तानाजी मालुसरे व शिवरायांची कवड्याची माळ वाचा संपूर्ण इतिहास

नरविर तानाजी मालुसूरे यांच्या पार्थिवावर शिवरायांनी स्वत:च्या गळ्यातील हीच कवड्याची माळ ठेवली होती. मरणोत्तर एका विराचा हा सन्मान आणि त्याच्या पराक्रमाच,बलिदानाच चिज व्हाव हे सर्वच वखाणण्याजोगे आहे. दुर्गराज राजगडाचा आळ दरवाजा व तो मढे घाट या सर्व घटनांचा साक्षिदार आहे.

Mal

किल्ले सिंहगड हे पान नरविर तानाजी मालुसूरे यांच्या त्या ज्वलज्वलंतेजस बलिदानाशिवाय पुर्ण होऊच शकत नाही.किल्ले सिंहगडाची महती मी पामराने काय वर्णावी.इतिहास व भूगोलाच्या सिद्धांत व कसोट्यांवर तावुन सुलाखुन निघालेला सिंहगड अनेकांनी अभ्यासला लिहीला.माझ्यापेक्षा कीतीतरी पटीने सखोल व अभ्यासपुर्ण तिथे हे माझे चार शब्द म्हणजे,समुद्रात पडलेले पावसाचे चार थेंब.परंतु,तो लिहीला गेला पुस्तकात.पण, हल्ली पुस्तके घेऊन वाचावित इतका वेळ आहे कुणाजवळ.?
हातात Android फोन व त्यात जर इंटरनेट असेव तर,काय बिशाद पुस्तकांची मध्ये येण्याची.सिंहगडला जायचय ना गुगलवर नाव टाकायचे.कुठेतरी चार ओळी दिसल्या की तोच इतिहास.मग,तो पुर्ण असो वा अपुर्ण निघाले सिंहगड वारीला.त्याच गुगलवर सर्च केल्यावर काहीतरी चांगले व सुसंगत वाचायला मिळावे.म्हणुन,या चार शब्दांचा केलिलवाना प्रयत्न.

Tanaji_Malusare

तर, मित्रांनो नरविर तान्हाजी मालुसूरे जावळी मुलखातील ढोरप्याच्या डोंगराखालील,तसेच ढवळ्या घाटाखालील किल्ले चंद्रगडा अलिकडील “उमराठ” या गावचे.क्षात्रकुलोत्पन्न,मल्ल राजवंशीय कुळातील. चला तर गडे हो पाहुयात किल्ले सिंहगडाच्या पोटात घटलेली ही सत्य घटना.माझ्या बौद्धिक कुवतीनुसार शब्दबद्ध करत चार शब्द सुमने नरविराच्या चरणी व त्या युद्धात कामी आलेल्या त्या सर्व रणधुरंदरांच्या.त्याचप्रमाणे,सिंहगडावरील तट बुरुजांच्या चरणी समर्पित.मी तो एक धुलीकण
शालीवाहन शके १५५१, सौम्य संवत्सर, माघ महिन्यातील कृष्णपक्षातील आष्टमी..गुरुवार..किल्ले राजगडावर पद्मावती माचीवरील दिवाण इ आम समोर विस्तृत शामियाना उभारला गेला.आऊसाहेबांच्या वाड्याबाहेर चुली पेटल्या.निरनिराळे पदार्थ रटरटत होते.आऊसाहेब स्वत: या सर्वांवर जातीने लक्ष देत होत्या.आज राजगडावर शाही होय शाहीच पंगत बसणार होती.दिवाण इ आमच्या शामियान्यात राजे घोंगडीवर बसले.शेजारी तान्हाजी मलुसूरे,त्यांच्या शेजारी सुर्याजी, शेलार मामा व बाकीचे जेधे व शिलिंबकर असे सहाशे धारकरी भोजनास बसले.काय तो प्रसंग व भाग्यवंत ते सर्व धारकरी ज्यांना शिवरायांसवेत भोजनाचे भाग्य आज लाभले होते.वाढप्यांनी भोजन वाढले व हर हर महादेव गर्जना करत पंगत सुरु झाली.आऊसाहेब स्वता: सर्वांना खिर वाढत होत्या.पंगत जेऊ लागली.जेवणे अटोपली.भोजनानंतर राजकुटुंबाची वामकुक्षी आवरली व शिवराय आऊसाहेबांसमवेत वाड्याच्या बाहेर पडले.पद्मावती माची जवळ केली.महादेवाच्या मंदिरासमोर युवराज संभाजीराजे, शिवराय व आऊसाहेेब आसनस्थ झाले.मजालस जमली होती.तान्हाजी उभे राहुन आजची किल्ले कोंढाण्यावरील लढाई कशाप्रकारे गनिमी काव्याने होणार हे सांगु लागले.त्यावर,चर्चा झाली एव्हाना दिवसाचा चौथा प्रहर संपत आला होता.
तान्हाजी, सुर्याजी, शेलारमामा, इतर धारकर्यांनी आऊसाहेब व शिवरायांचे चरण वंदले व किल्ले राजगडाच्या शिवापट्टणकडील महादरवातुन खाली उतरु लागले.गडे, हो कधी त्या राजगडाच्या त्या शिवापट्टणकडील महादरवाजात गेलात ना तर,याच दरवाजाने रणनवर्याची जात सांगणारे ते विर मराठी मावळे त्याच दरवाजातुन उतरताना.कधीतरी तिथे शांत बसुन तो क्षण आठवा.नक्की दिसतील.

