विधान परिषदेतील आमदारांना विधानसभेची उमेदवारी न देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आमदार सतेज पाटील यांना उमेदवारी मिळणार का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. कोल्हापूर दक्षिणचे सध्या भाजपचे अमल महाडिक हे प्रतिनिधित्व करतात. लोकसभा निवडणुकीच्या वेळी कोल्हापूरचा आमचं ठरलंय पॅटर्न महाराष्ट्रभर गाजला होता.
कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांना लोकसभेला काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी पाठिंबा देत उघड भूमिका घेतली होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सतेज कार्यकर्ता संवाद मेळावा गुरुवारी येथील ड्रीमवर्ल्ड वॉटर पार्क येथे झाला. लोकसभेच्या मदतीची परतफेड म्हणून शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक हे या मेळाव्याला उपस्थित होते.
यावेळी आमदार सतेज पाटील यांनी पुतणे ऋतुराज पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. मंडलिक यांनी विधानसभा निवडणूकीत आमचं ठरलंय अशी भूमिका घेत ऋतुराज पाटील यांच्या उमेदवारीला यावेळी पाठिंबा दिला.
लोकसभा निवडणुकीवेळी ‘आमचं ठरलंय’ ही उघड भूमिका घेवून आमदार पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी मदत केली होती. त्यामुळे एक मित्र म्हणून ऋतुराज पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याचे यावेळी त्यांनी जाहीर केले.
कोण आहेत ऋतुराज पाटील?
ऋतुराज संजय पाटील हे डी वाय पाटील ग्रुपमधील प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ डॉ. संजय डी.पाटील यांचा मुलगा तसेच विधानपरिषदेचे सदस्य सतेज पाटील यांचा पुतण्या आहेत. संजय पाटील हे पश्चिम भारतातील सर्वात ही मोठी शिक्षणसंस्था असलेल्या डॉ डी वाय पाटील शिक्षण संस्थांचे संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
ऋतुराज यांनी वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए पूर्ण केले आहे. तसेच अमेरिकेच्या पेनसिल्व्हानिया आणि लेह विद्यापीठातून ग्लोबल बिझनेस या विषयात शिक्षण घेतले आहे.
कोल्हापूर शहरातील सर्व महाविद्यालयांत ऋतुराज यांच्याबद्द्दल आकर्षण आहे. कोल्हापूरचे युथ आयकॉन असलेल्या ऋतुराज यांनी आता काकांच्या पाऊलावर पाऊल टाकत राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.