प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते
मराठी अर्थ – प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि विश्ववंदनीय असणारी अशी ही शहाजींचे पुत्र शिवाजी यांची (राज)मुद्रा (प्रजेच्या) कल्याणासाठी विराजमान होते.
English Meaning –
The glory of this Mudra of Raja Shahaji’s son Shivaji will ever increasing like the crescent moon, it will be worshiped by the world and it will shine only for welfare of the people.
छत्रपती शिवाजी महाराजांना बेंगलोरहुन पुण्याला पाठवताना शहाजीराजेंनी त्यांच्यासोबत ही राजमुद्रा, भगवा झेंडा आणि विश्वासु माणसं दिली होती. त्यावेळी शिवरायांचं वय होतं अवघं बारा वर्षे.
शिवरायांच्या माध्यमातुन उभा होणारं स्वराज्य कसं असावं याचा विचार करुनच शहाजीराजेंनी अत्यंत दुरदृष्टीने तिची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकंदर कार्यावर नजर टाकली असता ते कार्य राजमुद्रेवरील ओळींच्या अंकित राहुनच केल्याचे दिसुन येते. भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीसाठी उद्देशिका जशी मार्गदर्शक ठरली त्याचीच भुतकाळातील आवृत्ती म्हणजे शिवरायांची राजमुद्रा. स्वराज्य निर्मितीच्या वाटचालीत पदोपदी मार्गदर्शक ठरणारी ही राजमुद्रा समोर ठेवुनच शिवरायांनी आपल्या विश्वासु सहकाऱ्यांच्या सोबतीने स्वराज्याचा भगवा झेंडा फडकवला.
आपली राजमुद्रा समजुन घेताना शिवछत्रपती कुतूहलापोटी चंद्राच्या प्रतिपदेपर्यंतच्या कलांचे ज्यावेळी निरीक्षण करत असतील तेव्हा त्यांच्या मनात काय विचार असतील याची कल्पना करुन पहा.
अगदी राजमुद्रेत उल्लेख केल्याप्रमाणे प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे शिवरायांचे स्वराज्य वाढत गेले. प्रसंगी शस्त्र उचलुन शिवरायांनी रयतेला तिच्या कल्याणाची, रक्षणाची हमी दिली. रयतेला स्वातंत्र्य दिलं, स्वराज्य दिलं, स्वाभिमान दिला. त्यांनी केलेल्या लोककल्याणकारी कार्यामुळे शिवछत्रपती विश्ववंदनीय ठरले. त्यांचे व्यक्तित्व आहेच विश्वव्यापक. स्वतः शहाजीराजेंनीच त्यांच्याकडुन विश्वबंधुत्व आणि विश्वकल्याणाची अपेक्षा ठेवुन राजमुद्रेत “विश्ववंदिता” या शब्दाचे प्रयोजन केले होते.
इतिहासाच्या पटलावरील “शिवाजी” हा तीन अक्षरी शब्द स्वतःच एक वेगळा धर्म, जात, प्रांत, राष्ट्र आणि विश्व आहे. त्यांचा जन्म या पृथ्वीवर, भारतवर्षात, महाराष्ट्रप्रांती, हिंदु धर्मात, मराठा जातीत, भोसले घराण्यात झाला हे वास्तव कुणी नाकारत नाही. शिवाजी महाराज हे भोसले, मराठा, हिंदु, महाराष्ट्रीय, भारतवर्षीय किंवा पृथ्वीवासी होते म्हणुन एवढे विश्ववंदनीय कार्य करु शकले नाहीत, तर ते “शिवाजी” होते म्हणुन हे कार्य करु शकले. हीच त्यांची खरी ओळख आहे. त्यांची ओळख उतरत्या क्रमाने व्हावी की उलट चढत्या क्रमाने होत जावी याचा प्रत्येकाने विचार करावा. शिवरायांचे व्यक्तित्व कुठल्याही चौकटीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचे कर्तृत्व या सगळ्या चौकटी मोडुन त्याच्या पलीकडे जाणारे आहे. राजमुद्रेत सांगितल्याप्रमाणेच विश्ववंदनीय आहे.
– अनिल माने
Far chan ullekh!! Sobat tya magchi karna hi dileli ahet. Uttam prayatna!!