राज्यात नगर पंचायत निवडणुकीची धामधूम सुरू असताना शिवसेना नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या एका वक्तव्याने जळगावात नवा वाद निर्माण झाला आहे. जळगाव येथील जाहीर सभेत गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर टीका करत रस्त्यांची तुलना ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गालाशी केली. आता हेमा मालिनी यांनीच सडेतोड उत्तर दिले आहे.
गुलाबराव पाटील यांनी रस्त्यांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. हेमा मालिनी या सुप्रसिद्ध अभिनेत्री तसेच भाजपच्या नेत्या आणि खासदार आहेत. त्यामुळे गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. हेमा मालिनी यांनी अतिशय मिश्कीलपणे उत्तर दिले असून मला त्याची पर्वा नाही असे म्हटले आहे.
गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर हेमा मालिनी यांनी मिश्कीलपणे प्रतिक्रिया दिली असून, ‘मला माझे गाल प्रॉपरली आणि सेफली ठेवावे लागतील.’ लालू प्रसाद यादव यांनी काही वर्षांपूर्वी असा ट्रेंड सुरू केला होता. त्यामुळे, त्यांना वाटलं असेल असं काही, पण महिलांबद्दल असं विधान करणं चुकीचं आहे. मला या गोष्टीनं काहीच फरक पडत नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत यांनीही प्रत्युत्तर दिले
संजय राऊत म्हणाले, “अशा तुलना यापूर्वीही झाल्या आहेत. हेमा मालिनी यांच्यासाठी हा सन्मान आहे. याला नकारात्मक दृष्टीकोनातून घेऊ नये. यापूर्वी लालूप्रसाद यादव यांनीही असे वक्तव्य केले होते. आम्हाला हेमा मालिनी यांच्याविषयी आदर आहे.”
“गुलाबराव पाटील यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गालाची आणि गल्ल्यांची तुलना केली हे खरंच चुकीचं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्यावर कारवाईचे आदेश देतील का, हा मोठा प्रश्न आहे. मुख्यमंत्री नेहमीच त्यांच्या नेत्यांना पाठिशी घालण्याचं काम करतात. नगर पंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी मध्ये मतभेद आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील जनता भाजपला नक्कीच पसंती देईल, असे प्रवीण दरेकर म्हणाले.
गुलाबराव पाटील काय म्हणाले?
गुलाबराव पाटील म्हणाले, “गेली तीस वर्षे ते या मतदारसंघाचे आमदार आहेत. मात्र त्याला चांगला रस्ता करता आलेला नाही. माझ्या धरणगाव मतदारसंघात या आणि बघा हेमा मालिनी यांच्या गालासारखे सुंदर रस्ते आम्ही केले आहेत”, गुलाबराव पाटील यांच्या या विधानाला आता विरोध होत आहे.