नवीन मोटर वाहन कायदा देशात लागू झाला आहे. वाहतुकीचे नियम न पाळल्याबद्दल रोज कित्येक लोकांना हजारो रुपयांचा चालान दंडाच्या स्वरूपात द्यावा लागत आहे. त्यातून कुणाला ५९००० रुपयांचा दंड झाला तर कुणी आपली बाईकच जाळून टाकल्याच्या बातम्या आपल्याला वाचायला मिळाल्या.
काही काही जण तर ट्राफिक पोलिसांच्या तावडीतून वाचण्यासाठी कपाळावर गंध लावण्याऐवजी गाडीची कागदपत्रेच लावून फिरत असल्याचे मजेशीर प्रसंगही घडले. सगळ्यांना चालान होण्यापासून वाचायचे आहे. या सगळ्यामध्ये आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे किती गरजेचे आहे ते प्रत्येकाला कळून चुकले आहे. आज आपण ड्रायव्हिंग लायसन्स कसे काढायचे ते पाहणार आहोत.
ड्रायव्हिंग लायसन्स कशासाठी ?
ज्यावेळी आपण रस्त्यावर गाडी चालवत असतो त्यावेळी ट्राफिक पोलिस आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स दाखवण्याची विनंती करतात. आपल्या गाडी चालवता येते, रस्त्यावरील सर्व प्रकारच्या वाहतुकीच्या संबंधित असणाऱ्या सूचना आपल्याला समजतात आणि चौकातील सिग्नल आपल्याला कळतात हे ट्राफिक पोलिसांना अधिकृतरीत्या सांगण्यासाठी आपल्या जवळ ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक असते.
भले आपण कितीही चांगले ड्रॉयव्हर असू, पण कायदेशीर भाषेत ड्रायव्हिंग लायसन्स असल्याशिवाय आपल्याला ड्रॉयव्हर मानले जात नाही. नाहीतर आपल्याला दंड भरावा लागतो.
कसे काढायचे ड्रायव्हिंग लायसन्स ?
भारतात दोन प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स दिले जातात, लर्निंग आणि परमनंट ! लर्निंगचे लायसन्स केवळ सहा महिन्यांसाठी वैध असते. त्याची मुदत संपण्याच्या एक महिना आधीपर्यंत आपण परमनंट लायसन्ससाठी अर्ज करू शकत नाही. दोन्ही प्रकारच्या ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आपण दोन पद्धतीने अर्ज करू शकता.
ऑनलाईन पद्धत : सर्वप्रथम parivahan.gov.in वेबसाईटवर जाऊन Driving License Related Services हा पर्याय निवडा. त्यानंतर आपले राज्य निवडा. Apply Online बटनावर क्लीक करून त्यातील New Learners Licence पर्याय निवडा. त्यांनतर दिलेल्या पायऱ्यांमध्ये आपली माहिती भरत जा.
त्यामध्ये Fill Applicant Details, Upload Documents, Upload Photo and Signature, LL Test Slot Booking, Payment of Fee अशा पायऱ्या आहेत. परमनंट लायसन्ससाठी Fill Applicant Details, Upload Documents, Upload Photo and Signature if required (applicable for only some states), DL Test Slot Booking (applicable for only some states), Payment of Fee अशा पायऱ्या आहेत. शेवटी अर्ज भरून झाल्यावर प्रिंट घ्यावी. त्यानंतर आपल्याला अर्ज क्रमांक SMS येईल, त्यावरून आपल्या अर्जाची सद्यस्थिती पाहता येईल.
ऑफलाईन पद्धत :
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आपल्याला जवळच्या RTO ऑफिसमध्ये जावे लागेल. तिथून फॉर्म क्रमांक ४ घ्या. हा फॉर्म राज्य परिवहनच्या वेबसाइट वरुनही डाउनलोड करता येईल. त्या फॉर्मवर दिलेली सर्व माहिती भरून घ्या. त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा. सर्व झाल्यावर हा भरलेला अर्ज आपल्या संबंधित आरटीओच्या ज्या कार्यलयाच्या कार्यक्षेत्रात आपला पत्ता येतो, तिथे हे सगळे जमा करावे. अर्ज सबमिट झाल्यानंतर आपल्याला तसा SMS येईल.
ड्रायव्हिंग चाचणी
ड्रायव्हिंगच्या टेस्टच्या दिवशी RTO ऑफिसला जाऊन आपली टेस्ट देऊन यावी. यावेळी आपल्याला गाडीही चालवावी लागते. तसेच बहुपर्यायी प्रश्नपत्रिकाही सोडवावी लागते. यामध्ये ड्रायव्हिंग संबंधी वेगवगेळी चिन्हे ओळखणे वगैरे प्रश्न असतात.
गाडी चालवण्याची टेस्ट दोन सत्रात होते. ग्राउंड टेस्ट आणि रोड टेस्ट ! ही टेस्ट मोटर वाहन इन्स्पेक्टरसमोर द्यावी लागते. त्यांनी तुम्हाला पास केले तरच तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मिळेल, अन्यथा परत आपल्याला टेस्ट द्यावी लागेल.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.