गोवा कशासाठी प्रसिद्ध आहे असं जर कुणी विचारलं तर सर्वात आधी आपल्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे गोव्यातील पर्यटनस्थळे, तिथले आकर्षक समुद्र किनारे आणि गोव्याची सुप्रसिद्ध काजू फेनी !
तिथल्या पर्यटन स्थळे आणि समुद्र किनाऱ्यांबद्दल आपल्याला बरीचशी माहिती असेल. त्यामानाने गोव्यातल्या फेनीबद्दल जास्त काही लिहलं जात नाही. त्यामुळेच गोव्याच्या जीवनशैलीचा अतूट असा भाग असणाऱ्या फेनीबद्दल लोकांना जास्त माहिती वाचायला मिळत नाही. आज आपण गोव्याची ओळख असणाऱ्या त्या काजू फेनीबद्दलच जाणून घेणार आहोत.
असा आला काजू भारतात
काजू हे तसे मूळचे ब्राझील देशातील फळ ! ब्राझीलवर पोर्तुगीजांची सत्ता असताना त्यांनी तिथे काजू लागवड सुरु केली होती. साधारणपणे ४०० वर्षांपूर्वी पोर्तुगीज भारतात आले आणि गोव्यात त्यांनी आपली वसाहत स्थापन केली.
येताना आपल्यासोबत त्यांनी काजू हे फळही भारतात आणले. काजू हे नावही पोर्तुगीज भाषेतीलच आहे. मराठी भाषेत तेच नाव रूढ झाले. गोव्याची जमीन काजु लागवडीसाठी आदर्श असल्याचे पोर्तुगीजांच्या लक्षात आले आणि त्यांनी गोव्यातच काजु लागवडीस प्रारंभ केला.
काजूपासून फेनी बनवायला सुरुवात झाली
फेनी म्हणजे आंबवलेल्या काजू पासून तयार केलेली दारू ! फेनीची आयडिया कुणाच्या डोक्यातून आली ते माहित नाही, पण पोर्तुगिज इतिहासरांच्या लिखाणामध्ये १७४० मध्ये काजु आंबवुन त्यापासुन काजु फेनी तयार केल्याचा उल्लेख सापडतो.
गोव्यात काजु लागवडीत वाढ झाल्यांनतर काजुपासून फेनी बनवण्यामध्येही वाढ झाली. गोव्यातील स्थानिकांनाही फेनीची चव आवडली आणि त्यांनी हळूहळू इतर मद्यांची जागा फेनीने घेतली. पण त्यामुळे पोर्तुगीजांच्या विलायती दारूची विक्री कमी झाली.
अशी बनवतात फेनी
संस्कृतमधल्या फेना शब्दावरूनच फेनी हा शब्द प्रचलित झाला आहे. फेना म्हणजे फेस. काजुची दारु बाटलीतुन ग्लासात ओतल्यावर चांगलाच फेस येत असल्यामुळे तिला काजु फेनी नाव प्राप्त झाले असे सांगितले जाते. फेनी तयार करण्याची पद्धत क्लिष्ट आहे. पूर्वी काजु तोडल्यावर त्यातले बी काढले जायचे आणि आणि नंतर एका खळात सगळी फळे कुटुन त्यातील रस काढला जायचा.
आताच्या काळात मशिन्सच्या साहाय्याने हे काम केले जाते. हा रस निरो नावाने ओळखला जातो. नंतर हा निरो कोडेम नावाच्या मोठ्या मडक्यात आंबवण्यासाठी ठेवला जातो. तीन दिवसानंतर या रसावरील फेस दिसायचा बंद झाल्यास तो आंबल्याचे मानले जाते. पुढच्या टप्प्यात डिस्टिलेशन प्रक्रियेने शुद्ध फेनी काढली जाते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.