चौसष्ट घरांचा राजा शैलेश नेर्लीकर…

बुद्धी आणि जिद्दीची मैत्री झाली की काय होऊ शकतं हे शैलेश नेर्लीकरकडे पाहून कळतं. शैलेशची पहिली ३ वर्ष अगदी बाकी मुलांसारखीच गेली. नंतर वडिलांची जोहे इथून सोळांकूर ता.राधानगरी जि.कोल्हापूर इथं बदली झाली आणि चित्रंच पालटलं. सोळांकूरला नदीच पाणी नळांना येतं. ते अत्यंत प्रदुषित. त्यामुळे लहानगा शैलेश वारंवारं आजारी पडू लागला. प्रतिकारशक्ती कमी झाली. कोल्हापूरातील बालरोगतज्ञांना दाखविलं. शरीरात कँल्शीयम कमी असेल म्हणून त्यांनी कँल्शीयम सिरप, टँल्बेट आणि इंजेक्शनचा मारा सुरु केला.

शैलेशचे वडील मधुकर नेर्लीकर हे शिक्षक. शेतकरी कुटूंबातील मुलांनी शिक्षण घ्यावं ही त्यांची इच्छा. त्यासाठी आसपासच्या गावात घरोघरी जाऊन ते पालकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देत. मुलामुलींना शाळेत आणत. वडील असे शाळेच्या कामात अडकलेले. त्यामुळे शैलेशच्या आईनेच त्याच्या दवाखान्याच्या वाऱ्यांची जबाबदारी घेतली. कँल्शीयमच्या अतिरिक्त मात्रेमुळे शैलेशचं खाली बसायचं बंद झालं. शरीरावर कँल्शीयमच्या गाठी उठू लागल्या. उपचारासाठी मिरज, मुंबई गाठलं पण काही उपयोग झाला नाही. साताऱ्याला जाऊन आयुर्वेदिक उपचार घेतले पण जैसे थे. सततच्या हॉस्पिटलमुळे शाळा बंद झाली. मग आईनेचं घरी शिकवायला सुरुवात केली.

साधारण १९८५ चा हा काळ. शैलेश आठ वर्षाचा झाला. याच काळात शेजार घरी जाऊन त्याला बुद्धीबळाचा खेळ पाहण्याचं वेडं लागलं. एका शेजाऱ्यांनी त्याला बुद्धीबळ शिकविलं. मोठा भाऊ महेश बुद्धिबळातला सोबती झाला. आता सगळे उपचार थांबवून १५ वर्ष झाली होती. २०००साली शैलेशची बहीण कोल्हापुरात बी.एस्सी करत होती. तिची मैत्रीण गीतांजली हिची ताई चंद्र्मुखी गरड आयुर्वेदिक डॉक्टर. शैलेशविषयी कळल्यावर त्या त्यांचे आर्युवेदाचार्य डॉ.विवेक हळदवणेकर यांना घेऊन घरी आल्या. त्यांनी त्याला तपासलं आणि फी न आकारता उपचार सुरु केले. स्वेह्न-स्वेदन आणि औषधोपचारांमुळे शैलेशच्या शरीरात आठवड्याभरातच चांगला फरक पडला. शरीरावरील गाठी विरघळून गेल्या. गाठीमधून कँल्शीयमचे चिंचोक्यापासून ते हरभऱ्याच्या डाळीच्या आकाराचे खडे निघायचे. एकएक जखम सहा महिने बरी होत नसे. डॉ. चंद्र्मुखी गरड यांचे सतत उपचार चालूच होते.

डॉ.विवेक हळदवणेकर यांच्या प्रेरणेमुळे बुद्धीबळ हेच शैलेशच्या आयुष्याचं ध्येय झालं. आज आपल्या देशात शैलेशने विविध स्पर्धा गाजवल्याच आहेत. पण मलेशिया, जर्मनीतही त्याने आपलं बुद्धीबळावरचं प्रभुत्व दाखवलं आहे. दोन्ही वेळा परदेश स्पर्धेचा सर्व खर्च बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था, बारटी यांनी केला. आतापर्यंतच्या पुरस्कारात २००८ साली मिळालेला राजश्री शिव-शाहू पुरस्कार शैलेशसाठी खूप महत्वाचा आहे.

आज शैलेशच्या हाताच्या हालचालींवर मर्यादा आहेत. १०-१५ मिनिटांच्या वर त्याला उभं राहता येतं नाही. व्हीलचेअरशिवाय तो बसू शकत नाही. झोपूनचं खेळावं लागत. स्वतःचं विकसित केलेल्या तंत्राने तो खेळतो. सुरवातीला घोडके सरांनी त्याला मार्गदर्शन केलं. त्याला गरज आहे ती दररोज २-३ तासाच्या प्रशिक्षणाची. पण प्रशिक्षकाची फी परवडणारी नाही. कागलचा राजर्षी शाहू साखर कारखाना गेली १२ वर्षे त्याला 3 हजार रुपये महिना शिष्यवृत्ती देत आहे. त्यांतच सर्व खर्च जमवण्याचे त्याचे प्रयत्न आहेत.

आई आणि बुद्धिबळाचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद त्याचं प्रेरणास्थान. २०१६ मध्ये त्याला विश्वनाथन आनंदला भेटायची संधी मिळाली. वडील मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले आहेत. मोठा भाऊ महेश शिक्षक आहे तर बहिण सुनिता नेर्लीकर-क्षीरसागर तहसीलदार आहे. नेर्ली गावची सरपंच असलेली आई हे सगळेच त्याच्या पाठीशी आहेत.
वयाच्या २५ व्या वर्षी शैलेश व्यावसायिक स्पर्धेकडे वळला.

“खेळामुळे मानसिकता बदलते, कठीण प्रसंगी खंबीरपणे उभं रहाण्याची सवय होते. आपल्या लक्ष्यावर नजर ठेवली तर अशक्य काहीचं नाही”, असं शैलेश सांगतो. नकारात्मकता, आत्महत्या अशा विचारांपासून स्वतःला दूर ठेवलं पाहिजे, हेच शैलेशचं सांगणं आहे. परिस्थितीमुळे निराश न होता आनंदी, सकारात्मक रहावं ह्यावर शैलेशचा पूर्ण विश्वास आहे. शैलेशला आता “Grand Master” व्हायचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे नवीन खेळाडूंना प्रशिक्षित करायचं, घडवायचं आहे.

शैलेश नेर्लेकर यांचा संपर्क क्र. – 9665516298

Source Navi Umed Facebook Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.