गुजरात विधानसभा निवडणुकांच्या प्रचारकाळात मशरुम हा विषय बराच चर्चेत आला होता. गुजरातमधील ओबीसी नेते अल्पेश ठाकोर यांनी “प्रधानमंत्री झाल्यापासुन नरेंद्र मोदी गोरं होण्यासाठी तैवानवरुन मशरुम मागवतात. मोदी दररोज ४ लाख रुपयांचे मशरुम खातात. महिन्याला त्यांच्या मशरुमचा खर्च १ कोटी २०या लाख रुपये आहे, इत्यादी…”असा आरोप केला होता. ते काही असो, पण मशरुम खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. बाजारात मशरुम खरेदी करायचं म्हणलं की त्याची किंमत १२०० रुपये प्रति किलोपर्यंत आहे. परंतु थोडेसे लक्ष देऊन काम केलं तर केवळ ३०० रुपयांच्या सामग्रीमध्ये तुम्ही हेच मशरुम घरच्या घरी पिकवू शकता. कसे ते पाहूया…
घरच्या घरी मशरुमची लागवड करण्यासाठी काय साहित्य लागेल ?
घरच्या घरी २ किलो मशरुम पिकवण्यासाठी सर्वप्रथम १ किलो गहू किंवा तांदूळ काढून झाल्यानंतर उरणार भुस्सा, १०० ग्रॅम मशरुमचे बीज, १० लिटर पाणी, थर्मामीटर, पारदर्शक प्लास्टिक पिशवी, बकेट, थर्माकॉल, इत्यादी साहित्य गोळा करा.
कसे पिकवायचे घरीच मशरुम ?
सर्वात आधी गव्हाचा किंवा तांदळाचा भुस्सा किटाणूमुक्त करण्यासाठी पाण्यात ७० डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत उकळून घ्या. त्यानंतर सगळा भुस्सा बकेटमध्ये पाणी घेऊन दोन तास भिजायला ठेवा. बकेट थर्माकॉलने बंद करा. दोन तासानंतर हा भुस्सा बाहेर काढून ६-७ तासांसाठी सावलीत सुकायला ठेवा. भुस्सा सुकल्यानंतर मशरुमचे बीज त्यात मिसळून तीन वेगवेगळ्या प्लास्टिक पिशव्यांत भरुन ठेवा. ओलावा आत जाणार नाही अशा पद्धतीने प्लास्टिक पिशवी बंद करा. त्यानंतर त्या पिशवीला १०-१५ छिद्र पाडा.
या पिशव्या २५ अंश सेल्सिअस तापमानाला अंधाराच्या ठिकाणी १५-२० दिवसांसाठी ठेऊन द्या. पिशव्यांना पांढरा रंग येईल, पण दुसरा रंग आला तर ही प्रक्रिया परत करा. त्यानंतर या पिशव्या गॅलरीत ठेवा. जोपर्यंत पिशव्यांत मशरुम उगवत नाहीत तोपर्यंत त्यावर दिवसातुन ४-५ वेळा पाण्याचा स्प्रे मारत रहा. उगवलेले मशरुम मुळापासून तोडा आणि खाण्यासाठी वापरा. अशा पद्धतीने दोन किलो मशरुमची सामग्री तुम्हाला ३०० रुपयात मिळेल.