तामिळनाडूतील मदुराई ते कन्याकुमारी मार्गावर असलेले शिवकाशी गाव दिवाळीच्या काळात अनेकदा चर्चेत असते. देशातील फटाके निर्मितीचे हे सर्वात मोठे केंद्र आहे. भारतातील ९०% फटाके एकट्या शिवकाशीत तयार केले जातात. इथे जवळपास २००० फटाके निर्माते आहेत. सर्वोच्च न्यायालयाने प्रदूषणाच्या कारणामुळे फटाक्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या सहा प्रकारच्या रसायनांवर बंदी घातल्यामुळे या व्यवसायात घट होत चालली आहे.
शिवकाशीने मागच्या वर्षी जवळपास २०००० कोटींच्या फटाके विक्रीचा व्यवसाय केला होता. जवळपास पाच लाख लोकांचा प्रपंच या व्यवसायावर चालतो. जाणून घेऊया शिवकाशी कसे बनले फटाक्यांचे गाव…
काडेपेटी निर्मितीमधून आला फटाके निर्मितीचा व्यवसाय
१९२२-२३ च्या दरम्यान शिवकाशीचे षण्मुगम नाडर आणि अय्या नाडर हे दोन व्यापारी बंधू कोलकाता येथील दास गुप्तांच्या काडेपेटी कारखान्यात कामाला होते. त्या दरम्यान त्यांनी काडेपेटी बनवण्याचे ज्ञान हस्तगत केले आणि शिवकाशीला येऊन स्वतःचा काडेपेटीचा कारखाना सुरु केला. त्यासाठी जर्मनीवरुन आधुनिक यंत्रसामुग्री मागवली.
काडेपेटी निर्मितीच्या व्यवसायाचा जम बसल्यानंतर १९२६ मध्ये दोघांनी विभक्त होऊन व्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेतला. १९४२ मध्ये षण्मुगम नाडर यांनी स्टॅंडर्ड तर अय्या नाडर यांनी कालेश्वरी फायरवर्क्स या ब्रँड नावाने फटाके निर्मितीच्या व्यवसायाला सुरुवात केली.
दुसर्या महायुद्धानंतर शिवकाशी बनले भारतातील फटाके हब
दुसरे महायुद्ध १९३९-१९४५ पर्यंत चालले. या काळात नाडर बंधूंच्या स्टॅंडर्ड फायरवर्क्स आणि कालेश्वरी फायरवर्क्स व्यवसायाने जम बसवायला सुरुवात केली. शिवकाशीत असणारा कमी पाऊस आणि कोरडे वातावरण हे फटाके निर्मितीसाठी ते आदर्श वातावरण होते. त्यामुळे बघता बघता शिवकाशी भारताचे फटाका हब बनले.
१९८० पर्यंत शिवकाशीमुळे फटाके निर्मितीतील चीनची दहशत मोडून निघाली आणि भारताला फटाका निर्यातदार देश बनला. आज त्यांचे अनिल, गिलहरी, मुर्ग, मोर, घंटी, स्टॅंडर्ड अशा ब्रँडचे फटाके भारतात आणि भारताबाहेर फोडले जातात.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.