२६ जुलै २०१७ ला कारगिल विजयाला १८ वर्ष पूर्ण होत आहेत.
भारतीय सेना हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करते. खरं तर युद्धात विजय हा फक्त सेनेचाच नसतो, तर तो संपूर्ण देशाचा असतो. म्हणून संपूर्ण देशात हा दिवस उत्साहाने साजरा व्हायला हवा. मात्र, तसे होत नाही. हा दिवस विसरला जातो, ही खेदाची बाब होय.
भारतीय सैन्यदलाच्या शौर्याची, पराक्रमाची, त्यागाची, कष्टाची, सहनशीतलेची, निष्ठेची, जिद्दीची, देशाभिमानाची व बलिदानाची सातत्याने उजळणी आपल्या देशवासीयांकरिता होणे गरजेचे आहे. कारण या उजळणीमुळे लोकांच्या मनात देशप्रेमाची ज्योत सतत तेवत ठेवली जाते. साऱ्या देशबांधवांनी आपल्या जीवनात देशप्रेमालाच प्राथमिकता देऊन आपापली कामे केली तरच देश प्रगतिपथावर अग्रेसर राहील.
१९६२ चे चीन विरुद्धचे युद्ध वगळता पाकिस्तानविरुद्धच आपले युद्ध झाले आहे. १९४८ नंतर १९६५ चे युद्ध झाले, ज्यात भारतीय सेनेने लाहोरला धडक दिली. १९७१ च्या युद्धात आपला निर्णायक विजय झाला, ज्यात बांगलादेशाची निर्मिती झाली व आपल्या सेनेने ९० हजार पाकिस्तानी सैनिकांना युद्धकैदी केलं. भारत-पाकिस्तानच्या युद्धाचे मूळ कारण नेहमीच काश्मीर असते. काश्मीर समस्येमुळे संबंध नेहमीच ताणलेले असतात. नवाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान असताना म्हटले होते की, भारत- पाकिस्तान बससेवा सुरू होत आहे ही आनंदाची बाब आहे. परंतु, जर पहिल्या बसमधून भारताचे पंतप्रधान लाहोरला आले तर आम्ही समजू की, भारत-पाक संबंध सुधारावे ही खरोखरीच भारताची इच्छा आहे. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पुढाकार घेतला व लाहोरला बसने यात्रा केली. परंतु, याच सुमारास पाकिस्तानने कारगिल युद्धाच्या जय्यत तयारीला सुरुवात केली. आता प्रश्न उद्भवतो की कारगिलच का ?
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर काश्मीरचे भारतात विलीनीकरण झाले. पाकिस्तानला ही गोष्ट मान्य नव्हती. परंतु, त्यांचा नाईलाज होता. कारण महाराजा हरीसिंगनेच पुढाकार घेऊन काश्मीर भारताचा अविभाज्य घटक राहील, अशा करारावर स्वाक्षरी केली होती. १९४८ साली पाकिस्तानने काश्मीरमध्ये सैन्य घुसविले व बऱ्याच मोठय़ा भूभागावर ताबा मिळविला. भारतीय सेनेनी आपल्या सैन्याची जमवाजमव केली व पाकिस्तानी सेनेवर हल्ला चढविला. पाकिस्तानी सेना माघार घ्यायला लागली असताना तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरूंनी यूनोकडे धाव घेतली. मग युद्धबंदी झाली. दोन्ही देशांच्या फौजा जिथं होत्या तिथं थांबल्या. जिथं दोन्ही देशाच्या फौजा थांबल्या तिलाच एलओसी (लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल) म्हणतात. यामुळेच काश्मीरचा बराच मोठा प्रदेश आज पाकिस्तानच्या ताब्यात आहे, ज्याला आपण पाकव्याप्त काश्मीर म्हणतो. यूनोने हे प्रकरण चिघळत ठेवण्याची भूमिका घेतली नसती तर भारतीय सेनेने पाकिस्तानी सेनेला हुसकावून लावले असते व पाकव्याप्त काश्मीर भारताच्या नकाशात दिसला नसता.
जम्मूपासून श्रीनगर, कारगिल व लेहपर्यंत राष्ट्रीय राजमार्ग नंबर एक ए वापरात आहे. संपूर्ण सेनेचं मेंटेंनन्स याच राजमार्गामुळे होतं. त्यामुळे या मार्गाला सेनेकरता जीवन रेषा मानल्या जात. कारगिल, बटालिक, द्रास व मइको व्हॅली एल.ओ.सी.ला अगदी लागून आहेत. पाकिस्तानी सेनेने योजना केली की, जर या चार ठिकाणांवर ताबा मिळविला तर राष्ट्रीय राजमार्गाचा बराच मोठा भाग त्यांच्या ताब्यात येईल. त्यामुळे भारतीय सेनेचा लेहशी संपर्क तुटेल व लेहशी संपर्क तुटल्या मुळे लेव्ह व सियाचीनला मेंटेन करणं फारच कठीण होईल. थोडक्यात यामुळे लेह व लेहवरील भूभाग अगदी सियाचीनपर्यंत, पाकिस्तानच्या ताब्यात जाईल.
