राजस्थानच्या सचिनला “पायलट” हे आडनाव कसे मिळाले ?

राजस्थानच्या सचिन पायलटांना “पायलट” हे नाव कसे मिळाले हे आपण पाहणारच आहोत, त्यापूर्वी राजस्थानात सुरु असणारा घोळ नेमका काय आहे त्यावर एक नजर टाकूया. देशामध्ये कोरोनाचे संकट अद्याप संपले नाही, मात्र राजस्थानमध्ये एक वेगळाच राजकीय पेच निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वादाने आता मोठे स्वरुप धारण केले असून राजस्थानमधील काँग्रेस सरकार आणि अशोक गेहलोतांची खुर्ची धोक्यात आली आहे.

२०० विधानसभा सदस्य संख्या असणाऱ्या राजस्थानमध्ये १०१ हा बहुमताचा आकडा आहे. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला १०७ जागा मिळाल्या होत्या.

त्यावेळी काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदासाठी अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात रस्सीखेच सुरु झाली. परंतु काँग्रेस हायकमांडने अशोक गेहलोतांच्या पारड्यात आपले वजन टाकून त्यांना मुख्यमंत्री केले. त्यामुळे सचिन पायलट नाराज झाले. त्यावेळी राहुल गांधींनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

आता दोन वर्षानंतर २०२० मध्ये सचिन पायलटांची नाराजी उफाळून वर आली आहे. त्याला निमित्तही तसेच होते. झालं काय की, मुख्यमंत्री अशोक गेहलोतांनी आपल्या गृह विभागाला राज्यातील सरकार पाडण्यासाठी कट रचला जात आहे का याविषयीचा तपास करण्याचे आदेश दिले होते.

एसओजीने उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थकांना नोटीस पाठवली. ही नोटीस म्हणजे केवळ तपासाचा भाग असल्याचे गेहलोतांनी सांगितले खरे, पण त्यामुळे सचिन पायलट नाराज झाले आणि त्यांनी बंडाचे निशाण उभारले. दोघांनीही आपल्याकडे आमदारांचा मोठा गट असल्याचे दावे केले आहेत. काँग्रेस पायलटांची मनधरणी करण्याच्या प्रयत्नात आहे.

आता आपण मूळ मुख्य विषयाकडे वळूया. राजस्थानच्या राजकारणात अलीकडे सातत्याने घेतल्या जाणाऱ्या “पायलट” या आडनावामागे काय स्टोरी आहे. तर स्टोरी अशी आहे की, सचिन पायलट यांचे मूळ नाव सचिन प्रसाद बिधुडी आहे. त्यांच्या वडिलांचे नाव राजेश्वर प्रसाद बिधुडी होते. राजेश हे राजकारणात येण्यापूर्वी भारतीय सैन्यात पायलट होते. त्यावेळी ते राजेश पायलट या नावाने ओळखले जायचे. राजकारणात आल्यानंतर त्यांनी आपली हीच ओळख कायम ठेवली. पुढे त्यांचा मुलगा सचिन यांनीही सचिन पायलट अशीच ओळख स्वीकारली.

सचिन पायलट हे भारताच्या इतिहासात सर्वात कमी वयात म्हणजे वयाच्या २६ व्या वर्षी खासदार बनले होते. २००४ मध्ये त्यांनी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सारा अब्दुल्ला यांच्याशी प्रेमविवाह केला. त्यांनी आपल्या कुटुंबियांच्या मर्जीविरुद्ध लग्न केल्याने बरेच वादंग उठले होते. सचिन पायलट यांचे हे जम्मू काश्मीर कनेक्शन लक्षात घेऊन भाजपने ३७० कलम रद्द झाल्यानंतर सचिन पायलटांना भाजपमध्ये आल्यास जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल करु अशी ऑफर दिली होती.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.