हॅटट्रिक घेणे ही क्रिकेट खेळणाऱ्या कुठल्याही गोलंदाजासाठी एक स्वप्नवत कामगिरी असते. सलग तीन चेंडूत प्रतिस्पर्धी संघाचे तीन खेळाडू बाद करणे ही तशी आव्हानात्मक गोष्ट आहे. असा पराक्रम क्वचितच केलेला पाहायला मिळतो. तरीही बर्याच खेळाडूंनी हा पराक्रम करुन आपले नाव झळकावले आहे.
पण तुम्हाला माहित आहे का की वन डे क्रिकेटच्या इतिहासात सर्वात पहिली हॅट्रिक कुणी आणि कधी घेतली होती ? आजच्या २० सप्टेंबरच्या दिवशीच इतिहासात अशी कामगिरी घडली होती. पाहूया याविषयी…
या गोलंदाजाने घेतली होती वनडेमधील पहिली हॅट्रिक
आजपासून बरोबर ३७ वर्षांपूर्वी म्हणजेच २० सप्टेंबर १९८२ रोजी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज जलालुद्दीन याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात वनडे क्रिकेटमधील पहिली हॅट्रिक घेऊन इतिहास घडवला होता. आपल्या दुसऱ्याच वनडे सामन्यात त्याने ही कामगिरी करुन दाखवली होती.
त्यावेळी त्याने अगोदर ऑस्ट्रेलियाचा विकेटकिपर रॉड मार्श याला क्लीन बोल्ड केले. त्यांनतर ब्रूस यार्डली यष्टींमागे झेल देऊन बाद झाला आणि जैफ लॉसन क्लीन बोल्ड झाला. अशा पद्धतीने वनडे इतिहासात पहिल्यांदा कुठल्या बॉलरने हॅट्रिक नोंदवली.
हॅट्रिकचा आनंद एका दिवसानंतर साजरा केला
जलालुद्दीनच्या विश्वविक्रमाबाबत एक फार गंमतीदार गोष्ट घडली. वास्तविक पाहता या गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तेव्हा कुणालाच माहित नव्हते की वनडेच्या इतिहासात पहिल्यांदा अशी कामगिरी घडली आहे.
परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा वर्ल्ड रेकॉर्डस् तपासले गेले तेव्हा या बाबीचा खुलासा झाला आणि जलालुद्दीनचा आनंद द्विगुणित झाला. केवळ आठ वनडे सामने आणि सहा टेस्ट सामने खेळणाऱ्या या खेळाडूने दुसऱ्या दिवशी आपल्या हॅट्रीकचा आनंद साजरा केला.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.