भेळ चा व्यवसाय करून कोणी मोठा उद्योजक होऊ शकेल अशी सर्व सामान्य माणसाची कल्पना असेल पण तिला छेद रमेश कोंढरे यांनी दिला आहे. आज ते भेळ विकून मोठे उद्योजक झाले आहेत. चला पाहूया कोंढरे यांचा संघर्षमय प्रवास खासरेवर
रमेश कोंढरेच कुटुंब मूळचं पुणे जिल्ह्य़ातल्या मुळशी तालुक्यातलं कोंढूर या गावचे . आर्थिक अवस्था हलाखीची असल्याने कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी म्हणून त्यांचे वडील श्रीहरी कोंढरे यांनी पुणे गाठलं. सुरुवातीला ते मालधक्क्यावर हमालीचे काम करत होते. पुढे त्यांची हमाली मार्केट यार्डमध्ये गूळ-बाजारात सुरू झाली. त्यांचा मुलगा रमेश महापालिकेच्या शाळेत शिकत होता. हमालीच्या कामातूनही कुटुंबाचं भागेना म्हणून मग रमेशची आई मुक्ताबाई यांनी घरोघरी धुणीभांडय़ाची कामं सुरू केली.
दारोदार फिरून भाजी विकायचंही काम केलं. अशाच तंगी मध्ये त्यांचे घर चालत होते. रमेश चौथी पास झाला आणि घरच्या या हलाखीच्या परिस्थितीमुळे त्याला शाळा सोडून द्यावी लागली. शाळा सुटल्या नंतर वडिलांबरोबर मार्केट यार्डात जावे लागायचे. पण अवघं नऊ -दहा वर्षांचं वय त्यामुळे त्याला गूळ खडे शिवायचं काम मिळालं. एक खडा शिवला की सहा पैसे मिळायचे. पुढे ही मजुरी वाढली.
आई दिवसभर भाजी विकायची. पायपीट खूप व्हायची मिळकत हि कमी त्यामुळे रमेश यांच्या आईने ठरवले की, या पायपिटीपेक्षा काहीतरी बैठा व्यवसाय करून बघू. त्यामुळे टिंबर मार्केटच्या रस्त्यावरचा पदपथ त्यांनी गाठला आणि टोपलीतून सुकी भेळ विकायला सुरुवात केली. या भेळीसाठी जी चटणी त्या करायच्या त्या चटणीची चटक हळूहळू गिऱ्हाईकांना लागली.
हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर, धणे वगैरेंचं मिश्रण असलेली ती चटकदार चटणीची भेळ खूपच लोकप्रिय झाली. दिवसभर हमालीचे काम केल्यानंतर रमेश आणि त्यांचे वडील भेळीच्या गाड्यावर आईला आणि भावाला मदत करयचे त्यावेळी ते १७ ते १८ वर्षाचा होते भेळीची चव आणि त्यामध्ये ठेवलेले सातत्य, पाट्यावर वाटलेली मिरच्याची चटणी यामुळे भेळचा व्यवसाय चांगला चालू लागला. व्यवसाय वाढल्याने त्यांनी हमाली बंद केली.
संपूर्ण कुटुंब भेळीच्या धंद्यावर असल्याने या धंदा स्थिरावला पण ग्राहकांच्या मागण्यानुसार त्यांनी पाणीपुरी, रगडापुरी,शेवपुरी इत्यादी वस्तू ठेवल्या. त्यांची टोपलीतली भेळ मग एका लाकडी खोक्यावर आली. पुढे ते खोकंही पुरेनासं झालं. मग रमेशने एक छोटी हातगाडी बनवून घेतली आणि ‘कल्याण भेळ’ प्रथमच हातगाडीवर गेली. व्यवसाय व्याप वाढला. म्हणून एक सायकल घेतली. पुढे सेकंडहँड लूना घेतली, मग स्कूटर घेतली. आणि हातगाडीवरही चुरमुरे, फरसाण, पाणीपुरीच्या पुऱ्या हा माल मावेनासा झाल्यावर एका टेम्पोची खरेदी झाली. जवळजवळ पंचवीस वर्षे कोंढरे यांचा व्यवसाय रस्त्यावरच सुरू होता.
