तानाजी चित्रपटातील या दृष्यावर घेतला शिवप्रेमींनी आक्षेप

ओम राऊत यांचे दिग्दर्शन असणारा “तानाजी : द अनसंग वॉरीयर” या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे सहकारी तानाजी मालुसरे यांच्या चरित्रावर हा चित्रपट आधारित असुन चित्रपटात अजय देवगणने तानाजी मालुसरेंची तर काजोलने त्यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारली आहे.

अभिनेता सैफ अली खान उदयभान राठोडच्या भूमिकेत दाखवला आहे. १० जानेवारी २०२० रोजी सर्वत्र हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. परंतु प्रदर्शनाआधीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला असुन चित्रपटाचा ट्रेलर आल्यानंतर संभाजी ब्रिगेडसह अनेक शिवप्रेमींनी चित्रपटाबद्दल आक्षेप नोंदवले आहेत. पाहूया काय आहेत ते आक्षेप…

काय आहेत आक्षेप ?

१) तान्हाजी : द अनसंग वॉरीयर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर त्यात एक स्वामी त्याच्या हातातील कुबड्या छत्रपती शिवाजी महाराजांना फेकून मारताना आणि महाराज हातांनी त्या धुडकावून लावतानाचा प्रसंग दाखवण्यात आला आहे. हा व्यक्ती कोण आणि या प्रसंगाला काही ऐतिहासिक आधार आहे का असा जाब शिवप्रेमींनी विचारला आहे.

२) जर महाराजांना कुबडीसदृश वस्तू फेकून मारताना दाखवलेली व्यक्ती रामदास स्वामी असतील तर ऐतिहासिक कागदपत्रांनुसार रामदासांची आणि शिवरायांची एकदाही भेट झाली नसताना चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते इतिहासाशी छेडछाड करुन रामदासांचे उदात्तीकरण करत असतील तर आम्ही त्याचा जाब विचारणार असा पवित्रा संभाजी ब्रिगेडने घेतला आहे.

३) चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तानाजी मालुसरेंच्या पत्नी दाखवलेल्या काजोलच्या तोंडी शिवरायांची तलवार ब्राह्मणांच्या जाणव्याच्या रक्षणासाठी चालली अशा आशयाचे जे संवाद टाकले आहेत त्यामुळे छत्रपती शिवरायांना लावण्यात आलेली गोब्राह्मणप्रतिपालक ही वादग्रस्त उपाधी पुन्हा एकदा जनमानसावर ठसवण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे इतिहासाचे विकृतीकरण असल्याचाही संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे.

४) छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या भगव्या झेंड्यावर ॐ लिहलेले दाखवून शिवरायांची धर्मसहिष्णु व सर्वधर्मसमावेशक प्रतिमा पुसून त्यांची हिंदुत्ववादी अशी संकुचित प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असाही आक्षेप शिवप्रेमींनी घेतला आहे. याव्यतिरिक्त छत्रपती शिवरायांच्या कपाळावर चंद्रकोर ऐवजी उभा गंध लावल्याची चूकही केली असल्याचा शिवप्रेमींचा आक्षेप आहे.

संभाजी ब्रिगेड घेणार दिग्दर्शक ओम राऊत आणि निर्माते अजय देवगणची भेट

ऐतिहासिक विषयांवर निघणाऱ्या चित्रपटांचे आम्ही स्वागतच करु, परंतु चित्रपटातून अनैतिहासिक, विकृत प्रसंगांचे प्रदर्शन केले जाणार असेल तर कुठल्याही परिस्थितीत ते खपवून घेतले जाणार नाहीत असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष अमरजीत पाटील यांनी सांगितले आहे.

तसेच चित्रपटातील आक्षेपार्ह आणि अनैतिहासिक दृश्यांबाबत संभाजी ब्रिगेड चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत आणि निर्माते अजय देवगण यांची मुंबईत भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

बघा ट्रेलर-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.