रोजगार निर्मिती व सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारने राबविलेल्या विविध योजना व कौशल्य विकास कार्यक्रमांचे यश व त्या योजनांच्या सफलतेचा अनुभव अनेक घटनांमधून दिसून येत आहे. सरकारने मदतीचा हात दिला तर आयुष्य कसं बदलून जातं ह्याचा अनुभव आलाय परभणीच्या रईस सलिम हुसेन या तरुणाला.
परभणीचा रईस हा कॉमर्स शाखेचा एक पदवीधर तरुण. रईसच्या घरची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती. त्याने आपले पदवीपर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण केले व बी.कॉम होताच नोकरीसाठी अनेक ठिकाणी प्रयत्न केले. पण त्याच्या हाती निराशा आली. वडिलांचे सायकलचे पंक्चर काढण्याचे एक छोटेसे दुकान होते पण ह्या व्यवसायावरच संपूर्ण घर कसेबसे चालत होते. आपल्या घरची आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून रईस नोकरी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करत होता पण अनेक प्रयत्न करूनही रईसला नोकरी मिळत नव्हती.
पदवी शिक्षण त्याने कसेबसे पूर्ण केले पण आता पुढील शिक्षण एम.कॉम कसे पूर्ण करावे हा त्याच्यासमोर प्रश्न होता. अश्या परिस्थितीत त्याला एक आशेचा किरण दिसला. त्याने आपल्या घराजवळील कौशल्य विकास योजनेअंतर्गत मान्यताप्राप्त ॲस्पायर टेक्निकल इंन्स्टिट्यूट या संस्थेतून “बिझनेस करस्पॉडन्ट” ह्या विषयाचे प्रशिक्षण घेतले. या संस्थेतून सहा महिन्याचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर संस्थेने त्याला परभणीतील ॲक्सिस बँकेकडे पाठविले. रोजगाराची सुवर्णसंधी रईसकडे चालून आली होती.
ॲक्सिस बँकेने घेतलेल्या मुलाखतीमध्ये तो उत्तीर्ण झाला आणि बँकेने त्याला परभणीतच असलेल्या ॲक्सिस बँकेच्या एका शाखेमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट एक्सिक्यूटिव्ह या पदावर रुजू होण्यासाठी पाठवले. बी.कॉम नंतर नोकरीसाठी अनेक खस्ता खाल्लेल्या रइसने सरकारने राबविलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमाचा लाभ घेतला व आपल्या आयुष्यात असा सकारात्मक बदल घडवला.
बिझनेस डेव्हलपमेंट एक्सिक्यूटिव्ह झालेला रईस आता महिन्याला १२००० रुपये वेतन कमाऊ लागला. घरची आर्थिक परिस्थिती आता चांगली होऊ लागली होती. त्याच्या कामाच्या दर्जामुळे बँकेने सहा महिन्यातच त्याला पदोन्नती देऊन सेल्स-ऑफिसर या पदावर नियुक्त केले. आता त्याला मिळणारे दरमहा वेतन १५५०० रुपये इतके झाले होते. ह्याचबरोबर कामानुसार मिळणारे इतर भत्ते व मोबदलाही मिळू लागला. काहीच महिन्यांपूर्वी नोकरीसाठी भटकणारा रईस आता एका प्रतिष्ठित बँकेमध्ये चांगल्या पदावर रुजू झाला होता.
कौशल्य विकास योजनेअंतर्गत त्याने घेतलेल्या सहा महिन्याच्या प्रशिक्षणाने त्याच्या आयुष्याची दशा व दिशा दोन्ही बदलून गेली. आता रईसला इतर अनेक बँकांकडून नोकरीच्या ऑफर्स येत आहेत. नोकरीसाठी दारोदार भटकणाऱ्या रईसला नोकरी देण्यासाठी बँका स्वतःहून विचारणा करत आहेत हे दिनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाचे मोठेच यश म्हणावे लागेल. ह्या योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अनेक कौशल्य विकास कार्यक्रमांमुळे अनेक तरुण व तरुणींच्या कौशल्याचा विकास होत आहे व ते रोजगार मिळवण्यास सक्षम होत आहेत.
कौशल्य विकास योजनांच्या माध्यमातून युवक-युवतींनी कौशल्य प्राप्त करुन घेऊन रोजगाराची कास धरावी असा संदेश आपल्या समाजातील इतर बेरोजगार मित्रांना देतांनाच शासनाचे व संस्थेचे आभार मानायला रईस विसरत नाही. रईस हुशार व कार्यक्षम होताच पण त्याला गरज होती मदतीच्या हाताची. हा मदतीचा हात त्याला दिला दिनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विकास कार्यक्रमाने.
रईस प्रमाणेच इतर तरुण व तरुणींनी कौशल्य विकास कार्यक्रमाचा लाभ घेऊन आपली प्रगती साधायला हवी. माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.