भारतीय स्वातंत्र लढ्यातील एक अपरिचित अमेरिकन स्वतंत्र सैनिक..

१६ ऑगस्ट १८८२ रोजी एका अशा क्रांतिकारकाने जन्म घेतला की ज्याच्या प्रयत्नांमुळे आज भारताला जागतिक बाजारपेठेत ओळख मिळाली नव्हे नव्हे तर भारतातील एका राज्याला जगाच्या नकाशावर एक वेगळी ओळख मिळाली. गोऱ्या कातडीचा समाज सुधारक, एक क्रांतिकारक, परदेशी नागरिकत्व असणारा काँग्रेस पक्षाचा एकमेव सदस्य, काँग्रेसच्या कित्येक जाहीरनाम्यांवर स्वाक्षरी करणारा एकमेव अमेरिकी नागरिक म्हणजेच सॅम्युअल्स एवन्स स्टोक्स होय!

आजमितीला फार कमी लोकांना सॅम्युअल्स बद्दल माहिती असेल. कुणाच्या लेखी तो शिमला परिसरातील ब्रिटिश राजवटीच्या जुलमाने बेजार झालेल्या कामगारांचा संघटित लढा उभा करणारा-ब्रिटिशांना आपल्या कार्यपद्धतीत बदल करण्यास भाग पाडणारा-लढ्याचे यशस्वी नेतृत्व करणारा एक सच्चा लढवय्या कामगार नेता म्हणून असेल तर कुणाच्या लेखी, सॅम्युअल्सची ओळख हिमालयाच्या पायथ्याशी सुबाथु ह्या गावी असणाऱ्या कुष्ठधामात कुष्ठरोग्यांची मनोभावे सेवा करणारा एक गोरा माणूस म्हणून असेल किंवा कुणाच्या लेखी, सॅम्युअल्सची ओळख हिमाचल प्रदेश या राज्याला लाल-सफरचंदाची ओळख करून देणारा अमेरिकन शेतकरी म्हणून असेल तर कुणाच्या लेखी, सॅम्युअल्सची ओळख महात्मा गांधी यांचा स्वातंत्र्य लढ्यातील सहकारी म्हणून असेल! असे हे कामगार नेता, सेवाभावी माणूस, शेतकरी व स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिवीर बहूआयामी व्यक्तिमत्व!

१६ ऑगस्ट १८८२ साली सॅम्युअल्स एवन्स स्टोक्सचा जन्म फिलाडेल्फिया, अमेरिका येथील धनाढ्य परिवारात झाला. वडिलांचा उदवाहक (lift/elevators) चा पिढीजात व्यवसाय होता. सॅम्युअल्सचे मन कधी व्यवसायात रमलेच नाही, कुटुंबीयांनी या ना त्या प्रकारे त्याचं मन वळविण्याचा प्रयत्न केला पण त्यांना त्यात यश आले नाही, शेवटी मुलाच्या सुखात आपले सुख मानून त्यांनी सॅम्युअल्सला स्वतःची वाट निवडण्यास मान्यता दिली. वयाच्या २२व्या वर्षी सॅम्युअल्स भारतात आला, त्याला क्वचितच माहिती असेल की तो आता अमेरिकेत कधीच परतणार नसावा! भारतात आल्यावर सॅम्युअल्स शिमला जवळील सुबाथु येथे डॉ.कार्लेटन कुष्ठरोग्यांसाठी चालवत असलेल्या आश्रमात तो रुजू झाला. त्याच्या कुटुंबियांना त्याचा हा निर्णय अर्थातच रुचला नाही पण, त्याचे वडील त्याला नियमित पैसे पाठवत असत. सॅम्युअल्सला कुष्ठरोग्यांची सेवा करण्यात प्रचंड आत्मिक समाधान मिळत असे. रुग्णांमध्ये व स्थानिक लोकांमध्ये सॅम्युअल्स बद्दल प्रचंड आदर होता. वडिलांकडून येणाऱ्या पैशातून तो रुग्णांना व स्थानिक लोकांना मदत करू लागला, याच काळात त्याने इंग्रज सरकारच्या जाचाला कंटाळलेल्या कामगारांचा यशस्वी लढा उभारला. स्थानिकांशी संवाद साधण्यास अडचणी येत आहेत हे ओळखून त्याने पहाडी बोली भाषाचे धडे गिरवले व ती अवगत करून घेतली.