Tanaji Maludsre

सहाशे धारकरी गुंजवणी व कानद नदी ओलांडुन निघाले किल्ले कोंढाण्याकडे की साक्षात यमदेवाकडे..?आष्टमीच्या दुसर्या प्रहराच्या शेवटी किल्ले कोंढाण्यावरील डोणगिरीच्या कड्याखालील कीररर रानांत सहाशे धारकरी कुजबुजले.तिनशे धारकरी तान्हाजी मालुसूरें सोबत व बाकीचे तिनशे कल्याण दरवाजाच्या रोखाने निघाले.तिनशे धारकरी कल्याण दरवाजा जवळ आले व त्यांनी हातातील पलुते, टेंभे पेटवले व आसमंतात ‘हर हर महादेव’ गर्जना दुमदुमली.गडावरील गस्तिंच्या जागल्यांना जाग आली.तान्हाजी मालुसुरेंनी अगोदरच आपलेसे केलेल्या मेटावरील महादेव कोळी प्रसंगी शब्दास जागले व किल्ले कोंढाण्याकडे तोंड करुन मोठ मोठ्याने बोंबा ठोकु लागले.सुर्याजीकडील जमाव मुद्दामहुन इकडे तिकडे सैरा वैरा धावत सुटला.त्यामुळे, तो मोठा व अगणित भासत होता.या सर्व प्रकाराने किल्ल्यावरील उदयभान राठोडाच्या बाराशे शिबंदिला जाग आली.काही अर्धवट निद्रेत,तर काही जागते जागले हातातील हत्यारे सावरीत कल्याण दरवाजाच्या दिशेने पळत सुटले.पाईक-नाईक-जुमलेदार-हवालदार-हजारी-बंकी-दौलतबंकी-गस्तकरी-तिरंदाज-बर्कंदास-गोलंदाज-असे सगळेच मिळेल त्या हत्यारानिशी व मिळेल त्या वाटेने पळत सुटले.कुणाचाच कुणास ताळमेळ लागेना.चौकीनवीस-सबनीस-तटनीस-गडणीस-पावसबनीस-खुफीयानविस इत्यादी.मोघली शासकीय यंत्रणेतील शासकीय आधिकारीही या अप्रत्यक्ष झालेल्या हल्ल्याने गोंधळले व कल्याण दरवाजाच्या दिशेने धावत सुटले.इतक्यात पलुतेधारी जमावावर तोफा डागण्याचा हुकुम तटसरनौबताने दिला व कल्याणदरवाजावरील तोफा कडाडल्या.गोळे सुटले.त्या आवाजने सुर्याजीच्या तिनशेच्या तिनशे धारकर्यांनी एकाच वेळी हातीचे पलुते व टेंभे विझवले.झाली ना पंचायत आता तोफगोळे डागायचेत आरे पण नेमके कुठे..?अंदाजेच तोफची गोळे डागु लागला.भले भले थंड झाले हे काय टिकणार या नरशार्दुलांपुढे.करतील काय कल्पना युक्तीची..?कल्पना गनिमी काव्याची?

