निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन चार दिवस झाले आहेत. त्यामुळे आता सत्ता स्थापनेच्या घडामोडीना वेग आला आहे. सत्ता स्थापनेसाठी महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र आहे. सेना ५०-५० च्या फॉर्मुल्यावर ठाम असून भाजप सेनेला मुख्यमंत्रीपद द्यायला तयार नाहीये.
याच पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिवसेनेकडून दबावाचं राजकारण केलं जात आहे. सत्तेच्या वाटाघाटीत आपलं सामर्थ्य वाढावं यासाठी दोन्ही पक्ष अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवताना दिसत आहेत.
विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. शिवसेना, भाजपाच्या महायुतीला 161 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे महायुती सत्ता स्थापन करू शकते. मात्र सरकारमध्ये समान वाटा मिळावा, असा आग्रह शिवसेनेनं धरला आहे. सत्तेचं समान वाटप करा, अन्यथा अन्य पर्याय खुले आहेत, असं म्हणत शिवसेनेनं भाजपावर दबाव टाकला आहे.
यापूर्वी भाजपला अपक्ष आमदार रवी राणा, राजेंद्र राऊत, गीता जैन, विनोद अग्रवाल यांनी पाठिंबा दिला आहे. तर सेनेला देखील प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू आणि अजून ४ आमदारांनी पाठिंबा दिला आहे.
राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर आमदार झालेल्या नेत्याचा सेनेला पाठिंबा-
क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नेवासाचे आमदार शंकरराव गडाख आणि त्यांचे बंधू प्रशांत गडाख यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेला पाठिंबा दर्शविला आहे.
शंकरराव गडाख आणि त्यांचे बंधू प्रशांत गडाख यांनी मुंबईत मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. शंकरराव गडाख यांनी यावेळी पाच वर्ष शिवसेनेसोबत राहणार असल्याचं सांगितलं. सहयोगी सदस्य म्हणून शिवसेनेला पाठिंबा देत असल्याचं पत्र उद्धव ठाकरे यांना देण्यात आल्याचं गडाख यांनी सांगितलं.
शंकरराव गडाख यांनी नेवासामधून क्रांतिकारी शेतकरी पक्षातर्फे निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादीने त्यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून पाठिंबाही दिला होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गडाख यांच्यासाठी प्रचारही केला होता. पण त्यांनी आता राष्ट्रवादीसोबत जाण्याऐवजी वेगळा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीसाठी हा सर्वात मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
दरम्यान ग्रामीण भागातील प्रश्न सत्ताधाऱ्यांसोबत राहूनच सोडवता येत असल्याने मी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेसोबत राहून शेती आणि बेरोजगारीचे प्रश्न सोडवण्यावर भर देणार असल्याचं गडाख यांनी स्पष्ट केलं.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.