मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने…
मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांबाबत सरकारने मराठ्यांना आणि विधानभवनात लेखी निवेदन दिले आहे. त्यात जे काही मान्य केलेलं आहे ते मिळवल्याशिवाय तर रहायचं नाहीच, परंतु एवढ्या वरवरच्या मलमपट्टीवर मराठा समाज अजिबात समाधानी नाही हे सरकारलाही ठासुन सांगायचे आहे.
आज एका वर्षात मोर्चांमधुन “कही खुशी कही गम” याप्रमाणे जे काही यश हातात आलं आहे ते घेऊन पुढे अजुन खुप काही मिळवण्यासाठी टिकुन रहायचं आहे. विद्यार्थ्यांच्या आरक्षण, शिष्यवृत्ती, वसतिगृह, कौशल्य विकास कार्यक्रम अशा प्रश्नांना प्राधान्याने समोर ठेवुन खुप काम करायचे आहे. समाजाच्या मागण्यांबाबत कुठल्याही गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी समाजातील अभ्यासु लोकांनी काही विषय हाती घेण्यासाठी पुढं आलं पाहिजे. त्याच त्याच नेत्यांवर विसंबुन राहुन आपण आपला आत्मघात करतोय हे समजुन घ्या. समाजानेच आपापल्या पातळीवर सोडवता येण्यासारखे अनेक प्रश्न आहेत. तिथे नेतृत्वाची, नेत्यांची, पुढाऱ्यांची अजिबात गरज पडणार नाही. नेतृत्वाशिवायही लढुनही मराठा जिंकतो हा आपला इतिहास आहे.
मोर्चाच्या निमित्ताने जिजाऊ वंदना, महिलांना पुढाकार, एकीची वज्रमुठ अशा प्रतिकात्मक आणि समाजाच्या हक्कासाठी वेळप्रसंगी कुणालाही त्रास न देता एकत्र येण्याची भुमिका, अडचणीच्या काळात एकमेकांना सहकार्य, नोकरी-व्यवसायासाठी एकमेकांना मदत अशा प्रतिसदात्मक खुप चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. मोर्चाच्या निमित्ताने महिलांच्या मनात आपण विश्वासाची भावना निर्माण करु शकलो आहे. आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आणु शकलो आहे. आता समाजाचा पैसा समाजाच्या खिशात कसा जाईल याबाबत विचार करायला हवा. अनेक सामाजिक संस्था अनेक सामाजिक कार्यक्रम राबवतात, त्या कार्यक्रमांतुन किती आऊटपुट मिळते ते देखील तपासुन पहावं लागणार आहे, समाजात आऊटपुट देणारे कार्यक्रम कसे राबवले जातील याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. जे जे नेतृत्वासाठी पुढे पुढे करतील अशांना समाजाने आधीच खुप मागे सारुन पुढची वाटचाल सुरु केली आहे. आपला सर्वसामान्य भोळाभाबडा समाज कसाही असो आता त्यालाच धरुन रहा, त्याच्यासाठी टिकुन रहा, त्याच्याशी प्रामाणिक रहा; मग समाज तुम्हाला काहीच कमी पडु देणार नाही.
मोर्चा झाल्यानंतर मराठा समाजाने पराभवाच्या आणि नैराश्याच्या मानसिकतेत जायची तर अजिबात गरज नाही. इतक्या संख्येने एकत्र येऊनसुद्धा समाजाला काही मिळालंच नाही असा खुप नकारात्मक संदेश समाजात जाईल. पुन्हा समाज एकत्र यायला सुद्धा टाळेल. खुप कष्टाने सर्वसामान्य मराठ्यांनी हे आंदोलन उभे केले आहे. त्यांच्यासाठी तरी अजिबात खचायचं नाही. मराठा समाजाची जी मोठी ताकत यानिमित्ताने उभी राहिलेली आहे, ती अशीच सहजासहजी विरघळुन जाणार नाही यासाठी काही चांगल्या गोष्टी घेऊन आपल्याला पुढं जावंच लागणार आहे. हक्कासाठी मराठा समाज एवढ्या संख्येने एकत्र येऊ शकतो याची खात्री आता मराठा समाजाला आली आहे. मोर्चाच्या निमित्ताने जो इतिहास निर्माण केला आहे, त्या इतिहासाची फळं चाखण्यासाठी आणि अजुन खुप काही मिळवण्यासाठी इथुन पुढेही एकजुटीने रहा. समाजातील लोक व्यक्त होत असतील तर त्यांच्या भावनांना आवर घालण्याचा प्रयत्न सुद्धा करायला नको, पण त्याचबरोबर भावनातिरेकाने समाजाचे नाव बदनाम होईल अशी कोणतीही कृती आपल्याकडुन होणार नाही अशी स्वतःप्रत आचारसंहिताही प्रत्येकाने पाळुया.
आज महाराष्ट्रासह मुंबईतील मोर्चे संपले असतील, तरीही मराठ्यांच्या रक्तातील लढाऊ बाणा कधीच संपणार नाही. अरे मर के भी नही हटते वही तो मरहट्टे होते है…
#मराठासेवक #MarathaKrantiMorcha