Tanaji_Malusare

इकडे तान्हाजी मालुसूरे व त्यांचे तिनशे धारकरी काळ्याकुट्ट आंधारात त्या डोणगिरी कड्याला चिकटले.दबत हळु हळु मुंगिच्या पावली डोणगिरी कड्याजवळ आले.गनिम तो सर्व कल्याण दरवाजाच्या बाजुस एकवटला.लांब बांबुचा पेटारा उघडला व त्यातुन ‘यशवंती’ घोरपड बाहेर कढली.तिच्या कमरेभोवती सोल कसला व तिच्या माथी तान्हाजींनी शुभारंभाचा शेंदुर थापला.तिनशे धारकर्यांनी हात जोडुन श्री कोंढाणेश्वराला नमन केले.ती नुसती घोरपड नव्हती.तर, जणु काही साक्षात आईभवानी घोरपडीच्या रुपात आपल्या भुत्यांना सहाय्य करण्यास सरसावली होती.त्या मुक्या प्राण्याने आपला सन्मान ओळखला व चित्कारत कडा चढु लागली.यशवंती सरसर कडा चढुन वर गेली.तान्हाजींनी दोराला ताकदिनिशी हासडा दिला व दोर पक्का झाल्याची खात्री केली.तान्हाजींच्या इशार्यासोबत एक वीर खांद्यावर सोलाची वेटोळी अडकवुन यशवंतीच्या कमरेला बांधलेल्या सोलास धरुन सरसर वर गेला व सोलाचा दुसरा पदर खाली सोडला.अशा प्रकारे दहा बारा सोल सोडले व सर्व मावळे वर चढुन तटबंधी लगतच्या झाडाझुडपांत लपुन बसले.सारे तटबंधी ओलांडुन आत घुसले व आडीचशे मावळे त्या मोंगली गोंधळात सामिल झाले व कल्याण दरवाजाकडे धावले.जो आडवा येईल त्याला कापत कापत पुढे सरकत ते आडीचशे वीर कल्याण दरवाजाजवळ आले.एकच हलकल्लोळ माजला.त्या अंधार्या रात्रीच्या या प्रकाराने सर्वच हादरुन भेदरुन गेले कुणाचेच कुणाला कळेना.आतुन हल्ला बाहेरुन हल्ला, आरोळ्या, हाणमार, कापकापी, रक्ताच्या चिळकांड्या, जिव्हारी बसलेल्या घावामुळे किंचाळण्याच्या आवाजाने तो कल्याण दरवाजाचा आसमंत थराररुन उठला व याच गोंधळाचा फायदा घेत.मावळ्यांनी कल्याण दरवाजाचा तो लाकडी अडसर बाजुला केला.कल्याण दरवाजा उघडला.

Sinhagad_pune

कल्याण दरवाजा उघडलेला पाहताच शेलार मामा व सुर्याजीच्या दडुन बसलेल्या तिनशे मावळ्यांनी एकच मुसंडी मारली.आता रण पेटले.पळापळ झाली.आता आत पळणारे आत पळत होते व लढणारेही आतच पळत होते.पळणारे भांबावले होते.पण, लढणारे भानावर होते.आष्टमीच्या त्या चंद्रालाही कळले नाही.गडकरी कोण व धारकरी कोण .मात्र आंधाराचा सराव असलेले माझ्या शिवबा राजाचे धारकरी बरोबर शोधुन शोधुन गडकर्यांना मारत होते.कारण, ते शिवाचे गण होते व म्हनुनच, त्यांनी तांडव मांडले होते.गडावर चाललेल़्या या गोंधळाने किल्लेदार उदयभानू बाहेर आला.तो कल्याण दरवाजाकडे निघाला व हे दडुन बसलेल्या तान्हाजींनी पाहीले.त्यांना तेच अपेक्षित होते.मुळावर घाव घातला की,झाड आपोआप पडते.हे जाणुन त्यांनी उदयभानूवर झडप घातली.त्यास युद्धास ललकारले व दोघांत युद्ध पेटले.दोघे एकमेकांवर झेपावत, डाव्या हातच्या ढालीवर वार झेलत आव्हान देत प्रतिअव्हान देत लढत होते.दोघही इरेस पेटले.कोणी कोणास हार होईना.चाललेल्या या युद्धात उदयभानूच्या एका तलवारीच्या घणाघाताने तान्हाजींच्या हातची ढाल चिरफळली.तशेच चिरफळल्या ढालीवर काही वार झेलले.परंतु, आणखी वारांनी ढाल पुर्णच निकामी झाली.वेळेस ढाल पावली नाही आणि मिळाली असती तरी ती वापरण्यास त्यांना वेळ मिळाला नाही.नव्हे तो उदयभानूने तान्हाजींस दिला नसता.कारण,या दोघांच्यावर किल्ले कोंढाण्याची हार जित ठरलेली होती.मुळात बाराशेच्या विरुद्ध सहाशे.त्यामुळे, सर्वच लढण्यात गुंतलेले.त्यामुळे, ढाल मिळाली नाही आणि येथेच घात झाला.त्या सर्वभक्षी काळाने आपला अंम्मल चालवला.डोईचे मुंडाशे काढुन तान्हाजी त्यावर वार झेलु लागले.पण,ते कीती तग धरणार.उदयभानूच्या वारांनी त्यांचा डावा हात पुर्ण रक्ताळला व साक्षात नरविर तान्हाजींसारखा नृसिंहही कळवळला.तान्हाजींनी एक अखेरचा वार उदयभानुच्या डाव्या खांद्यावर केला व त्याला उभा चिरला आणि आणि उमरठचा उमराव कोसळला.हा अंतिम घाव घालण्यासाठी तान्हाजींना बरेच पुढे झुकावे लागले.घाव घातल्यानंतर हातच्या जखमांनी त्यांना भोवळ आली व ते कोसळले.पडतां पडतां उदयभानूच्या समशेरीचा मरणांतक वार तान्हाजींच्या मस्तकावर बसला.डोक्यावर मुंडासे नव्हते.नरविरांच्या मस्तकीची भांग पाडण्याची रेषा उदयभानूच्या समशेरीनी भेदली.आताच्या असणार्या नरविरांच्या समाधीपासुन ते कल्याण दरवाजापर्यंत रण पेटले होते.

