MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र

आज दुपारी “टीव्ही 9 मराठी”च्या फेसबुक पेजवरती एक बातमी वाचली. “पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी युवती टी शर्ट चोरताना सापडली” अशी ती बातमी होती. पुण्यातील एफसी रोडवरील एका मार्केटमध्ये एक तरुणी टीशर्ट चोरल्याचा प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कसा कैद झाला आणि दक्षता पथकाच्या महिला पोलिसांनी त्या तरुणीला कसे ताब्यात घेतले इथपर्यंतचा सर्व घटनाक्रम या बातमीत दिला आहे.

पुढे बातमीदाराने “पुण्यात स्पर्धापरीक्षेच्या तयारीसाठी येणारे विद्यार्थी हलाखीत दिवस काढतात, त्यांना यशाने हुलकावणी दिली की ते हतबल होऊन घरी परततात, मात्र अशा चोरीच्या घटना क्वचितच घडतात” अशी टिप्पण्णी जोडली आहे.

खूप छान पत्रकारिता सुरु आहे. आता स्पर्धा परीक्षा हा विषय अशाच बातम्यांपुरता मर्यादित राहिला आहे हे पत्रकारांच्या लेखी म्हणता येईल. कारण स्पर्धा परीक्षेतील घोटाळा, कमी जागांची भरती, लांबलेली निवड प्रक्रिया, समांतर आरक्षणाचा प्रश्न, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या यासंबंधीच्या बातम्या या “बातमी” होऊ शकत नाही, असा पूर्वग्रह या लोकांनी करुन घेतला आहे.

FC रोडला टिवल्या बावल्या करत, सुंदर मुली बघत पत्रकारिता करता येते काय ? हाताला एखादी बातमी लागली आणि त्यात MPSC चा मसाला लावून पुढे पाठवली की न्यूज पोर्टलचे संपादक त्वरित त्या बातमीला सार्वजनिक करतील असा मोठा आशावाद यामध्ये दिसून येतो.

चोरीची घटना चुकीचीच ! पण अशा चोरीच्या घटना दररोज शेकड्याने घडत असतील. मागच्याच आठवड्यात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत कित्येकांची पाकिटे, मोबाईल लांबवल्याच्या चर्चा स्पर्धापरीक्षा केंद्रांच्या बाहेर चहाच्या टपरीवर सुरु होत्या. ही घटनासुद्धा तशीच सर्वसाधारण आहे. ती तरुणी चोरी करताना सापडली, विक्रेत्याने तिला पोलिसांच्या स्वाधीन केले, तिला शिक्षा होईल ना होईल प्रश्न संपला !

अशा गोष्टीची देखील बातमी करायला एखाद्या आळशी पत्रकारालाच आवडेल. किती किंमत असते टीशर्टची ? FC रोडला १०० रुपयांपासून टीशर्ट मिळतात. आता हीच बातमी दाखवून लोकांनी त्या मुलीची बदनामी केली किंवा तिचे लग्न मोडले तर कितीला पडेल ? मुलीने याची काळजी केली नाही, निदान पत्रकाराला तरी काय सामाजिक भावना असतात का नाही ?

पत्रकार महाशय तुमची बातमी होईल हो, पण तुमच्या याच बातमीमुळे पुण्यातील कित्येक दुकानदारांचा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल याची आपल्याला जाणीव आहे का ? तुमच्या एका बातमीमुळे स्पर्धा परीक्षेच्या लोकांनी इतरांच्या संशयाच्या नजरा का झेलायच्या ?

बरं आपण पूर्वी ज्या वृत्तवाहिनीसाठी काम करत होता, तिथले काही पत्रकार लोक एका मोठ्या हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेसाठी गेले असताना हॉटेलमधील चमचे चोरताना रंगेहाथ सापडले होते याची दबक्या आवाजात चर्चा केली जाते, पण त्याची बातमी कशी होत नाही ? पत्रकार मंडळींचे सगळं सोयीने सुरु असतं का ?

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न अनेक आहेत. कुठला पत्रकार या विद्यार्थ्यांना भेटायला तयार नाही. ते प्रश्न समजून घेऊन त्यांना माध्यमात स्थान द्यायला तयार नाही. स्पर्धापरीक्षा करणारे लोक चोरी करतात ही बातमी होऊ शकते, पण तेच विद्यार्थी स्पर्धापरीक्षेसंबंधी काही प्रश्न मांडत असतात, मागण्या करत असतात किंवा सरकारच्या चुकीच्या धोरणांवर मत मांडत असतात, तेव्हा असले पत्रकार कुठे बिड्या फुंकत असतात ?

बातम्या देताना तरी जरा सामाजिक भान ठेवत जा. देशात काय चाललंय, राज्यात काय चाललंय आणि त्याचा सर्वसामान्य लोकांच्या जीवनावर कसा परिणाम होत आहे ते बघा. एका पत्रकाराला आपण पत्रकार आहात, गावच्या पारावर बसून गावाचं कुटाळ सांगणारा खबऱ्या नाही ही जाणीव करुन देण्याची वेळ येऊ नये ही अपेक्षा.

एक स्पर्धा परीक्षार्थी, पुणे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Comments 1

 1. Nikhil Dehankar says:

  Our media system is thrid class.
  They just want TPR and for that they will show any thing.
  And as they have rights to speak and show they are ready to show anyting. No one is going in detail and analysing issue.
  Fake media, worst news.
  Thanks khasre for this artical.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.