८० च्या दशकात आपल्या मराठमोळ्या सौंदर्याने हिंदी चित्रपट सृष्टीत स्वतःचे वेगळेच स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये पद्मिनी कोल्हापुरे यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या पद्मिनी कोल्हापुरेंना १९८२ च्या प्रेमरोग चित्रपटातील अभिनयाबद्दल सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला होता.
अत्यंत कमी काळात बॉलिवूडच्या शिखरावर विराजमान होणाऱ्या पद्मिनी कोल्हापुरे मधल्या काळात चित्रपटांपासून काहीशा दूर होत्या, परंतु तब्बल ६ वर्षांच्या विश्रांतीनंतर त्या पुन्हा चित्रपटात दिसणार आहेत.
लता मंगेशकरांनी दिली ही खुशखबर
गानसम्राज्ञी लता मंगेशकरांनी ट्विटरवर ट्विट करुन ही माहिती दिली आहे. पद्मिनी कोल्हापुरे “पानिपत” चित्रपटातून पुनरागमन करणार असून त्यांनी “गोपिकाबाई” ही भूमिका साकारली आहे.
आशुतोष गोवारीकरांचा हा चित्रपट ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. १७६१ मधील पानिपत युद्धावर हा चित्रपट आधारित आहे. सहा वर्षांपूर्वी “फटा पोस्टर निकला हिरो” चित्रपटात त्या दिसल्या होत्या. नुकताच पानिपत चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, त्यात पद्मिनी कोल्हापुरे दिसून आल्या.
पद्मिनी कोल्हापूरचे आहेत बॉलिवूडमध्ये अनेक नातेवाईक
पद्मिनी या प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय संगीत गुरु पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे यांच्या कन्या आहेत. बॉलिवूड चित्रपट निर्माते प्रदीप शर्मा हे पद्मिनीचे पती आहेत. तर पद्मिनीची बहीण शिवांगी या बॉलिवूडमधील खलनायक अभिनेते शक्ती कपूर यांच्या पत्नी आहेत.
पद्मिनी या प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर हिची मावशी आहे. प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर या पद्मिनीला आपली भाची मानतात. पद्मिनीचे आजोबा कृष्णराव कोल्हापुरे हे नाटकात वेगवेगळ्या भूमिका करायचे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.