विधानसभा निकालाचे परिणाम समोर आले आहेत. एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरवणारी ही निवडणूक होती. कुठल्याच एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. अपवाद वगळता सर्वत्र क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा निकाल आज बघायला मिळाला.
उमेदवार कधी आघाडीवर तर कधी पिछाडीवर राहिल्याने कार्यकर्त्यांनी सुद्धा सावधगिरीनेच विजयाचा आनंद साजरा करायला सुरुवात केली. या सगळ्यांमध्ये सर्वात जास्त मताधिक्याने विजयी झालेल्या उमेदवाराबद्दल आपण दिवसभर पहिले आहे, पण सर्वात कमी मताधिक्याने कोण विजयी झाले ते आपण पाहणार आहोत.
कमी मताने पराभूत होणे वेदनादायी
निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या कुठल्याही उमेदवाराच्या मनात आमदार होऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत जाणे एवढे एकच ध्येय असते. त्यासाठी तो उमेदवार पाच पाच वर्ष तयारी करतो. मतदारांसाठी वेळ देतो. उमेदवारीच्या तिकिटासाठी मरमर करतो. प्रचारासाठी खर्च करतो. मतदारसंघात पायाला भिंगरी लावून पळतो. नेत्यांच्या सभा लावतो.
अपवाद वगळता मतदारांना लक्ष्मीदर्शनही घडवतो. निवडणुकीच्या निकालात हार किंवा जीत होणार हे त्याला माहित असते. एका मताने जिंकले तरी त्याची मेहनत कामाला येते, पण थोडक्यात पराभव झाला तर उमेदवाराला त्याचा खूप त्रास होतो.
हे उमेदवार महाराष्ट्रात सर्वात कमी मताधिक्याने विजयी झाले
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात कमी मतांनी विजयी किंवा पराभूत झालेल्या मतदारसंघात हेच चित्र आहे. तो मतदारसंघ म्हणजे चांदिवली ! या मतदारसंघात शिवसेनेच्या दिलीप लांडे यांनी काँग्रेसच्या मोहमद अरिफ खान यांचा अवघ्या ४०९ मतांनी पराभव केला आहे.
याठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या अबुल खान यांना ८८७६ मते मिळाली आहेत. हा निसटता विजय शिवसेनेसाठी दिलासा देणारा तर काँग्रेससाठी जिव्हारी लागणारा आहे. मनसेच्या सुमित बारसकर यांनाही इथे ७०९८ मते मिळाली आहेत.
याशिवाय दौंडमध्ये भाजपच्या राहुल कुल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रमेश थोरात यांचा अवघ्या ७४६ मतांनी पराभव केला. वंचितच्या तात्यासाहेब ताम्हाणे यांना २६३३ मते मिळाली.
सांगोल्यात देखील असाच काहीसा निकाल लागला. भाजपच्या शाहजीबापू पाटील यांनी शेकापच्या डॉ.अनिकेत देशमुख यांचा अवघ्या ७६८ मतांनी पराभव केला. वंचितच्या विष्णू यलमार यांना येथे १०४१ मते मिळाली. अनिकेत देशमुख हे ११ वेळा आमदार राहिलेल्या गणपतराव देशमुख यांचे नातू आहेत. त्यांना थोडक्यात पराभव स्वीकारावा लागला.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.