या निवडणुकीने सत्ताधारी, विरोधक, वंचित, आयाराम गयाराम अशा सर्वांचेच डोळे उघडले

माध्यमे :

महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निकालानंतर अनपेक्षित अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मीडियाच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला २०० हुन अधिक जागा मिळतील असे अंदाज वर्तवले होते. परंतु प्रत्यक्षात निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीची घसरण झाल्याचे चित्र समोर आले आहे.

भाजप-शिवसेना युतीला जवळपास १६१ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने ९८ जागांपर्यंत मजल मारली आहे. अपक्ष आणि इतरांना २९ जागा मिळाल्या आहेत. माध्यमांनी दिलेले एक्झिट पोलचे आकडे खोटे ठरल्याने माध्यमांचेही डोळे उघडले आहेत.

सत्ताधारी :

२०१४ च्या तुलनेत भाजप १२२ वरुन १०५ वर तर शिवसेना ६३ वरुन ५६ वर आली आहे. महायुतीची १८५ वरुन १६१ पर्यंत घसरण झाली आहे. ज्याअर्थी महायुतीच्या जागांमध्ये घसरण झाली आहे, त्याअर्थी महायुतीच्या काळातील कामावर लोक पूर्णपणे समाधानी नाहीत. स्वबळावर सत्तेचे स्वप्न पडले होते, त्यांचा भ्रमनिरास झाला. भाजपला आता शिवसेनेला पूर्वीसारखी वागणूक देणे महागात पडणार आहे. जनतेच्या या वक्रदृष्टीमुळे भाजप आणि शिवसेनेचे डोळे उघडले आहेत.

विरोधक :

२०१४ च्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ वरुन ५४ आणि काँग्रेसने ४२ वरुन ४४ जागांवर बढत मिळवली असली तरी यामागे शरद पवार यांच्या झंझावाती दौऱ्याचा मोठा वाटा आहे. काँग्रेसने म्हणावे तितक्या ताकतीने ही निवडणूक लढवली नाही.

राहुल गांधींसारख्या नेत्याने महाराष्ट्राच्या निवडणुकीत दोनपेक्षा अधिक सभा घेऊन जोर लावला असता तर निकालाचे चित्र आघाडीच्या दृष्टीने अजून चांगल्या पद्धतीने समाधानकारक दिसले असते. प्रयत्न थोडे कमी पडल्यामुळे विरोधकांचेही डोळे उघडले आहेत.

तिसरा गट :

महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी जवळपास २५ ठिकाणी आघाडीच्या उमेदवारांचा पराभवाला कारणीभूत ठरल्याचे सांगितले जात आहे. लोकसभेला १५ ठिकाणी वंचितमुळे आघाडीचे उमेदवार पडले होते. परंतु लोकसभेनंतर वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यात फूट पडली.

लोकसभेवेळच्या एकूण मतांपेक्षा विधानसभेला वंचितच्या मतांमध्ये घट झाली. विधानसभा निवडणुकीत वंचितचा एकही उमेदवार निवडून आला नाही. काँग्रेससोबत आघाडीची फिस्कटलेली बोलणी वंचितला चांगलीच महाग पडली आहे. त्यामुळे त्यांचेही डोळे उघडले आहेत.

पक्षांतर :

लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रातही भाजप सेनाच परत सत्तेत येणार याचा विश्वास वाटल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, इत्यादी पक्षातून अनेक नेत्यांनी भाजप-सेनेत पक्षांतर केले. पक्षांतर केलेल्या २५ उमेदवारांना भाजप-सेनेकडून तिकीट मिळाले, त्यापैकी जवळपास १९ जणांचा पराभव झाला आहे.

पक्षांतर केल्यास जनताही पूर्णपणे आपल्या पाठीशी उभी राहील असे जनतेला गृहीत धरणे या नेत्यांना चांगलेच महागात पडले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत पक्षांतर करणाऱ्या किंवा पुढच्या काळात पक्षांतर करण्याची शक्यता असणाऱ्या नेत्यांचेही डोळे या निवडणुकीने उघडले आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.