आपण जर सोशल मीडिया वापरत असाल तर दिवसातून एकदातरी आपल्याला Meme बघायला मिळत असेल. सध्याच्या आधुनिक ऑनलाईन जमान्यात Meme हे सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या जीवनाचे अविभाज्य अंगच बनले आहे. पण हे Meme म्हणजे नेमकं असतं काय ? त्यांची सुरुवात कशी झाली ? ते कसे विकसित होत गेले आणि त्याला कुणी जन्माला घातले ? असे प्रश्न आपल्याला पडत असतील आज आपण त्याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Meme शब्द कुठून आला ?
सुरुवातीलाच आम्ही आपणाला सांगू इच्छितो की Meme या उच्चार मिम असा आहे, मेमे असा नाही. तर Meme हा शब्द पहिल्यांदा प्रकाशित झाला तो रिचर्ड डॉकिन्स यांच्या १९७६ मधील “द सेल्फीच जिन” या पुस्तकामध्ये ! डॉकिन्सने हा शब्द पहिल्यांदा Mimeme (ग्रीक अर्थ “ज्याची नक्कल केली जाते असा”) या अर्थाने वापरला. पुस्तकाच्या नावात असणाऱ्या जीन या शब्दाशी साधर्म्यामुळे नंतर तो Meme असा रुढ झाला.
इंटरनेट यायच्या आधी Meme होते का ?
तुमच्या माहितीसाठी सांगायचं झाले तर इंटरनेट यायच्या आधीपासून आणि डॉकिन्सने त्याला Meme असे नामकरण करायच्या आधी ख्रिस्तपूर्व ७९ मध्ये पॉम्पेईच्या सत्ताकाळापासून ते १९७० मधील ग्राफिटीपर्यंत Meme हा प्रकार अस्तित्वात आहे. जगभरातील वेगवेगळ्या संस्कृतींमधील भित्तिचित्रे, शिलालेख अशा माध्यमात तो अस्तित्वात होता.
पहिले इंटरनेट Meme काय होते ? ते कसे तयार झाले ?
एक नाचणारे बाळ हे इंटरनेटवर सर्वात पहिल्यांदा व्हायरल झालेले Meme होते. स्मार्टफोन येण्यापूर्वीच्या काळात तुम्हीदेखील “खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली” या गाण्यावर एक लहान बाळ डान्स करत असलेला व्हिडीओ पाहिला असेल, तेच ते ! १९९६ मध्ये मायकल जिरार्डने एक सॉफ्टवेअर तयार करुन संगणकाद्वारेही हालचाली प्रोग्रॅम करता येऊ शकतात हे दाखवण्यासाठी हे मॉडेल म्हणून तयार केले होते. ल्युकास आर्ट्सच्या एका कर्मचाऱ्याच्या इनबॉक्समध्ये आल्यानंतर त्याने त्याचे GIF फाईलमध्ये रूपांतर केले आणि सर्वत्र व्हायरल केले.
आजच्या काळात Meme कसे वापरले जातात ?
सोशल मीडिया साईट्सचा प्रसार झाल्यानंतर Meme हा प्रकार लोकप्रिय झाला आणि आपले म्हणणे थोडक्यात मांडण्यासाठी लोकांनी फोटो, व्हिडीओ वापरुन Meme बनवायला सुरुवात केली. Meme या प्रकाराला राजकीय, सांस्कृतिक मूल्यांची जोड दिल्यानंतर ते अधिक व्यापक बनले. LOLcats वेबसाईटने मांजरीच्या चित्राचा वापर आणि वेगवेगळ्या स्पेलिंगमधील शब्द वापरुन Meme हा प्रकार जगभर नेला. व्यंगात्मक दृष्टिकोनातून एखाद्या विषयाकडे पाहणे आणि त्यावर भाष्य करणे हा Meme चा आजचा मुख्य सूर आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..