त्यातूनच बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर ‘कल्याण भेळ’चं पहिलं आलिशान, भव्य दुकान कोंढरे यांनी सुरू केलं. ‘कल्याण भेळ’ची गेल्या सात-आठ वर्षांतली प्रगती लक्षवेधी तर आहेच; पण सचोटीच्या व्यावसायिकाला यशाचं शिखर कसं गाठता येतं याच ही एक मोठे उदाहरण आहे. कमालीची स्वच्छता, टापटीप, ग्राहकांशी वागतानाची नम्र वृत्ती, धंद्याची उत्तम जाण, कष्टांची तयारी अशी या व्यवसायाची अनेक वैशिष्टय़ं आहेत. या बळावरच ‘कल्याण भेळ’ हा व्यवसाय वाढत गेला, बहरत गेला.
बिबवेवाडीतील आलिशान आउटलेट पाठोपाठ रमेश कोंढरे जेथे हातगाडीवर भेळ विकत होते, त्या जागेत ‘कल्याण भेळ’ची दुसरी शाखा सुरू झाली. पाहता पाहता कोथरूड, हिंजवडी, हडपसर, लुल्लानगर, बाणेर, विधी महाविद्यालय रस्ता अशा वातानुकुलीत शाखा त्यांनी सुरू केल्या. टोपलीत सुरू झालेल्या या धंद्याला कोंढरे यांनी परिश्रमपूर्वक विस्तारत नेलं आणि आता तर त्याला एका मोठय़ा उद्योगाचंच स्वरूप आलं आहे.
या धंद्याचं ठळक वैशिष्टय़ म्हणजे कोंढरे हेच या सर्व दुकानांचं व्यवस्थापन करतात. त्यांच्या या भेळेच्या उद्योगात आता ऐंशी-नव्वद कामगार आहेत. कोंढरे यांचं एकच कुटुंब पूर्वी भेळेच्या या व्यवसायावर अवलंबून होतं. आता नव्वद कुटुंबं या व्यवसायावर अवलंबून आहेत. मसाले आजही कोंढरे यांच्याच देखरेखीखाली तयार होतात. त्यामुळे ‘कल्याण भेळे’ची चव वर्षांनुवर्षे टिकवून ठेवण्यात त्यांना यश आलेलं आहे.
त्यांच्या उद्योगातील मर्यादा ओळखून रमेश कोंढरे यांनी भेळेसह सर्व पदार्थ पॅकिंगच्या स्वरूपात बाजारात आणले आता त्यांची चौदा उत्पादनं बाजारात आली आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातही या इन्स्टंट पदार्थाचा चांगलाच जम बसला आहे. केवळ देशातच नाही, तर परदेशातही ही चव पोहोचली आहे. या उत्पादनांसाठी रमेश कोंढरे यांनी एक कारखानाही सुरू केला आहे आणि त्याची सर्व जबाबदारी कोंढरे यांचा मुलगा गिरीश याच्यावर आहे. गिरीश ही या व्यवसायातली पुढील पिढी. अर्थात सत्तरीच्या घरात असलेल्या आईचं आणि त्यांची पत्नी मंदा यांचंही लक्ष धंद्यावर घरातून आहे.
भेळेच्या व्यवसायातही किती मोठी प्रगती होऊ शकते याचं उदाहरण म्हणजे ‘कल्याण भेळ.’ त्याहीपेक्षा महत्त्वाचं हे की, व्यवसायात मिळालेल्या यशाची, पैशांची, रोज होत असलेल्या लक्षावधीच्या व्यवहाराची, मालकीच्या जागांची, आलेल्या श्रीमंतीची हवा या माणसाच्या डोक्यात जराही गेलेली नाही.
नेहमी पांढरा पायजमा, पांढरा शर्ट आणि डोक्यावर गांधी टोपी अशा पेहेरावातील कोंढरे हे ‘कल्याण भेळ’ नामक एका मोठय़ा उद्योग-व्यवसायाचे मालक आहेत, हे सांगूनही अनेकांचा विश्वास बसणार नाही, इतका हा माणूस साधा आहे. एकीकडे लाखो-कोटींची उलाढाल करत दुकानांची साखळी बांधत गेलेलं हे कुटुंब कित्येक वर्षे ‘हमालनगर’मध्येच राहत होतं. ‘आधी दुकानं वाढवू या. घर करता येईल नंतर!’ ही भावना त्यामागे होती. त्यामुळेच कोंढरे यांचे पाय आज यशस्वीतेनंतरही जमिनीवरच आहेत.