काश्मीरच्या या संपूर्ण भागात नोव्हेंबर ते मार्च प्रचंड प्रमाणात बर्फ पडतो. बऱ्याच ठिकाणी स्टँडिंग स्नो २० ते ३० फूट असतो. अशावेळी पहाडांच्या शिखरांवर असलेल्या ठाण्यांचे व्यवस्थापन करणे फारच अवघड असतं. आपल्याला व पाकिस्तानला देखील ! त्यामुळे दोन्ही देशांमध्ये एक अलिखित करार होता की, या महिन्यात दोन्ही देशांच्या फौजा शिखरांवरून खाली येतील. आपल्या परमनंट बेसमध्ये म्हणजे साधारणत: ९ ते १० हजार फुटावर. भारतीय सेना ठरल्याप्रमाणे आपल्या ठाण्यांपासून खाली आली. पाकिस्तानी फौजांनीसुद्धा दाखविलं की, आम्ही खाली जात आहोत. परंतु, नंतर परत जाऊन आपण खाली केलेल्या ठाण्यांवर ताबा मिळविला. कारगिल युद्धाची सुरवात येथून होते. म्हणजे आपल्या हद्दीत शिरून पाकिस्तानने आपल्या ज्या ठाण्यांवर ताबा मिळविला तेथून त्यांच्यावर हल्ला करून त्यांना तेथून हुसकावून लावणे, हे भारतीय सेनेचे काम होतं. शत्रू पर्वतरांगांच्या शिखरावर बसला होता. भारतीय सेनेने पहाडावर चढून जाणे व हल्ला करणे अत्यंत कठीण होते. काश्मीरमध्ये १० हजार फुटानंतर प्राणवायूची कमतरता असते. थोडं चालल्यावर थकायला होतं, दम लागतो. याकरता एक्लेमेटाईसेझन करणे आवश्यक असते. १० हजार फुटापासून १२ हजार फुटापर्यंत चालत जाऊन तेथे सैनिक दिवसा थांबतात व रात्री परत खाली येतात. हे सात दिवस रोज करायचे असते.
सात दिवसांनंतर १२ हजार फुटावर लढण्याकरता सैनिक शारीरिक व मानसिक दृष्टय़ा तयार होतो. यालाच एक्लेमेटाईझेशन म्हणतात. हीच कारवाई दोन दोन हजार फुटांकरता करायची असते. कारगिल युद्धाच्या वेळेस आरोप होत होता की, इतका वेळ का लागत आहे? पर्वतीय भागातील युद्ध अतिशय अवघड असते. पुष्कळ ठिकाणी आपले हल्ले रात्रीच्या अंधारात झाले जे खूपच कठीण आहे.
कारगिल युद्धात बरेच हल्ले अतिशय दुर्गम ठिकाणांहून केल्या गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीप्रमाणेच शत्रूच्या अनपेक्षित मार्गातून जाऊन त्यावर अचानक हल्ले करण्यात यश मिळाले. अखेर भारतीय सेनेला शत्रूला हुसकावून लावण्यात यश मिळाले. कारगिल युद्धात अद्वितीय शौर्याची अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी देशवासीयांच्या मनात घरे केली आहेत.
कॅप्टन विक्रम बत्राच्या कंपनीने शत्रूच्या एका ठाण्यावर विजय मिळविला. त्याच्या साहसी वृत्तीमुळे सर्व सैनिकांना तो अतिशय आवडत असे. या विजयानंतर विक्रमच्या युनिटला ४८७५ या शिखरावर हल्ला करायचा होता. त्याच्या युनिटच्या कमांडिग ऑफिसरने योजना आखली. ६ जुलै १९९९ रोजी हा हल्ला करायचा होता. नेमके त्याच दिवशी विक्रमची प्रकृती बिघडली व त्याला १०३अंश ताप आला. त्याला सांगण्यात आले की, या हल्ल्यात तो जाणार नाही. त्याला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा तो ताबडतोब म्हणाला की, मी माझ्या कंपनीसोबत या हल्ल्यात जाणारच प्रकृती ठीक नसताना देखील त्याच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कंपनीने शत्रूवर हल्ला चढविला. हल्ला चढवीत असताना त्याला गोळ्या लागल्या व तो जबर जखमी झाला. त्या अवस्थेत पुढे सरकत जाऊन त्याने शत्रूच्या मिडीयम मशीन गनवर हातगोळे फेकले व ती गन उडविली.
जखमी झाल्यावर देखील त्याने स्ट्रेचर वरून डॉक्टरकडे जाणे अमान्य केले. तो म्हणाला की, हे शिखर आपल्या ताब्यात आल्याचं मला मरणापूर्वी बघायचय. अखेर शिखर काबीज झाले व विक्रमने अखेरचा श्वास घेतला.
कारगिल युद्धात दाखविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल भारतीय सैनिकांना विनम्र अभिवादन !