विश्वास नागरे पाटलांचा संघर्र्षमय प्रवास
‘पहेलवानाचा तू मुलगा, गुंडच होणार.’ हे शब्द अवघ्या सहाव्या इयत्तेत असणा-या ‘विश्वास’ नावाच्या मुलाला खुपले. ‘मला शाळेतल्या बाईंनी असं ऐकवलं. आता आपण काहीतरी करून दाखवायचं, स्वत:ची ओळख निर्माण करायची’ या जिद्दीने, आयुष्याची प्रत्येक पायरी धाडस आणि कष्टाने पार करणारा लहानपणीचा खोडकर मुलगा आज अवघ्या तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनला आहे.
खाकी वर्दीवरील जनतेचा विश्वास कायम राहण्यासाठी आज हा ‘विश्वास’ जीवाचे रान करत आहे. ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या विश्वास नांगरे-पाटील यांनी १९९७ ला कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातून इतिहास विषयातून ‘बी.ए’ पूर्ण केले. नंतर मुंबईत येऊन आयपीएस केले. लातूर आणि नांदेडला पोलिस अधीक्षक म्हणून काम करीत असतानाच विश्वास नांगरे-पाटील यांनी एम.ए. पूर्ण केले. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी एकाचवेळी उपजिल्हाधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि आयपीएस अशी तीन पदे मिळवणारे विश्वास नांगरे-पाटील हे एकमेव अधिकारी ठरले..
लातूर आणि नांदेडबरोबरच विश्वास नांगरे-पाटील यांनी ठाणे ग्रामीण भागात पोलिस अधीक्षक म्हणून काम करताना आपला वेगळा ठसा निर्माण केला. सध्या मुंबई पश्चिम विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त म्हणून नांगरे-पाटील जबाबदारी सांभाळत आहेत.
विश्वास नांगरे-पाटील हे नाव घेतले की, नजरेसमोर उभे राहते ते ‘२६/११’च्या ताज हॉटेलवरील दहशतवादी हल्ल्याचे चित्र. ‘ताज’मध्ये दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता आणि जीवाची पर्वा न करता नांगरे-पाटील आपल्या सहका-यांसह सर्वप्रथम ‘ताज’कडे सरसावले. ‘लिओपोल्ड’वर हल्ला करून दोन दहशतवादी ज्या मार्गाने ‘ताज’मध्ये घुसले होते, त्यांच्यापाठोपाठ घुसण्याची हिंमत नांगरे-पाटील यांच्या पथकाने दाखवली.
दहशवाद्यांच्या अत्याधुनिक शस्त्रांनाही न जुमानता नांगरे-पाटील पुढे सरसावत राहिले. ‘ताज’च्या तांत्रिक विभागात धाडसाने पोहोचून त्यांनी तेथील सीसीटीव्हीवरील फुटेजवरून आपल्या वरिष्ठ अधिका-यांना दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती पुरवली. पोलिस आणि इतर जवानांच्या मोठया पराक्रमाने दहशतवाद्यांचे मनसुबे उधळण्यात आले.
या थरारक ‘लढाई’त विश्वास नांगरे-पाटील हे नाव चांगलेच गाजले. ‘२६/११च्या हल्ल्याप्रसंगी मला माझ्या पत्नी आणि मुलांपेक्षाही दहशतवाद्यांचा मुकाबला करणे महत्त्वाचे वाटले. मी कारण निवडले आणि पुढे सरसावलो,’ असे विश्वास नांगरे-पाटील सांगतात. पोलिस अधिकारी म्हणून चोख कामगिरी बजावणा-या खाकी वर्दीतील या आदर्शवत पोलिस अधिका-यात एक ‘माणूस’ही दडला आहे.
सामाजिक जाणिवेतून जगणारे आणि तशा पद्धतीने प्रत्येक नागरिकांनी जगावं, यासाठी आग्रही असणारे विश्वास नांगरे-पाटील पर्यावरणप्रेमीही तेवढेच आहेत. विविध वृक्षारोपण उपक्रमांतून त्यांनी आपल्या पर्यावरणावरील प्रेमाची भूक भागवण्याचा प्रयत्न कायम करत असतात. सर्वसामान्य तरुणांबरोबरच पोलिस दलातील कर्मचा-यांमध्येही विश्वास नांगरे-पाटील ‘लाडके’ पोलिस अधिकारी म्हणून ओळखले जातात.
पारध्यांशी सामना करताना शहीद झालेल्या अंकुश धावडे या पोलिस कर्मचा-याच्या नावाने सुरू केलेली जिम्नॅशियम, सततच्या दगदगीत कुटुंबापासून दूर असणा-या ‘पोलिस’ नावाच्या माणसालाही थोडंसं कुटुंबासाठी जगता यावं, म्हणून नांगरे-पाटील यांनी पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी सुरू केलेली ‘सहल योजना’ अशी अनेक उदाहरणे देता येतील.
तरुणांमध्ये विश्वास नांगरे-पाटील नावाचे एक आकर्षण निर्माण झाले आहे. ‘मला सत्यासाठी संघर्ष करायचाय, त्यासाठी माझी नरकात जायचीही तयारी आहे, पण हे करताना ‘कारण’ स्वर्गीय असले पाहिजे,’ असे म्हणणारे विश्वास नांगरे-पाटील एक आगळी-वेगळी ‘स्फूर्ती’च म्हणावी लागेल. प्रत्येक तरुणाला आज ‘विश्वास नांगरे-पाटील’ व्हावंसं वाटतं!
Comments 1