झंझावाती राजकारणी ते हळवा कलावंत…

एक झंझावात किंवा वादळ म्हणा हवं तर. राज ठाकरे यांचं नुसतं नाव उच्‍चारलं तरी मराठी माणसाच्‍या (बहुतांश) मनात मराठीचा स्‍वाभिमान जागा होतो. तर अमराठी विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहारींच्‍या मनात रागाची किंवा द्वेषाची भावना. अनेक वर्ष राखेखाली धगधगत असलेल्‍या मराठीच्‍या मुद्याला राज यांनी फुंकर घातली आणि नवनिर्माणाचे आंदोलन उभे राहिले.

जहाल राजकारणी म्हणून सर्वपरिचित असलेल्‍या राज ठाकरे यांच्‍यात एक हळव्‍या मनाचा कलावंतही दडला आहे. हे फार कमी जणांना ठावूक असेल. त्‍यांना महाराष्‍ट्राच्‍या सांस्‍कृतिक वर्तुळातही मानाचे स्‍थान आहे. राज यांच्‍या या व्‍यक्तीमत्वाबद्दल… …

कणखर आणि खंबीर राजकारण्‍यामागे एक हळूवार मनाचा कलावंतही दडलेला आहे. हे ब-याच कमी जणांना माहीत असावं. महाराष्‍ट्राच्‍या राजकारणात ठाकरे कुटुंबीय जितके जहाल आणि वादग्रस्‍त म्हणून ओळखले जातात. तितकाच त्‍यांना महाराष्‍ट्राच्‍या सांस्‍कृतिक वर्तुळातही मानाचे स्‍थान आहे. ठाकरे घराण्‍यातून रक्तातच उतरलेला हा कलेचा गूण राज यांच्‍यासाठी तरी कसा अपवाद ठरणार.

अवघ्‍या महाराष्‍ट्राचे वैचारिक प्रबोधन करणा-या प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्‍या विचारांचे बाळकडू आणि बाळासाहेब ठाकरे यांच्‍यातील जहाल राजकारण्‍याचा वारसा घेऊन वाढलेल्‍या राज यांच्‍यावर लहानपणापासूनच कलेचे संस्‍कारही झाले आणि म्‍हणूनच राज हे राजकारण्‍या इतकेच व्‍यंगचित्रकार म्हणूनही सर्वपरिचित आहेत.

राज यांचे पिताश्री स्‍व.श्रीकांत ठाकरे हे स्‍वतः मराठीतील एक चांगले संगीतकार होते. तर काका बाळासाहेब ठाकरे हे मार्मिक व्‍यंगचित्रकार.

श्रीकांत आणि कुंदा ठाकरे यांच्‍या पोटी 14 जून 1968 रोजी जन्‍मलेल्‍या राज यांचे शिक्षण मध्‍य मुंबईतील बाल मोहन विद्या मंदिरात झाले. लहानपणापासून चित्रकलेची आवड असलेल्‍या राज यांनी महाविद्यालयीन शिक्षण सर जे.जे स्‍कूल ऑफ आर्ट्समधून घेतले. वॉल्ट डिस्ने हे त्यांचे प्रेरणास्थान आहे. तसेच चित्रपट निर्मिती व फोटोग्राफी यातही राज ठाकरे यांना रस आहे.

आपण राजकारणात आलो नसतो तर नक्कीच वॉल्ट डिस्ने स्‍टुडिओसाठी कार्टून केले असते असे ते नेहमी म्हणतात. चित्रपट निर्मिती आणि फोटोग्राफीचीही त्‍यांना आवड आहे. राज यांचा हा गुण त्यांच्‍या मुलातही उतरला आहे. तर चुलत भाऊ उध्‍दव एक चांगला फोटोग्राफर आहे. उध्‍दवचा मुलगा आदित्‍य उत्तम कवी आहे.

मराठीतील प्रख्‍यात अभिनेते मोहन वाघ यांच्‍या कन्‍या शर्मिला यांच्‍याशी राज यांचा विवाह झाल्‍याने तिकडूनही त्यांची कलेशी नाते जोडले गेले आहे.

एक कलावंत अणि व्‍यंगचित्रकार म्हणून महाविद्यालयीन काळात आपल्‍या करीअरकडे पाहणा-या राज यांनी नंतर राजकारणात उडी घेतली. शिवसेनेच्‍या माध्‍यमातून भारतीय विद्यार्थी सेना, शिव उद्योग सेना या संघटनांची बांधणी करणा-या राज यांनी नंतरच्‍या काळात शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेची स्‍थापना केली. मराठीच्‍या मुद्यावरून देशभर रान पेटविणा-या आणि लोकसभा निवडणुकीत राज्यातील तगड्या पक्षांनाही घाम फोडणा-या राज आता राजकारणात पूर्णवेळ बिझी असले तरीही त्यांच्‍यातील कलावंत त्यांनी जपून ठेवला आहे. म्हणूनच आपल्‍या पक्षाची वेबसाईट तयार करताना त्यात एक कप्‍पा व्‍यंगचित्रांसाठी ठेवण्‍यास ते विसरले नाहीत.

राजकीय वाटचाल-

ठाकरे कुटुंबात जन्मल्यामुळे लहानपणापासूनच राज ठाकरे यांना बाळ ठाकरे यांच्याकडून राजकारणाचे धडे मिळाले. ते अजूनही बाळ ठाकरे यांना आपले दैवताचे स्थान देतात. आपली राजकीय कारकीर्द त्यांनी शिवसेनेतच सुरू केली. उमदे प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून राज ठाकरे यांनी स्वतःला समर्थकांचा मोठा पाठिंबा मिळवला, असे दिसते आहे.

