विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. राज्यात सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहताना दिसत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे महाजानदेश यात्रेत व्यस्त आहेत. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील २ दिवसांपासून महाराष्ट्र दौऱ्यावर गेले आहेत.
राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक धक्के बसले. पक्षाचे अनेक जेष्ठ आणि मोठे नेते पक्षाला रामराम ठोकत भाजप आणि शिवसेनेत दाखल झाले. राष्ट्रवादीला पक्षांतराची चांगलीच घरघर लागल्याचे चित्र आहे. पण आता स्वतः शरद पवार मैदानात उतरले असून त्यांनी दौऱ्याला आक्रमकपणे सुरुवात केली आहे.
सोलापूरमध्ये अनेक मोठ्या नेत्यांनी पक्षांतर केल्यानंतरही त्यांच्या मेळाव्याला असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर ते उस्मानाबाद आणि नंतर बीडच्या दौऱ्यावर गेले. बीड दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी आज पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. बीडमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा आज पार पडला. या मेळाव्यात पवारांनी बीडचे पाच उमेदवार घोषित केले.
बीडचे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते जयदत्त क्षीरसागर यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या विरुद्ध त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांचे आव्हान राहील अशी चर्चा होती. आज शरद पवार यांनी यावर शिक्कामोर्तब केले.
त्यांमुळे बीडमध्ये काका-पुतण्याची लढाई पहायला मिळणार हे निश्चित झाले आहे. म्हणजे जयदत्त क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर अशी लढाई होईल. तर, महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या परळी मतदारसंघातून पुन्हा एकदा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे.
पवार यांनी जाहीर केलेल्या राष्ट्रवादीच्या पहिल्या पाच उमेदवारांमध्ये परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर गेवराई- विजयसिंह पंडित, केज- नमिता मुंदडा, बीड- संदीप क्षीरसागर, माजलगाव- प्रकाश सोळंके याना उमेदवारी पवारांनी जाहीर केली. बीडमधील आष्टी मतदारसंघाची उमेदवारी फक्त राष्ट्रवादीकडून यानिमित्ताने जाहीर करण्याचे बाकी राहिले आहे.
उद्या होणार विधानसभा निवडणूक तारखांची घोषणा?
विधानसभा निवडणूक तारखांची घोषणा उद्या १९ सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह हरयाणा, झारखंड या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोग १९ सप्टेंबर रोजी जाहीर करण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकांच्या तारखा १२ सप्टेंबर रोजी जाहीर झाल्या होत्या आणि मतदान १५ ऑक्टोबरला होते. तर निकाल १९ ऑक्टोबरला जाहीर झाला होता. यावेळेस देखील मतदान १५ ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.