रस्त्यावरील खड्डे हा केवळ वाहनचालकांपुरता मर्यादित असलेला विषय नाही. राजकारणात त्याला अग्रक्रमाचे स्थान असते. जनतेला सगळ्यात आधी दिसणारा विकास म्हणजे चकाचक रस्ते ! तुम्ही इतर कितीही पायाभूत सुविधांचा विकास करा, पण तुमचे रस्तेच चांगले नसतील तर आपल्या घरी उसने पैसे न्यायला येणारे बाहेरगावचे नातेवाईकसुद्धा “काय तुमचे रस्ते” म्हणून नाक मुरडतात.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे कित्येकांचे जीव गेले आहेत. यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना अनेकदा धारेवर धरतात. आंदोलने केली जातात. ठेकेदारावर कारवाईची मागणी केली जाते. रस्त्यांवरच्या खड्ड्यातच वृक्षारोपण करुन सत्ताधाऱ्यांच्या कारभाराची अब्रू काढली जाते. खड्ड्यांसोबत सेल्फी काढून लक्ष वेधले जाते.
खड्डे दाखवा पाचशे रुपये मिळवा स्पर्धा
खड्ड्यांच्या प्रश्नांमुळे सत्ताधाऱ्यांना केवळ विरोधकांचाच सामना करावा लागत नाही, त्यांना जनतेच्या मतांची देखील चिंता असते. खड्ड्यांमुळे सत्ता जाऊ शकते, हे नेत्यांना चांगले कळते. अशीच परिस्थिती मुंबईमध्ये आहे. मुंबई मनपाने खड्ड्यांच्या तक्रारींसाठी ऍप आणले, खड्डे पडू नयेत म्हणून रस्त्यांच्या कामात परदेशातील तंत्रज्ञान वापरले, पण खड्डे पडणे काय थांबले नाही.
आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या विषयाचा फटका बसू नये यासाठी मुंबई मनपा सत्ताधाऱ्यांनी कम्बर कसली आहे. खड्ड्यांवर त्वरित उपाय करण्यासाठी १ नोव्हेंबर २०१९ पासून “खड्डे दाखवा पाचशे रुपये मिळवा” या स्पर्धेच्या माध्यमातून जनतेला त्रासदायक ठरणाऱ्या खड्ड्यांची समस्या सोडवण्यासाठी मुंबई मनपा सरसावली आहे.
कशी आहे स्पर्धा आणि त्यासाठी काय आहेत निकष ?
खड्डे दाखवा पाचशे रुपये मिळवा या स्पर्धेसाठी मुंबई मनपा हद्दीतील तक्रारदारांनी आपल्या भागातील रस्त्यांवरच्या खड्ड्याची तक्रार करायची आहे. कमीत कमी एक फुट लांबीच्या आणि तीन इंच खोलीच्या खड्ड्यांचाच या स्पर्धेत विचार केला जाणार आहे.
खड्ड्याची तक्रार केल्यापासून २४ तासांच्या आत मनपा कडून खड्डा बुजवला गेला नाही, तर तक्रारदाराला पाचशे रुपये दिले जाणार आहेत. पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी ही घोषणा केली आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.