महाराज !!!
उदयन महाराज !!!
बस्स! नाम ही काफी है !!!
मला आवडणाऱ्या मोजक्याच असामान्य व्यक्ती मधील अतिशय प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणचे उदयनराजे…
सहा फूट उंच आणि भारदस्त शरीरयष्टी.. धीर-गंभीर चेहरा (वेळप्रसंगी मिश्किल हास्य) .. उदयनराजेंचं व्यक्तिमत्त्व खरोखरच राजेशाही आहे. एकदम ‘ब्ल्यू ब्लडेड प्रिन्स’! त्यांच्या चालण्या-बोलण्यात राजाची बेफिकिरी, निडरता क्षणाक्षणाला जाणवते.. धारदार नाक आणि रोखून बघणारे त्यांचे डोळे अनेकदा समोरच्याला घामच फोडतात.. महाराजांची चाल ही अगदी तशीच बिनधास्त पण भारदस्त…
गोष्टींच्या पुस्तकातील सर्वोत्तम शूर राजाच वर्णन उदयन महाराजांना चपलख लागू होत..
उदयन महाराजांबद्दल प्रेम, आपुलकी, कुतूहल, भीती, आदर, उत्सुकता, अभिमान, गर्व, रसिकता, शूरता सगळ्याच भावांच मिश्रण होते.. इतकी अजब Personality!! वरती कुर्ता किंवा फॉर्मल शर्ट , खाली जीन्स पॅन्ट आणि पायात तेजदार कोल्हापुरी.. अशी त्यांची राहणी साधी पण सर्वांनाच आकर्षित करणारी असते..
सातारा गादीचे हे वारसदार… जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज.. खरच जाणते.. आपल्या साताऱ्यातील जलमंदिर वाड्यात अश्या कित्येक अडचणी त्यांनी न्यायाने सोडवल्यात.. सामान्यांना न्याय मिळणारी हक्काची जागा म्हणजे साताऱ्यातील जलमंदिर राजवाडा.. भव्य, आलिशान, शानदार ; राजाचाच वाडा शेवटी तो.. पण कायमच सामान्यांच्या हाकेला वाड्यानी प्रतिसाद दिला, हे सातारकर खुल्या दिलाने मान्य करतात.. राजमाता कल्पनाराजे व महाराज उदयनराजे यांचा न्याय अंतिम मानला जातो.. तो सत्याचाच असतो.. हे तिथली जनताच न कचरता कबूल करते..
आजच्या युगात कसले महाराज नि कसले काय? असे म्हणणारी माझी तरुण पिढी सुद्धा राजांवर जीव ओवाळून टाकायला तयार होते.. का? पण का?
माझं मन याच शोध घेऊ लागते… मी जमेल तिथे उदयन महाराज वाचायला लागतो.. माणसांच्या मनात, वर्तमानपत्राच्या पोटात, गुगलच्या पेटार्यात..जमेल तिथे..आणि मग कळायला लागत महाराजांना सगळेच जाती-धर्माचे आपलं का मानतात?
रात्री रस्त्याने जाणाऱ्या एकट्या आजीला पाहून आपल्या आलिशान गाडीतून उतरून आजीची विचारपूस करणारा ; इतकंच नाही तर आपली गाडी आजीला सोडवायला पाठवून स्वतः चालत जाणारा हा माणूस म्हणजे उदयन महाराज… आपल्या एका कर्मचाऱ्याने नवीन आणलेली स्कुटी घेऊन त्याच्या आग्रहाखातर आपली सोन्याची बुलेट सोडून रपेट मारणार हा साधा व प्रेमळ माणूस म्हणजे उदयन महाराज.. कष्टकरी लोकांमध्ये जमिनीवर बसून त्यांची चटणी भाकरी खाणारा राजा म्हणजे उदयन महाराज.. गाडीच्या बोनेट वर बसून लोकांमध्ये बिनधास्त गप्पा मारत बसणारा आपला माणूस म्हणजे उदयन महाराज… स्वतःच्या नावावरची 36,000 एकर जमीन लोकांना विना रुपया कसायला देणार दिलदार माणूस म्हणजे उदयनराजे.. प्रतापगड सारखा मोठा किल्ला , शिखर-शिंगणापूर मंदिर संस्थांना सह अनेक वास्तूंचा मालक असूनही सामान्यांमध्ये रमणारा असामान्य राजा म्हणजे उदयन महाराज.. स्वतः विरुद्धच्या मोर्चात सर्वात पुढे सहभागी होऊन त्याच मोर्चात चालणार वाघ म्हणजे उदयन महाराज..
