आजच्या धावत्या जगात वाहन ही प्रत्येकाची गरज बनली आहे. प्रत्येक कुटुंबात किमान एक तरी वाहन आज आपल्याला पाहायला मिळते. आजच्या परिस्थितीमध्ये चार चाकी बरोबरच दुचाकी वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. पेट्रोलपेक्षा डिझेलचे दर कमी असतात त्यामुळे कार घेताना डिझेलवर चालणाऱ्या कारला लोक पसंती देतात.
परंतु बाईक घेताना पेट्रोल की डिझेल असा पर्याय उपलब्ध नसतो. कधीकाळी आलेल्या राजदूतसारख्या गाड्या रॉकेलवरही चालायच्या, पण आताच्या सर्व बाईक पेट्रोलवरील असतात. गाड्यांच्या वाढत्या संख्येमुळे गाडीत चुकीचे इंधन भरण्याच्या घटनाही सर्वसाधारण झाल्या आहेत. अशा चुका झाल्यानंतर काय करायचे ते आपण आज जाणून घेणार आहोत…
पेट्रोल ऐवजी डिझेल भरले तर…
मुख्यतः पेट्रोल गाड्यांचे आणि डिझेल गाड्यांचे इंजिन वेगवेगळे असते. पेट्रोल गाड्यांमध्ये गाडी चालू करण्यासाठी स्पार्किंग प्लग असतात तर डिझेल गाड्यांमध्ये फ्युएल इन्जेक्टर असतात. डिझेल हे पेट्रोलपेक्षा जड असते. आपल्या दुचाकीत चुकून डिझेल भरले गेले तर त्वरित गाडीच्या इंधनाची टाकी रिकामी करावी.
इंधनाची पाईप आणि कार्बोरेटर स्वच्छ करावा. तुम्ही जर तसेच डिझेलवर दुचाकी चालवण्याचा प्रयत्न केला गाडी चालू होणार नाही आणि झालीच तर इंजिनवर जोर पडून इंजिनातून मोठा आवाज येईल. मोठ्या प्रमाणावर धूर येईल आणि गॅस्केट जाळून जाईल. इंजिन गरम होऊन निकामी देखील होऊ शकते.
डिझेल ऐवजी पेट्रोल भरले तर..
डिझेल गाडीमध्ये चुकून पेट्रोल भरल्यानंतर आपल्याला लगेचच त्याचा अंदाज येत नाही. पेट्रोल हे डिझेलपेक्षा अधिक ज्वलनशील असते. त्यामुळे ते लगेचच पेट घेते आणि गाडी लगेच चालू होते. परंतु काही अंतर गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल की गाडीमध्ये चुकीचे इंधन भरले गेले आहे.
अशावेळी घाबरुन जाऊ नये. गाडी बंद करावी आणि मेकॅनिकच्या मदतीने इंधनाची टाकी साफ करावी आणि इंजिनाच्या ज्या भागात पेट्रोल गेले असेल ते ड्रेन करून घ्यावे. असे केले तर गाडीच्या इंजिनाला काही नुकसान होणार नाही.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.