मार्केटमध्ये मासे खरेदी करताना ताजे मासे कसे ओळखावे ?

आपण कित्येकदा मार्केटमध्ये मासे खरेदी करायला जातो तेव्हा आपल्या हाती शिळे किंवा खराब मासे मिळण्याचा धोका असतो. मासे ताजे असतील तरच जेवण चांगले चवदार होते, नाहीतर पैसे वाया घालवून काही उपयोग होत नाही. त्यासाठी ताजे किंवा चांगले मासे कसे ओळखावे याबद्दल खाली दिलेली माहिती वाचा. ही माहिती आपल्याला प्रत्येकवेळी मासे खरेदी करताना उपयोगी पडेल. मासे खाणाऱ्यामध्ये दोन प्रकार आहेत. खाऱ्या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील. खाऱ्या पाण्यातील ताजे मासे कसे ओळखावे हे खासरेवर जाणुन घेऊया.

दिसण्यातला ताजेपणा ओळखणे – ताजे मासे दिसायला ताज्या फुलांप्रमाणे तरतरीत व चकचकीत ओलसर दिसतात. थोडेसेही मरगळलेले असले तर शंकेस वाव असतो.
वासावरुनन ताजेपणा ओळखणे – काही ताज्या माशांना किंचीत हिरमुस वास असला तरी घाण कुजकट वास येत नाही.

ढिगातील माशांमध्ये ताजे मासे ओळखणे – खराब मासे काही वेळा ताज्या माश्यांच्या ढिगात मिसळून विकले जातात. या प्रकारात कुजकट वास आणि मरगळलेले मासे ओळखणे केवळ सरावाने शक्य होते. त्यासाठी पुढील प्रयोग करा.
मासे बोटाने दाबुन पहा – मासा ताजा नसेल तर बोटाने थोडासा दाब दिल्यावर तिथे खोलगट ठसा उमटतो. ताज्या माश्यात असं होत नाही.
माशाचे डोळे पहा – ताज्या माश्याचे डोळे चकचकीत काळेभोर आणि पारदर्शक दिसतील. लालसर किंवा धुरकट पांढरे मुळीच नसावेत.

मासे कापल्यानंतर तुकड्यांचा आतील रंग पहा – काही मासे काप पाडून विकले जातात. ताज्या माशांचे तुकडे दिसायला व्यवस्थित असतात व त्यावर पारदर्शक पांढऱ्या रंगाची झाक असते.
माशांचे कल्ले उघडून पहा – ताज्या माशाचे कल्ले थोडेसे उघडून पाहिल्यास आतमधून बऱ्यापैकी लाल किंवा गुलाबी दिसतील. ते जर फिकट असले तर ताजेपणा संपलेला आहे. फसवण्यासाठी काही विक्रेते शिळ्या माशांचे कल्ले चक्क रंग लाऊन लाल करतात तरी त्यापासून सावध रहा.

पापलेट – रंगाने पांढरी आणि चमकदार दिसणारी पापलेट ताजी असतात. पापलेट घेताना त्यांच्या डोळ्याखालचा भाग दाबुन बघावा. त्यातुन सफेद पाणी आले तर ते ताजे असतात आणि लाल पाणी आल्यास ते शिळे असतात हे समजावे. तसेच पापलेट शिळी किंवा खराब होत आल्यास त्यांना पिवळसर रंग येऊ लागतो.

भिंगी, सुरमई, रावस, कारली, हलवा – हे मासे विकत घेताना बोटांनी थोडे दाबुन घट्ट बघुन घ्यावेत. माशांचे तोंड उघडुन बघुन आतमध्ये लालसर भाग दिसला तर ते मासे ताजे आहेत असे समजावे. काळसर दिसले तर ते शिळे किंवा खराब आहेत असे समजावे.

लाल कोळंबी – लाल कोळंबीमध्ये काळसर लाल व पांढरी हिरवट रंगाची लाल कोळंबी ताजी असते. ही कोळंबी रंगाने नारिंगी रंगाची होऊ लागल्यास ती शिळी किंवा खराब झाली असे समजावे. शिळ्या आणि खराब झालेल्या कोळंबीची डोकी तुटलेली असतात. ताजी कोळंबी घट्ट आणि कडक सालीची असते. शिळ्या आणि खराब कोळंबीची साल मऊ पडलेली असते आणि तिला घाण वास येतो.

