देशातील लोकसभेची निवडणूक असो किंवा राज्याची विधानसभेची निवडणूक असो, मुख्यत्वेकरुन राष्ट्रीय पक्षच केंद्रस्थानी असतात. त्याखालोखाल प्रादेशिक पक्षांचाही प्रभाव पाहायला मिळतो. परंतु अनेक राज्यात राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष हातात हात घालूनच निवडणूक लढवतात असे अनेकदा पाहायला मिळते.
महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी हेच पक्ष निवडणुकीच्या केंद्रस्थानी असतात. परंतु महाराष्ट्रातील एक जिल्हा याला अपवाद ठरताना दिसत आहे. या जिल्ह्याने केंद्रात एक अपक्ष खासदार आणि राज्यात चार अपक्ष आमदार पाठवले आहेत. पाहूया खास रे रिपोर्ट…
अपक्षांचे एक खासदार आणि चार आमदार देणारा जिल्हा
अपक्षांचा जिल्हा म्हणुन ओळख प्राप्त झालेला हा जिल्हा आहे अमरावती ! मे महिन्यात पार पडलेल्या भारताच्या लोकसभा निवडणुकीत अमरावती जिल्ह्यात अपक्ष खासदार निवडून आला. तर ऑक्टोबर महिन्यात पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत चक्क चार अपक्ष आमदार निवडून आले आहेत. पाहूया कोण आहेत ते खासदार आणि आमदार…
१) नवनीत राणा कौर (अपक्ष खासदार, अमरावती) :
अमरावती लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून शिवसेनेचे आनंदराव अडसूळ आणि संयुक्त पुरोगामी आघाडी पुरस्कृत अपक्ष म्हणून नवनीत राणा कौर यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. देशात आणि राज्यात भाजप-सेनेला जोरदार बहुमत मिळाले असताना अपक्ष नवनीत राणा यांनी तब्बल ३६९५१ मतांनी शिवसेनेकंब्या अडसुळांचा पराभव केला.
२) बच्चू कडू (अपक्ष आमदार, अचलपूर जि.अमरावती) :
आपल्या अभिनव आंदोलनांसाठी प्रसिद्ध असणारे आणि मागचे सलग तीन वेळा अचलपूरचे प्रतिनिधित्व करणारे आमदार बच्चू कडू यांच्यासमोर काँग्रेसचे अनिकेत देशमुख आणि शिवसेनेच्या सुनीता पिसके यांचे तागडे आव्हान समोर होते. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी ८३९६ मतांच्या फरकाने विरोधकांचा पराभव करत विजयी चौकार मारला.
३) रवी राणा (अपक्ष आमदार, बडनेरा जि.अमरावती) :
अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचे पती रवी राणा आणि शिवसेनेच्या प्रीती बांड यांच्यातील अटीतटीच्या निवडणुकीत रवी राणा यांनी १५५४१ मतांची आघाडी घेत बडनेरा विधानसभेवर अपक्षांचा झेंडा फडकावला.
४) राजकुमार पटेल (अपक्ष आमदार, मेळघाट जि.अमरावती) :
मेळघाटात बच्चू कडूंनी प्रहार जनशक्ती पक्षाकडून अपक्ष उमेदवारी दिलेले राजकुमार पटेल यांनी ४१३६२ मतांच्या फरकाने भाजपच्या रमेश मावस्कर व राष्ट्रवादीच्या केवलराम काळे यांचा पराभव करत दणदणीत विजय संपादन केला.
५) देवेंद्र भुयार (अपक्ष आमदार, मोर्शी जि.अमरावती) :
महाराष्ट्रातील सर्वाधिक धक्कादायक निकाल मोर्शीत लागला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उमेदवारी दिलेली जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र भुयार यांनी राज्याचे कृषिमंत्री आणि भाजपचे दमदार नेते अनिल बोंडे यांचा ९७९१ मांनी पराभव करत जोरदार धक्का दिला.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.