Omicron सध्या जगभरात चिंतेचा विषय आहे. त्याचा परिणाम भारताच्या शेअर बाजारावरही होत आहे. सोमवारी शेअर बाजारात जोरदार घसरण झाली. सकाळी 10.30 वाजेपर्यंत सेन्सेक्स 1,300 अंकांनी घसरला होता. ही घट सुमारे अडीच टक्के आहे. परिणामी सेन्सेक्स 55 हजार 662 अंकांपर्यंत खाली आला आहे. निफ्टी 2.25 टक्क्यांनी घसरून 16,603 अंकांवर बंद झाला.
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. बाजार भांडवल अवघ्या दहा मिनिटांत 10.47 लाख कोटी रुपयांनी घसरले. शुक्रवारी बाजार भांडवल 264.03 लाख कोटी रुपये होते, जे आता 253.56 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
Omicron पुन्हा एकदा युरोपियन देशांना निर्बंध लावण्यास मजबूर करत आहे. याचा परिणाम पुन्हा एकदा जागतिक अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात मोठी घसरण झाली. आशियाई बाजारातही आज घसरण झाली. कच्च्या तेलाच्या बाजारातही घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये बजाज फायनान्स शेअर चार टक्क्यांनी घसरला. टाटा स्टील, एसबीआय, एनटीपीसी आणि एचडीएफसी बँकेतही मोठी घसरण झाली. मात्र, सन फार्माच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली.
आशियाई शेअर बाजाराप्रमाणे वॉल स्ट्रीटमध्येही घसरण सुरू झाली आहे. ओमिक्रॉन संकट आणि फेडरल रिझर्व्हच्या धोरणाचा परिणाम म्हणून याचे वर्णन केले जात आहे. ऑस्ट्रेलियन शेअर बाजार 19 अंकांनी, निक्केई 613 अंकांनी आणि शांघाय स्टॉक एक्सचेंज 31 अंकांनी घसरला.