Tanaji Malusare

बातमी उठली तान्हाजी मालुसूरे पडले व मावळ्यांनी कच खाल्ली.ते कल्याण दरवाजा व डोणगिरीच्या सोलांकडे पळु लागले.पण, कल्याण दरवाजावर आडवे हात करत उभे असलेले शेलार मामा दिसले व सुर्याजींच्या रुपात कड्याचे सोल कापताना साक्षात कोंढाणेश्वर मावळ्यांना दिसला.राजजपुतांनी आता हिलाल पालोते पेटवले व त्याच्या प्रकाशांत त्यांना उभा चिरलेला उदयभानूचा मुर्दा दिसला व त्यांनीही कच खाल्ली.मावळे पुन्हा माघारी फीरले.ते बाराशे राजपुतांना संपवुन व गड जिकुन मगच थांबले.गडावरील गवताचे खण पेटवले गेले.शिवरायांना इशारद मिळाली.गड आला!

Tanaji Malusare

“गड आला पण सिंह गेला”
या यशाची खुप मोठी किंम्मत शिवरायांना मोजावी लागली.माघ वद्य नवमिची सकाळ उजाडली व त्या दुर्गराज राजगडाच्या सुवेळा माचीवर मृत गणांनी कुंकवाचा सडा टाकला.आवघा राजगड नव्हे मावळ रडला.तिन्ही माच्यांनी शेला तोंडात दाबला.आऊसाहेबांचा लाडका तान्हा धारातिर्थी पडला.
अशाप्रकारे, हा पराक्रम त्या सिंहगडावर घडला.तान्हाजींसह पन्नास मावळ्यांनी स्वराज्याच्या आग्निकुंडात स्वत: शरीराराची आहुती दिली.
तो किल्ले कोंढाणा या नृसिंहाच्या बलिदानाने “किल्ले सिंहगड”नामाभिधान पावला.
सिंहगडावरील मातीचा कण न कण व रणनवर्याची जात सांगणार्या नरशार्दुलांच्या रुधिराबिंदुंनी ती माती पावन झाली.पण, आज आम्ही त्याही इतिहासाची माती केली. माझ्या दादांनो व बहिणींनो तिथे नुसते गळ्यात गळे घालुन फीरु नका. मनोभावे कधी तरी माघ महीन्यातील आष्टमीच्या रात्री तिथे नरविर तान्हाजींच्या समाधीजवळ बसा.तो धगधगता पराक्रमही तुमच्या डोळ्यांसमोर नाचु लागेल.ही गाथा आहे मराठ्यांच्या शौर्याची,ही गाथा आहे माझ्या शिवबाराजेंच्या शिवगणांनांची, त्यांच्या निष्ठेची.
धन्यवाद.

संदर्भ-
तुलशीदास पोवाडा(pdf)
सभासद बखर
किल्ले सिंहगड
-आप्पा परब

साभार- शरद संभाजी भोसले

शिवाजी महाराज आणि समुद्रशास्त्र विषयी उत्तम लेख नक्की वाचा…

वाचा मराठ्यांची दक्षिण स्वारी : पोर्टो नोवोवर विजय विषयी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.