मागच्या आठवड्यात नेपाळचे प्रधानमंत्री केपी शर्मा ओली यांनी “भगवान रामाचा जन्म नेपाळमध्ये झाला” असे वक्तव्य करुन दोन्ही देशातील नागरिकांचा रोध ओढवून घेतला आहे. दुसरीकडे अयोध्येतील राममंदिराच्या भूमिपूजनाची तारीख निश्चित झाली असून ५ ऑगस्ट २०२० रोजी प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते आणि राममंदिर आंदोलनाशी निगडित प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा भूमिपूजन कार्यक्रम पार पडणार आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सध्या राममंदिराऐवजी कोरोना हद्दपार करण्यासाठी लक्ष केंद्रित करायला हवं अशा आशयाचे वक्तव्य केले आहे. असो.
सध्या भगवान श्रीरामांचे नाव अशा वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. तशी अयोध्येत राममंदिर बनवण्याची घोषणा खूप जुनी आहे. गतवर्षी सुप्रीम कोर्टाने अयोध्येतील राममंदिर-बाबरी मस्जिद वा दावर अंतिम निकाल दिल्यानंतर राममंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता राममंदिर कधी बनणार ते राज्यकरते बघून घेतील, पण अयोध्येत राममंदिर व्हायच्या आधी कोरियाच्या लोकांनी अयोध्येत येऊन आपल्या महाराणीचे स्मारक कसे बनवून घेतले याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
काय आहे कोरियाचा आणि अयोध्येचा संबंध ?
अयोध्येमध्ये सुरीरत्ना नावाची राजकुमारी होऊन गेली. वयाच्या १६ व्या वर्षी तिला एक स्वप्न पडले, की समुद्र पार केल्यानंतर तिला तिच्या पतीची प्राप्ती होईल. त्यानुसार ती आपल्या होणाऱ्या पतीचा शोध घेण्यासाठी इसवी सन पूर्व ४८ मध्ये समुद्रमार्गे कोरियाला गेली. तिथे ग्योंगसांग प्रांतातल्या किमहये शहरात तिला कारक वंशातील राजा किम सुरो भेटला. त्याच्याशी तिने लग्न केले आणि ती तिथेच राहिली. लग्नानंतर तिने आपले नाव बदलून हियो ह्वांग ओक असे ठेवले.
२००१ साली कोरियन शिष्टमंडळाच्या हस्ते आणि जवळपास १०० इतिहासकारांच्या उपस्थितीत अयोध्येतील शरयू नदीच्या काठी महाराणी हियो ह्वांग ओक यांच्या कोरियातून आणलेल्या ७.५ टन दगडाचे स्मारक उभारण्यात आले. २०१६ साली कोरियन शिष्टमंडळाने उत्तरप्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासमोर स्मारकाच्या विकासाचा प्रस्ताव ठेवला, तो त्यांनी स्वीकारला.
मोदी दक्षिण कोरियाला गेल्यानंतर त्यांनी भारत-दक्षिण कोरिया यांच्या संयुक्त विद्यमाने स्मारकाचा विकास करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींच्या पत्नी किम जोंग सुक आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते ६ नोव्हेंबर २०१८ रोजी स्मारकाच्या सुशोभीकरण आणि विकासाच्या कोनशिलेचे उद्घाटन पार पडले.
आज कोरियातील जवळपास ६० लाख लोक स्वतःला या राजाचे वंशज मानतात. दरवर्षी हजारो कोरियन लोक आपल्या महाराणीच्या स्मारकाला भेट देण्यासाठी अयोध्येत येतात. २००१ साली भारतातील अयोध्या आणि दक्षिण कोरियातील गिमहये या शहरांना “सिस्टर सिटी” असा दर्जा देण्यात आला आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.