डॉ.कार्लेटन यांनी एकेदिवशी सॅम्युअल्सला कोटगडला कामानिमित्त पाठवले. ह्या दुर्गम भागात रस्ता नसल्याने सॅम्युअल्स ने हा प्रवास पायी केला. कोटगड म्हणजे शिमल्यापासून ५० मैल दूर असणारा, निसर्ग संपन्न प्रदेश. सॅम्युअल्स ह्या निसर्ग संपन्नतेच्या पाहताच क्षणी प्रेमात पडला. त्या क्षणाला त्याला माहित नव्हते की कोटगडच त्याची कर्मभूमी आहे…

१९१२ साली सॅम्युअल्स ने एका राजपूत (ख्रिस्ती राजपूत) आग्नेस ह्या कन्येशी विवाह केला. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या संपत्तीतून त्याने आग्नेस च्या गावाशेजारीच जमीन खरेदी केली. विकत घेतलेल्या जमिनीची सुपीकता व परिसरातील वातावरण बघून सॅम्युअल्सने सफरचंदाची शेती सुरू केली त्यासाठी त्याने सफरचंदाचा लाल रंगाचा वाण निवडला, त्याकाळी हा वाण अमेरिकेतील लौईसीना प्रांतातील स्टार्क बंधू पिकवत असत. सॅम्युअल्सने ह्या लाल-सफरचंदाची शेती पिकवली, निर्यातक्षम दर्जा बघून दिल्ली येथील निर्यातदारांनी प्रचंड असा मोबदला दिला. सॅम्युअल्सने परिसरातील सर्व शेतकऱ्यांना लाल-सफरचंदाची शेती करण्यास सर्वोतोपरी मदत केली. बघता-बघता परिसराचे रूप पालटू लागले व कोटगड मधील शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता आली. हा काळ होता १९१६-१९ चा… दरम्यान सॅम्युअल्स व आग्नेस ला मुलं ही झाली होती.

१९१९ साली झालेल्या जालियनवाला बागेतील हत्याकांडा नंतर सॅम्युअल्स भारतीय स्वातंत्र्य लढ्याकडे आकर्षित झाला. सी. एफ. अँड्र्यूज यांनी त्याची ओळख महात्मा गांधी यांच्याशी करून दिली व अल्पावधीतच तो गांधीजींचा निकटवर्तीय झाला. याकाळात तो पंजाब प्रांतात लाला लजपत राय यांच्यासोबत पंजाब मध्ये सक्रिय झाला, पुढे सॅम्युअल्सची निवड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, पंजाब वर झाली. डिसेंबर १९२० साली नागपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात सॅम्युअल्सने कोटगडचे प्रतिनिधित्व केले. भारतीयांनी सरकारी नोकऱ्यांच्या त्याग करावा व स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घ्यावा असा ठराव असणाऱ्या जाहिरनाम्यावर स्वाक्षरी करणारा सॅम्युअल्स हा एकमेव अमेरिकी नागरिक होता.

इंग्रजांनी जुलै १९२१ साली विदेशी नागरिकांसाठी एक अधिसूचना जारी केली होती ज्यात विदेशी नागरिकांनी स्वदेशी चळवळीत भाग घेऊ नये, परदेशी वस्तू-कपड्यांची होळी करू नये असे म्हटले होते. हे सर्व झुगारून सॅम्युअल्स एका इंग्रज नर्स सोबत अशाच एका होळीत सहभागी झाला. भारतीय लोकांसोबत दोन गोरे नागरीक आपल्याच देशाच्या संस्कृती विरोधात उभे राहिलेले पाहून सर्वांना आश्चर्य वाटले नसते तरच नवल.

