राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी काल (ता. १४) दिल्लीमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्यातील इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीला मागील काही दिवसांपासून सोडून जाणाऱ्यांची संख्या वाढली असताना बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यात उदयनराजेंच्या भाजप प्रवेश हा मोठा धक्का मानला जात आहे.
उदयनराजे यांच्या भाजपप्रवेशानंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. उदयनराजेंनी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उदयनराजेंवर टीका केली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उदयनराजेंवर घणाघाती टीका केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक जमिनी विकण्याकरीता परवानगी मिळावी म्हणून उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. जमिनी विकण्यासाठी उदयनराजे यांना परवानगी देण्याचे आमिष भाजपने दाखवले असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रयत्न हाणून पाडेल, असा इशाराही मलिक यांनी दिला.
शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा अबाधित राहिला पाहिजे. त्याला जर कोणी धक्का लावत असेल तर जनतेला सोबत घेऊन आम्ही कडाडून विरोध करू. सातारा किंवा अन्य कोणत्याही संस्थानांतील जमिनी कायद्याने विकता येत नाहीत. स्वत:साठी वापरता येत नाहीत. भाजप सरकार या जागा विकण्याच्या आमिषापोटी राजे, संस्थानिकांना भाजपमध्ये आणत आहेत.
यावेळी नवाब मलिक यांनी उदयनराजेंचा १९९९ ला विधानसभेला केलेल्या पराभवाची पण आठवण करून दिली. उदयनराजे हे त्यांच्या आईच्या माध्यमातून साहेबांना भेटले आणि राष्ट्रवादीत आले. त्यांना राष्ट्रवादीने ३ वेळा खासदारकीची संधी दिली.
त्यांना स्थानिक नेत्यांनी अनेकदा कडाडून विरोध केला तरीही पवार साहेब त्यांच्या पाठीशी राहिले. निवडणुका जवळ आल्या की, ते पुन्हा आईच्या माध्यमातून पवार साहेबांना भेटायचे. तिकीट मिळवायचे आणि पुन्हा निवडून यायचे अशी टीका मलिक यांनी केली.
साताऱ्यात उदयनराजेंना असू शकते यांचे आव्हान-
उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आता साताऱ्यात लोकसभेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीत उदयनराजेंना मोठं आव्हान असणार आहे. कारण साताऱ्यात राष्ट्रवादीची स्थिती अजूनही चांगली असून शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग येथे आहे.
साताऱ्यात राष्ट्रवादीकडे श्रीनिवास पाटील, शशिकांत शिंदे यांच्यासारखे तगडे उमेदवार आहेत. राष्ट्रवादीने हि जागा काँग्रेसला सोडली तर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देखील उदयनराजेंना मोठं आव्हान देऊ शकतात.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.