शिवसेनेला तरुणांचा बळकट पाठिंबा मिळ्वण्यात राज ठाकरे यांचा वाटा महत्त्वाचा समजला जातो. बाळ ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेची सूत्रे कोण वाहणार यावर एके काळी राज ठाकरे याच्याकडेच बोट दाखवले जायचे शिवसेनाप्रमुखांनी कार्यध्यक्षपदी आपले पुत्र उद्धव ठाकरे यांची नियुक्ती केली त्यामुळे राज ठाकरे समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष झाला.

राज ठाकरे यांना डावलल्याची भावना शिवसैनिकांमध्ये होती. इ.स २००६, च्या मार्च महिन्यात शिवसेनेमध्ये आपल्याला व आपल्या समर्थकांना दुजाभावाची वागणूक मिळत असल्याच्या कारण सांगून राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला व काही दिवसांतच शिवसेना पूर्णपणे सोडत असल्याची घोषणा केली. तसेच महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक परिस्थिती सुधारण्याचे व महाराष्ट्रात मराठी भाषेची पत ढळू दिली न जाता तिची उन्नती करण्याचे प्रयत्‍न करीन, अश्या प्रकारचा राज ठाकरे यांच्या सुरुवातीच्या भाषणांचा सूर होता.

पक्ष स्थापना –

राज ठाकरे यांनी ९ मार्च २००६ रोजी ” महाराष्ट्र नवनिर्माण सेना ” ह्या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र प्रदेश, आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे या पक्षाचे प्रमुख ध्येय आहे. महाराष्ट्र राज्य व मराठी भाषा, महाराष्ट्रासंबंधीचे ज्ञान व महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास (भौतिक व सांस्कृतिक) या गोष्टींचा विचार हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तत्त्वांचा मूळ गाभा आहे.

उत्तरप्रदेशी व बिहारी लोकांवरील टीका –

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांमध्ये मुंबईमध्ये येणार्‍या लोंढ्यांवर लक्ष वेधले, मुंबई अगोदरच बकाल झाली असून हे लोंढे असेच येत राहिल्यास परिस्थिती अजून बिघडेल, असा इशारा देत त्यांनी उत्तर प्रदेशी व बिहारी लोकांवर आपला शाब्दिक हल्ला चढवला.

त्यांच्या राज्यांतील राजकारण्यांमुळे त्या राज्यात रोजगार निर्माण झाला नाही, आणि त्यामुळे तेथील नागरिक सर्व भारतभर रोजगार शोधत फिरतात. त्यांतील सर्वांत जास्त लोंढा महाराष्ट्रात व मुंबईत येतो. त्या राज्यांच्या नाकर्तेपणाचा महाराष्ट्रातील जनतेने का भुर्दंड भ‍रावा? असा सवाल करत तेथील राजकारण्यांवर टीका केली.

लालूप्रसाद व पासवान यांच्या भाषणांचा दाखला देत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव आहे असा राजकीय आरोपही त्यांनी केला. बाहेरच्या राज्यातील नागरिक महाराष्ट्रात येऊन येथील स्थानिक लोकांच्या नोकर्‍यांच्या संधी कमी करतात. परंतु बिहारी व उत्तरप्रदेशी नागरिक महाराष्ट्रात येउन येथील सामाजिक वातावरणही गढूळ करतात असा आरोप करत, हे नागरिक महाराष्ट्रात येऊन मराठी शिकत नाहीत, त्यांच्याशी बोलताना हिंदीतच बोलावे लागते हा सर्वसामान्य लोकांच्या अनुभव आहे असे सांगत त्यांनी मराठी भाषकांची भाषिक अस्मिता जागृत करण्याचा प्रयत्‍न केला.

जपान, फ्रान्स, जर्मनी या देशातील तसेच तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यातील भाषाप्रेमाचे दाखले देत, ह्या देशांत तसेच राज्यात बाहेरून नागरिक आला तर त्याला स्थानिक भाषा शिकावीच लागते. फक्त, उत्तर प्रदेशी व बिहारी नागरिक येथील भाषा का शिकत नाहीत? येथील मराठी संस्कृतीत सामील होत नाहीत व उलटे मराठीला हीन लेखत त्यांच्या राज्यातील कुप्रसिद्ध गुंडशाही येथे आणतात. अशा प्रकारची आरोपवजा टीका राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांतून व मुलाखतींतून स्पष्टपणे केली.

राजा जर कलागुणांचा चाहता असेल तर त्या राज्‍याचा उत्कर्ष लवकर होतो, असे पूर्वीच्‍या काळी म्हटले जात असे आणि म्हणूनच कलेला राजाश्रय मिळावा असा प्रयत्‍न केला जाई. आधुनिक काळात राजप्रथा संपली असली तरीही हेच सुत्र राज्यकर्त्‍यांना लागू होऊ शकते. म्हणूनच मराठी माणसाला त्यांच्‍यातील राजकारण्‍यासोबतच कलावंतही तितकाच जवळचा वाटतो.

विकास शिरपूरकर

Comments 2

  1. pravin says:

    1 no

  2. Sunil More says:

    Wow great..Raj is truly Artist..and a young politician…. We love him..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.