डिसेंबर १९२१ साली वेल्सच्या राजकुमाराचा भारत दौरा नियोजित होता. यावरून इंग्रज राजवट व राष्ट्रीय काँग्रेस यांनी परस्पर विरोधी भूमिका घेतल्या होत्या. ३ डिसेंबर रोजी पंजाब काँग्रेसची प्रादेशिक बैठकीचे आयोजन लाहोर येथे करण्यात आले होते. सॅम्युअल्स ह्या बैठकीसाठी जात असताना वाघा येथे त्यांना अटक करण्यात आली. सॅम्युअल्स यांच्या विरोधात राजद्रोह व समाजात राजा विषयी द्वेष पसरवण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. त्याकाळी भारतीय कैद्यांसाठी वेगळी व गोऱ्या कातडीच्या लोकांसाठी वेगवेगळे बराकं होती. सॅम्युअल्सने भारतीय कैद्यांसोबत राहणे पसंद केले. त्याचवेळी लाला लजपत राय, गोपीचंद, सतनाम या सहकाऱ्यांना सुद्धा अटक झाली. सॅम्युअल्सवर खटला देखील चालवण्यात आला, त्यांना ६ महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली. ह्या बातमीची दखल ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ ने देखील घेतली (व भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी झटणाऱ्या अमेरिकी नागरिकास अटक अशा मथळ्याखाली छापली असावी).

दरम्यान साथीच्या रोगाने सॅम्युअल्सच्या तारा नावाच्या मुलाचे झालेलं निधन सॅम्युअल्सला चटका लावून गेलं. याच दरम्यान तो आर्य समाजाच्या शिकवणीने प्रेरित झाला व ‘आत्मा हा कर्माने मुक्ती प्राप्त करतो, कुणाच्या कृपेने नव्हे’ ह्या गोष्टीचा त्याला प्रत्येय आला. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या सत्यर्थ प्रकाश अभ्यासून सॅम्युअल्सने कुटुंबासह १९३२ साली हिंदू धर्म स्वीकारला व स्वतःचे नामकरण ‘सत्यानंद’ आणि बायकोचे प्रियादेवी असे केले.

सत्यानंद स्टोक्स यांनी आपल्या आयुष्यात अनेक चढ-उतार बघितले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात१९४६ साली शिमला येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर शिमला येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले व त्यांच्या अस्थींचे विसर्जन त्यांची कर्मभूमी कोटगड ला करण्यात आले.

दैवदुर्विलास म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात, समाज सुधारण्यात, कृषी व अर्थ क्षेत्रात एवढं मोठं योगदान असणाऱ्या ह्या क्रांतिकारकाचे एक साधं स्मारक आज स्वातंत्र्य भारत देशाच्या कोपऱ्यात देखील नाही. एवढंच काय ज्या ‘लाल-सफरचंदाच राज्य’ म्हणून हिमाचल प्रदेशची ओळख आहे तेच राज्य आज सत्यानंद स्टोक्स यांना विसरून गेले आहे. स्मारक तर जाऊद्या पण एकाही रस्त्याला त्यांचे नाव नाही की पोस्ट खात्याने त्यांच्यावर टपाल तिकीट प्रकाशित केलेलं नाही, की त्यांच्या नावाने कुठली संस्था-उद्यान देखील नाही….!

अशाच अपरिचित क्रांतिकारकांच्या जीवनपटावर प्रकाश टाकण्यासाठी ह्या क्रांती-जागरात हा लेखन प्रपंच!

© राहुल सुधाकर कराळे

(सॅम्युअल्स एवन्स स्टोक्स ह्या व्यक्तीविषयी जगाला फार कमी माहिती होती पण १९९९ साली त्यांच्या नातीने (मुलीची मुलगी) ‘An American in Khadi’ ह्या नावाने त्यांचे जीवनचरित्र लिहिले आणि ह्या क्रांतिकारका विषयी एक वेगळी माहिती जगाला झाली. ह्याच जीवनचरित्राच्या सुधारित आवृत्तीचे पुन:प्रकाशन Indian University Press ने केले व त्या जीवनचरित्र्याच्या शीर्षकात बदल करून ‘An American in Gandhis India’ असे केले विशेष म्हणजे याला दलाई लामा यांनी प्रस्तावना दिली आहे.)

Comments 1

  1. Ram Upadhyaya says:

    Unfortunate,we should launch a campaign to honour his memory.

    l

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.