पांढरी कोळंबी – पांढरी कोळंबी पचायला हलके आणि चांगली असते. तिला पांढरा स्वच्छ रंग असतो. ती घट्ट आणि चमकदार असते. तिला जर पिवळसर काळा रंग येऊ लागला तर ती शिळी व खराब होत आली आहे असे समजावे. ज्या कोळंबीची डोकी तुटायला आलेली असतात आणि डोक्याला काळा रंग येऊ लागलेला असतो तसेच साल मऊ पडलेली असल्यास ती शिळी व खराब असते.
करंदी – तांबुस सफेद रंगाची आणि घट्ट सालीची करंदी ताजी असते.

बांगडा – काळसर सफेद रंगाचे चमकदार व घट्ट बांगडे ताजे असतात. तोंड उघडून बघितल्यास लालसर रंगाचे दिसणारे बांगडे ताजे असतात. शिळ्या व खराब बांगड्यांना पिवळसर रंग येऊ लागतो आणि ते मऊ पडतात. बोटांनी दाबल्यास खड्डा पडतो.
बोंबील – ताजे बोंबील पांढऱ्या स्वच्छ रंगाचे, घट्ट व चमकदार असतात. त्यांच्या तोंडाच्या आतील भाग लाल असतो. बोंबील खराब व्हायला लागल्यास त्यांना पिवळसर रंग येतो.

मांदेली – पिवळसर सोनेरी रंगाची, घट्ट आणि तोंडातील भाग लाल असणारी मांदेली ताजी असते. मांदेली शिळी किंवा खराब होऊ लागल्यास तिला नारिंगी रंग येऊ लागतो आणि त्या मऊ पडतात.
बोय – काळसर चमकदार रंगाची आणि घट्ट असलेली बोय ताजी असते. जास्त मोठी बोय चवीला उग्र असते आणि तीला हिरमुस वास असतो.
ओला जवळा – ओला जवळा घेताना पांढरा स्वच्छ रंगाचा घ्यावा तो ताजा असतो.

शेवंड (लोबस्टर), खाडीतील मोठी कोळंबी – शेवंड आणि खाडीची मोठी कोळंबी विकत घेताना घट्ट आणि कडक सालीची बघुन घ्यावी.
कालवे – कालवे घेताना पांढऱ्या रंगाची, मोठी आणि ताजी पाण्यात ठेवलेलीच घ्यावीत. छोटे कालवे साफ करायला नई त्यांच्यातील दगडांची बारीक कच काढताना त्रास होतो आणि कचही जास्त असते. मोठी कालवे पटकन साफ करता येतात.

शिंपले – शिंपले घेताना काळसर रंगाच्या व तोंड मिटलेल्या घ्याव्यात. जिवंत आणि तोंडाची उघडझाप करणाऱ्या शिंपल्याही घेऊ शकता. खराब आणि शिळ्या झालेल्या शिंपल्यांची तोंडे उघडी असतात आणि ती उघडत नाहीत.
खेकडे – खेकडे घेताना काळसर रंगाचे, जिवंत आणि चालणारे बघुन घ्यावेत. खेकडे घेताना खेकड्याची पाठ दाबुन पहावी. पाठ कडक असल्यास खेकडे आतुन मांसाने भरलेले असतात. जर खेकड्याची पाठ दबली गेली तर खेकडे आतुन पोकळ असतात , त्यातुन खायला काही मिळत नाही. अमावस्येला खेकडे मांसाने भरलेले असतात तर पौर्णिमेला खेकडे आतुन पोकळ असतात असे सांगितले जाते.

रेणवे (मुडदुशा) – पांढऱ्या स्वच्छ आणि चमकदार दिसणाऱ्या मुडदुशा ताज्या असतात. त्यांच्या तोंडातील भाग लाल असतो. शिळ्या आणि खराब व्हायला लागल्यास त्यांना पिवळसर रंग येतो आणि त्या मऊ पडतात.
गोड्या पाण्यातील माशांचा ताजेपणा ओळखणे – नदीच्या किंवा तळ्यातील मासे घेणार असेल तर त्यांचे डोळे, कल्ले आणि पोटाकडचा भाग पाहुन घ्या. ताज्या माशांचे डोळे काळेशार असतात, त्यांचे कल्ले गुलाबी किंवा लाल असतात तर त्यांच्या पोटाकडील भाग पांढरा आणि थोडा घट्ट असतो.

तेव्हा आता इथुन पुढे मासे खरेदीला जाताना वरील गोष्टी लक्षात असु द्या. माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.