शरद पवार साखर कारखान्याच्या भूमीपूजनाला आले आणि त्याऐवजी आयटी पार्कची घोषणा केली !

सह्याद्रीच्या डोंगररांगा, मुसळधार पाऊस, नद्या, भातशेती आणि सभोवताली हिरवीगार वनराई असा मुळा नदीच्या खोऱ्यातील निसर्गसंपन्न परिसर म्हणजे मुळशी तालुका ! दोन दशकांपुर्वी या मुळशी तालुक्यातील हिंजवडी हे दिडेक हजार लोकसंख्या असलेलं गाव ! जवळच्या पुणे शहरात दुध आणि भाजीपाला विकणे हा इथल्या लोकांचा व्यवसाय होता. त्यातुन वेळ मिळाला की कुस्त्यांचे मैदान गाजवायचे ही इथल्या लोकांची परंपरा होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातही या हिंजवडी गावाचा उल्लेख आढळतो.

साधारणपणे १९९२-९३ चा काळ असेल, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार या हिंजवडीच्या माळावर श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे भुमीपुजन करण्यासाठी आले होते. भुमीपुजनाचा नारळ फोडुन झाला. साहेब मुख्य सभेच्या मंडपात आले. मंडपात बसल्या बसल्या त्यांनी आसपासच्या विस्तीर्ण माळरानावर नजर फिरवली. सभोवतालचा परिसर पाहुन त्यांच्या डोक्यात विचारचक्र सुरु झाली. ज्यावेळी पवार भाषणाला उभे राहिले तेव्हा मोठ्या निर्धारपुर्वक त्यांनी उपस्थित लोकांना आपल्या मनातील विचार सांगितला. “या ठिकाणी साखर कारखान्याच्या भुमीपुजनाचा नारळ जरी फोडला गेला असला, तरी इथे कारखाना होणार नाही. कारखान्यासाठी तुम्हाला महिन्याच्या आत दुसऱ्या ठिकाणी जागा देतो. याठिकाणी भविष्यात आयटी पार्कच उभा राहील.”

…आणि १९९८ मध्ये MIDC च्या माध्यमातुन हिंजवडी येथे राजीव गांधी आयटी पार्क उभा राहिला. लवकरच १९९७-९८ मध्ये जवळच्या कासारसाई येथे श्री संत तुकाराम साखर कारखानाही उभा राहिला.

शरद पवार यांच्या एका दुरगामी निर्णयामुळे हिंजवडीची खेडेगाव ते आयटी हब अशी ओळख आज निर्माण झाली आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये अनेक देशीविदेशी आयटी कंपन्या आणि बायोटेक पार्क आल्यामुळे इथल्या जमिनींना भाव आले. रोजगाराच्या निमित्ताने येणाऱ्या लोकांना निवासासाठी स्थानिक नागरिकांनी मोठमोठ्या इमारती उभ्या केल्या. शॉपिंग मॉल, सर्व्हिस व्यवसाय सुरु केले. दरम्यान हिंजवडीच्या लोकसंख्येत वाढ होऊन ती ११४८८ पर्यंत पोहोचली.

हिंजवडी आयटी पार्कला आज पुण्याचे Growth Engine तसेच Land Of Opportunity म्हणुन ओळखले जाते. आज इथल्या २८०० एकर पेक्षा जास्त क्षेत्रामध्ये १५० हुन अधिक आयटी कंपन्या आहेत. ३०००० कोटींहुन अधिक उलाढाल आयटी पार्कच्या माध्यमातुन होते. विशेष सांगण्याची बाब म्हणजे या आयटी पार्कमुळे तीन लाखांहुन अधिक युवकांना इथे रोजगार मिळाला आहे.

हिंजवडीला आलेल्या या आर्थिक वैभवामुळे इथला शेतकरी वर्ग मात्र कमी झाला असुन गुंठामंत्री नावाचा नवा वर्ग उदयाला आला आहे. याबाबत चिंता व्यक्त करताना शरद पवारांनी इथल्या लोकांना जमिनी न विकण्याचे आवाहन केले आहे. जमीन विकली तर पुढच्या पिढ्यांचे भवितव्य अंधारात जाईल, कारखाने निघतील पण काळ्या आईला बाजारात आणण्याचे टाळले पाहिजे अशी भावनिक साद त्यांनी इथल्या लोकांना घातली आहे. इथल्या स्थानिकांनी तेव्हा केलेल्या सहकार्यामुळे आयटी पार्कची निर्मिती होऊ शकली अशी भावना शरद पवार व्यक्त करतात.

मात्र एवढे असुनही याच आयटी कंपन्यांमध्ये नोकरी करुन घर चालवणारे आजचे टेक्नोसॅव्ही युवक शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले असले प्रश्न उपस्थित करतात, तेव्हा त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.

-अनिल माने(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.