शाब्बास रे पठ्ठ्यांनों! पुण्यात निकालाआधीच लागले ‘या उमेदवाराच्या’ विजयाचे बॅनर

विधानसभा निवडणुकीचं मतदान आज पार पडलं सगळ्यांना आता निवडणुकीच्या निकालांची उत्सुकता लागली आहे. मतदान पार पडल्यानंतर लगेचच सर्वच वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल दाखवले. या एक्झिट पोलमध्ये महायुतीला मोठं यश मिळताना पाहायला मिळत आहे. एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युती पुन्हा एकदा राज्यात सत्ता स्थापन करणार असल्याचं दिसून येत आहे.

विविध एक्झिट पोलनी दर्शविलेला आकडेवारीनुसार भाजप शिवसेना महायुतीच्या १६६-२४० जागा येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाआघाडीला मात्र यावेळेस देखील निराशाच पदरी पडणार असल्याचे एक्झिट पोलमधून दिसत आहे. महाआघाडीच्या जागा या ८० पर्यंत जाऊ शकतात असे यामध्ये सांगण्यात आले आहे.

असे असले तरी पुण्यात मात्र एक अजबगजब प्रकार बघायला मिळाला. सर्वत्र भाजपची हवा एक्सिट पोल दाखवत असले तरी पुण्यातील एका उमेदवाराचे विजयाचे बॅनर हे मतदान पार पडल्यानंतरच लागले आहेत. पुणे तिथे काय उणे या म्हणीला साजेशी हि गोष्ट पुण्यातच घडू शकते.

पुण्यात २०१४ च्या मोदी लाटेत ८ हि मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आले. यावेळेस युती झाली आणि भाजपने हे ८ हि मतदारसंघ आपल्याकडे ठेवले. शिवसेनेला पुण्यात एकही जागा मिळाली नाही. पुण्यातील कोथरूडच्या जागेवरून राज्यभर चर्चा झाली. कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे या मतदारसंघातून उभे राहिले. त्यांना मनसेच्या किशोर शिंदे यांनी आव्हान दिले. शिंदेंना आघाडीने पाठिंबा देत लढत रंगतदार करण्याचा प्रयत्न केला.

आता येथून काय निकाल लागतो हे २४ लाच कळेल. मात्र खडकवासला मतदारसंघाचा निकाल आजच कार्यकर्त्यांनी जाहीर करून टाकला आहे. कारण इथून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवलेल्या सचिन दोडके यांच्या विजयाचे बॅनर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आजच लावले आहेत. एवढेच नाही तर फटाके फोडून आजच जल्लोष देखील करण्यात आला.

कोण आहेत सचिन दोडके?

सचिन दोडके हे सलग तीन टर्म ते नगरसेवक आहेत. वारजे, कोथरुड धनकवडी, सिंहगड आणि खडकवासलाचा भाग या मतदारसंघात येतो. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मतदारसंघात दोडके समर्थकांच्या या विश्वासाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरशीची लढाई आहे.

भाजपाकडून विद्यमान आमदार भीमराव तापकीर रिंगणात होते. सचिन दोडके हे नगरसेवक असून पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत आहेत. २००९ साली मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे इथून निवडून आले. तेव्हापासून राष्ट्रवादीला खडकवासलामध्ये आपला आमदार निवडून आणता आलेला नाही. रमेश वांजळे यांचे अकाली निधन झाल्यानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. त्यावेळी भीमराव तापकीर पहिल्यांदा निवडून आले.

विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार व विद्यमान आमदार हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे या खडकवासला विधानसभा मतदारसंघातून 50 हजाराहून अधिक मतांनी पिछाडीवर होत्या. या पार्श्वभूमीवर दोडके समर्थकांचे विजयाचे बॅनर चर्चेचा विषय ठरले आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.