महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. त्यामध्ये कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याचे सिद्ध झाले आहे. भाजपला १०५ जागा, शिवसेनेला ५६ जागा, राष्ट्रवादीला ५४ जागा, काँग्रेसला ४४ जागा, तर अपक्ष, इतर आणि मनसे मिळून २९ जागा असा निकाल हाती आला आहे. त्यामुळे भाजपचे स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न भंगले आहे. अशा परिस्थितीत कोण सत्ता स्थापन करु शकतो याचे काही अंदाज याठिकाणी देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
१) भाजप-शिवसेना महायुती –
भाजपला १०५ जागा आणि शिवसेनेला ५६ जागा मिळाल्याने भाजप आणि शिवसेना या युतीला १६१ जागांचे पूर्ण बहुमत मिळत आहे. परंतु ज्याप्रकारे भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये गेल्या पाच वर्षात कलगीतुरा पाहायला मिळाला त्याअर्थी शिवसेना यावेळेस भाजपला सत्ता स्थापन करताना चांगलेच उट्टे काढण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणूक शिवसेनेच्या दृष्टीने महत्वाची असून सध्या तरी त्याठिकाणी भाजप हाच त्यांचा प्रमुख विरोधक असल्याने उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात ते पाहण्यासारखे आहे.
२) शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस युती/आघाडी –
शिवसेनेच्या ५६, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ आणि काँग्रेसच्या ४४ जागा अशा एकत्र केल्यास संख्याबळ १५४ होते. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याच्या अटीवर शिवसेनेसमोर हा पर्याय उपलब्ध आहे. काँग्रेसने सत्तास्थापन करण्यासाठी शिवसेनेला समर्थन देण्याची भूमिका घेतली आहे.
राष्ट्रवादीची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. तरीही भाजपला दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
३) भाजप-राष्ट्रवादी –
भाजपला मिळालेल्या १०५ जागा आणि राष्ट्रवादीच्या ५४ जागा पाहता दोन्ही पक्ष एकत्र आल्यास राज्यात सत्तास्थापन करु शकतात. २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपला स्थिर सरकार चालवण्यासाठी बाहेरुन पाठिंबा देण्याची भूमिका यापूर्वीही घेतली होती. परंतु एकंदर ईडी चौकशी आणि प्रचारकाळातील आरोप प्रत्यारोप पाहता राष्ट्रवादी यावेळेस भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणार याविषयी शंका नाही.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.