अपंग-गरिबांना रोजी-रोटी देणाऱ्या स्टॉल वर हातोडा घालणाऱ्या JCB समोर उभा राहून प्रशासनाला जाग्यावर आणणारा जाणता राजा म्हणजे उदयन महाराज… रमजानला आपल्या मुस्लीम कर्मचाऱ्यांच्या- नागरिकांच्या घरी जाऊन आनंदात सहभागी होणारा दिलदर्या माणूस म्हणजे छत्रपती उदयन महाराज… संसदेत अस्सलखीत इंग्रजीत भाषण करणारा हा इंजिनियर राजा म्हणजे उदयन महाराज… फॉर्म्युला वन मध्ये भाग घेण्याची पात्रता असणारा तुफान-वेगवान चालक म्हणजे उदयन महाराज.. कराटे सहित घोडे सवारीत सुद्धा तरबेज असणारा चौरंगी हिरा म्हणजे उदयन महाराज… दिलेल्या शब्दाला जागून प्रश्न मार्गीच लावणारा नेता म्हणजे उदयन महाराज… परखड-स्पष्ट मते ; तीही आपल्या स्टाईल मध्ये बिनधास्तपणे जाहीर करणारा खमक्या नेता म्हणजे उदयन महाराज .
अजून काय नि किती गोष्टी, किस्से महाराजांबद्दल भरभरून बोलू लागले.. अगणित..अनंत..
असंच अनासाये महाराजांना एकदा भेटायचा प्रसंग आला.. जुन्या पेन्शन संघटनच्या कामानिम्मित मी मंत्रालयात एका मोठ्या कॅबिनेट मंत्र्यांच्या केबिनमध्ये बसलो होतो.. ते मंत्री विशेष बैठकीसाठी त्यांच्या आतल्या चेंबर मध्ये बसले होते.. बाहेरच्या मुख्य केबिनमध्ये आमच्या सोबत काही मंत्री,आमदार देखील वाट पाहत बसलेले. अशी पंधरा एक मिनिटे गेली असतील.. शांततेला भंग करत मुख्य केबीनचा दरवाजा करकर आवाज करत उघडला गेला त्यातून एक धिप्पाड माणूस आत आला.. त्याच्या मागे सुद्धा तसेच बलदंड 3-4 जण होते.. कोल्हापुरीचा कर-कर आवाज करत रुबाबात हा माणूस त्या विशेष चेंबरचा दरवाजा ढकलत दरवाजवळील रक्षकाला “कोण आहे रे आत” असं खमक्या आवाजात विचारत तडक आत घुसला..
त्यावेळी प्रतीक्षेत बसलेल्या VIP च्या तोंडावरील Reaction च बोलत होती “राजा आहे , तो थोडी थांबेल..” . पुढच्या काही ५-७ मिनिटात आपले काम पूर्ण करून हा माणूस बाहेर आलाही.. आणि बाकी अजूनही प्रतीक्षेतच .. मी या माणसाकडे पाहतच बसलो.. इतकी जरब, दरारा नि बिनधास्तपणा मी पहिल्यांदाच पाहत होतो… तो निडर माणूस म्हणजे उदयन महाराज.. थेट काम..थेट बोलणं..नि थेट वागणं…
महाराजांबद्दल अनेक अफवा, नकारात्मक बातम्या कानावर आल्या.. पण महाराजांना वयक्तिक आयुष्य आहे, हेही आपण जाणीवपूर्वक विसरतो की काय कोण जाणे.. महाराज साहेबांची कामं करायची पद्धत चांगली की वाईट, यावर मतभेद होऊ शकतात, पण ‘महाराज साहेब कुणालाच नाही म्हणत नाहीत, प्रत्येकाचं काम करतात,’ असं सातार्यातील अनेकजण सांगतात. स्वत:च्या अनुभवावरून… मग त्यांच्या वयक्तिक बाबी (त्याही खऱ्या किती नि खोट्या किती) आपल्याचिनपाट तोंडाने चघळणे कितपत योग्य आहे याचा विचार जरूर व्हावा… काहीही असो, एक मात्र नक्की हा माणूस अफलातून नि एकमेवाद्वितीयच आहे… तरुणांच्या गळ्यातल्या ह्या शक्तिमान ताईताला मानाचा मुजरा…
प्राजक्त झावरे पाटील