यामुळे शत्रूच्या रडारवर ती सापडणे अवघड असते. कित्येकदा शत्रूला मिसाईल त्याच्याकडे येतेय हेच माहित नसते. छोटी आणि हलकी असल्यामुळे त्यात छोट्या इंजिन आणि कमी इंधन लागते.
भारत आणि पाकिस्तान एकमेकांना का देतात मिसाईल चाचणीची पूर्वसूचना ?
भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांकडे बॅलेस्टिक मिसाईल आहे आणि दोघे नवीन मिसाईल बनवण्यावर काम करत आहेत. त्यासाठी अनेकदा चाचण्या घ्याव्या लागतात. परंतु बॅलेस्टिक मिसाईलचा धोका पाहता, एखादा देश त्याची चाचणी करत असताना असताना दुसऱ्या देशाला ती चाचणी म्हणजे आपल्यावरील हल्लाच आहे असे वाटू शकते.
गैरसमजातून दोन्ही देशांकडून क्षेपणास्त्रे डागली जाऊ शकतात. या धोक्यापासून वाचण्यासाठी ३ ऑक्टोबर २००५ रोजी एक करार झाला. त्यानुसार दोन्ही देश मिसाईल चाचणीबद्दल आधी एकमेकांना पूर्वसूचना देतील असे ठवण्यात आले.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.