एका श्रीमंत आणि व्यावसायिक जैन गुजराथी कुटुंबात 11 नोव्हेंबर 1885 ला जन्म झालेल्या अनुसूया साराभाई यांचे वयाच्या नवव्या वर्षीस मातृपितृ छत्र हरवले. काकांच्या बळजबरीने वयाच्या 13 व्या वर्षी त्यांच्या अनिच्छेने झालेल्या विवाहातुन रजा घेवून अनुसूयाबेननी 1912 मध्ये इंग्लंडला मेडिकल डिग्री घेण्यासाठी प्रयाण केले. पण अभ्यासक्रमाचा भाग असलेले प्राण्यांचे विच्छेदन हे जैन धर्मात मान्य नसल्याने त्यांनी लंडन स्कूल ऑक इकॉमिक्समधून शिक्षण घेतले. इंग्लंडमध्ये शिकताना समाजवादी विचारसरणीच्या फ़ेबीयन चळवळीचा व महिला मताधिकार हक्काकरिता लढणा-या सफ़्रागेट चळवळींचा त्यांचेवर मोठा प्रभाव पडला.
आयुष्य वंचितांच्या हक्कांसाठी समर्पीत करण्याचा वसा घेवून त्यांनी इंग्लंडमधील शिक्षण अधुरे सोडून भारतभुकडे प्रयाण केले. स्वदेशी परतल्यानंतर त्यांनी समाजातील गरजू पिडीत विद्यार्थ्यांकरिता शाळा सुरु केली व महिलांच्या प्रश्नांबाबत कार्य सुरु केले. महिलांकरिता बचतगट, स्वच्छतागृहे, मागासवर्गीय मुलींकरिता वसतीगृहे ही आज आपण बघत असलेल्या चळवळींकरिता त्या आजपासून 100 वर्षांपुर्वी सजग होत्या. अनुसूयाबेन यांचे बंधू अंबालाल साराभाई त्याकाळी कापड व्यवसायातील मोठे प्रस्थ होते, त्यांच्या स्वत:च्या अनेक कापड गिरण्या होत्या. त्यामुळे अनुसूया साराभाई कापडगिरण्यांमधील कामागारांबाबत अतिशय जवळून निरिक्षण करित.
एकदा त्या घराबाहेर बसलेल्या असताना काही महिला गिरणी कामगार अत्यंत अस्वस्थ पद्धतीने रस्त्यावरुन जात असताना त्यांना आढळल्या. माहितीअंती त्यांना समजले की कापड गिरण्यांमधील महिला कामगारांना तेव्हा सलग 36 तासांची ड्युटी करावी लागे. हा अमानवीय प्रकार ऐकुन त्यांचे मातृहृदयी मन कळवळून आले. तेथुनच त्यांनी कामगार आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. ही घटना 1914 ची होती. कापडगिरणी व्यवसायातील कामगारांचे त्यांनी संघटन उभे करण्यास सुरुवात केली. प्लेगच्या साथीमुळे कामगारांना होत असलेल्या अडचणींमुळे कामगारांनी अनुसूयाबाईंना त्यांच्या समस्या गिरणीमालकांकडे मांडण्याची विनंती केली. ही जबाबदारी त्यांनी शिरावर घेवून कामगारांना त्यांचे हक्क मिळवून दिले. कामगारांच्या समस्यांकरिता सदैव तत्पर असण्याच्या त्यांच्या गुणविशेषामूळे त्या ‘मोटीबेन’ म्हणजेच मोठी बहीण या आदरार्थी विशेषणाने ओळखल्या जात.
पुढे 1918 मध्ये कामगारांच्या वेतनातील 50 टक्के वाढीकरिता अनुसूयाबेन यांच्या नेतृत्वातील उपोषणामध्ये महात्मा गांधी यांनी देखील सहभागी होत समर्थ सहकार्य केले. कापडगिरणी मालकांच्या संघटनेचे अध्यक्ष तेव्हा अंबालाल साराभाई होते. कामगार विरुद्ध गिरणीमालक या लढ्यात गुरुतुल्य भाऊ विरुद्ध बहीण असा प्रसंग निर्माण झाल्यानंतर सुद्धा अनुसूयाबाई डगमगल्या नाहीत. अखेर गिरणीमालकांना नमते घेत कामगारांना वेतनवाढ द्यावी लागली. गिरणी कामगारांच्या या आंदोलनातील यशानंतर गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली अनुसूयाबेन यांनी भारतातील विणकर आणि महिला कामगारांच्या आंदोलनाकरिता पुढाकार घेतला. त्यांनी 1920 मध्ये अहमदाबाद येथे मजूर महाजन संघाची स्थापना केली होती. ही टेक्स्टाईल कामगारांची सर्वात जुनी संघटना आहे. या संघटनेच्या त्या तहहयात अध्यक्ष होत्या.
महात्मा गांधी यांनी 1918 मध्ये सुरु केलेल्या खेडा सत्याग्रहात अनुसूयाबेन यांनी सक्रीय सहभाग घेतला. अन्यायकारी रौकेक्ट ऍक्टला विरोध करण्याकरिता गांधीजींनी लिहीलेल्या सत्याग्रह प्रतिज्ञेवर स्वाक्षरी करण्याकरिता त्या अग्रणी होत्या. 1972 मध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. ऐश्वर्य पायाशी लोळण घेत असताना या महिलेने वंचितांच्या प्रश्नांकरिता आयुष्य खर्ची घातले. त्यांच्या या कर्तृत्वामुळेच महात्मा गांधी त्यांना ‘पुज्य’ म्हणत असत.
भारतीय अंतराळशास्त्राचे पितामह म्हणून ओळख असणा-या विक्रम साराभाई यांच्या अनुसूयाबेन ह्या आत्या होत.अनुसूया साराभाई यांच्या आज 132 व्या जन्मदिना निमित्त गुगलने डुडल प्रकाशीत करुन या मातृहृदयी महिलेचा यथार्थ सन्मान केलेला आहे. वर्षभर काही विशेष निमीत्ताने गुगल सर्च इंजीनच्या लोगोमध्ये बदल केले जातात, त्याला गुगल डूडल म्हटलं जाते. डूडलमुळे त्या व्यक्तीविशेषाबाबत नेटकरी अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करतात हा डूडलचा खरा उद्देश.
मागे सावित्रीबाई फुले यांच्या डूडलमुळे त्यादिवशी 15 लाखाहून अधिक लोकांनी एकाच दिवशी सावित्रीबाईंच्या कार्याची महत्ता जाणून घेतली. अनुसूया साराबाईंसारख्या अनेक विभुतींनी भारतीय इतिहासात त्यांच्या कार्याचा ठसा निर्माण करुन ठेवलेला आहे. गुगल डूडलसारख्या उपक्रमांमुळे अशा महामहिम व्यक्तीच्या कार्याची नविन पिढीला ओळख होते ही बाब त्या दृष्टीने महत्वपुर्ण आहे. भारतीय वंशातील अनुसूयाबेन यांचे डूडल जन्माने पाकीस्थानी असलेल्या मारीया कमर या महिलेने साकारले हे आजच्या वैश्विकीकरणाच्या काळात तेवढेच उल्लेखनीय आहे.
अनुसूया साराभाई यांना त्यांच्या जन्मदिनी सहृदय मानवंदना!
साभार: सचिन चौधरी, अमरावती, ९४२२८६९३०९
लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
जाणून घ्या गांधीजींबद्दल आपणास माहिती नसलेल्या काही अज्ञात गोष्टी
जाणून घ्या ‘मिसाईल मॅन’ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याबद्दल माहिती नसलेल्या गोष्टी