सॅम माणेकशॉ हे भारतीय सैन्याचे एक असे सेनाप्रमुख होते ज्यांना युद्धभूमीवरील शौर्यासाठी सैन्यापदक मिळाले होते. स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिश आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय लष्करात तब्बल ४० वर्षे त्यांनी सेवा केली. दुसरे महायुद्ध, भारत-पाक यांच्यातील १९४८, १९६५ आणि १९७१ या तिन्ही युद्धात तसेच चीन युद्धात त्यांनी हिरीरीने भाग घेतला होता.
१९७१ च्या भारत-पाक युद्धात तर अमेरिकेसारखा बलाढ्य देश पाकिस्तनाच्या पाठीशी असताना माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने पाकिस्तानला युद्धात धूळ चारली होती. या युद्धातच माणेकशांनी पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष याह्याखान यांच्याकडून आपला एक जुना हिशोब चुकता केला होता. चला तर जाणून घेऊया काय होते ते प्रकरण…
फाळणीपूर्वी एकाच सैन्यात असणारे दोन अधिकारी १९७१ मध्ये सेनाप्रमुख म्हणून आले एकमेकांसमोर
भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ब्रिटिश आर्मी अस्तित्वात होती. त्यावेळी सॅम माणेकशॉ आणि याह्या खान हे ब्रिटिश नेतृत्वाखालील सैन्यदलात कार्यरत होते. १९४७ मध्ये भारत आणि पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळताच फाळणी झाली. फाळणीनंतर माणेकशॉ भारतासोबत राहिले, तर याह्याखान पाकिस्तानसोबत गेले.
पुढे माणेकशॉ भारताचे सेनाप्रमुख बनले तर याह्याखान पाकिस्तानच्या सेनाप्रमुखाबरोबरच राष्ट्राध्यक्षही बनले. १९७१ च्या भारत-पाक युद्धावेळी हे दोघेही सेनाप्रमुख एकमेकांसमोर उभे ठाकले. या युद्धात पाकिस्तानला धूळ चारत भारतीय सेनाप्रमुख माणेकशॉ यांनी याह्याखानकडून आपला एक जुना हिशोबही चुकता केला.
काय होता माणेकशॉ आणि याह्याखान यांच्यातील हिशोब आणि कसा केला चुकता ?
विषय असा आहे की सॅम माणेकशॉ यांना मोटरसायकली फार आवडायच्या. १९४७ मध्ये त्यांनी एका ब्रिटिश अधिकाऱ्याकडुन १६०० रुपये मोजून एक मोटरसायकलही विकत घेतली होती. त्यावेळी माणेकशॉ यांच्यासोबत सैन्यात असणाऱ्या याह्याखान यांना ती गाडी फार आवडली. त्यांनी माणेकशॉ यांना अनेकदा विचारले, पण माणेकशॉ आपली गाडी विकायला राजी होत नव्हते.
मात्र भारत-पाकिस्तान फाळणीनंतर पाकिस्तान जाताना याह्याखान यांनी माणेकशॉ यांना शेवटचे विचारले आणि यावेळी मात्र माणेकशॉ आपली गाडी विकायला तयार झाले. १००० रुपयांना व्यवहार ठरला. याह्याखान यांनी आपण पाकिस्तानात गेल्यांनातर गाडीचे १००० रुपये पाठवुन देतो म्हणून गाडी घेऊन निघून गेले. मात्र २४ वर्षे वाट पाहूनही याह्याखान यांनी माणेकशॉ यांचे १००० रुपये दिलेच नाहीत.
माणेकशॉ यांनी पाकिस्तानी राष्ट्राध्यक्षांकडून असे वसूल केले आपले हजार रुपये
याह्याखान गाडी घेऊन गेल्यानंतर त्यांनी माणेकशॉ यांना पैसे पाठवून देण्याचे दिलेले वचन पाळले नाही. पुढे याह्याखान तख्तापालट करुन पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आणि सेनाप्रमुख बनले. १९७१ मध्ये नियतीने दोघांना पुन्हा एकदा समोरासमोर आणले. पूर्व पाकिस्तान (बांगलादेश) मधील सामान्य जनतेने भाषिक आणि इतर प्रश्नावर बंड केल्यानंतर याह्याखान यांनी बांगलादेशात पाकिस्तानी सैन्य पाठवून प्रचंड अन्याय सुरू केले. त्यामुळे मोठ्या संख्येने बांगलादेशी नागरिक भारतीय हद्दीत घुसले. शेवटी भारताला लष्करी कारवाई करावी लागली. या कारवाईचे नेतृत्व माणेकशॉ यांच्याकडे होते.
इंदिरा गांधींच्या आदेशानंतर त्यांनी केवळ १६ दिवसात पाकिस्तानच्या ९३००० सैनिकांना गुडघे टेकायला भाग पाडून एका पाकिस्तानचे दोन पाकिस्तान करण्याचे ऐतिहासिक काम केले. त्यावेळी माणेकशॉ यांनी गंमतीने “याह्याखान यांनी २४ वर्षानंतर माझ्या हजार रुपयांची किंमत आपला अर्धा देश देऊन चुकवली” असे उद्गार काढले.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.