माझ्याकडून काही चूक झाल्यास माझा रायगडच्या टकमक टोकावरून कडेलोट करा अशा प्रकारचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ६ जून २०१६ रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ठिकाणी केले होते. मागच्या काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाने राज्यातील काही किल्ले हेरिटेज हॉटेल आणि लग्न कार्यालयासाठी खाजगी विकासकांना भाड्याने देण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानंतर सरकारच्या या निर्णयाला गडकिल्लेप्रेमी संस्था आणि लोकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर गडकिल्लेप्रेमी युवतीने मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचा कडेलोट केला.
कोण आहे ही युवती ?
पूजा झोळे असे या गडकिल्लेप्रेमी युवतीचे नाव असून ती मूळची करमाळ्याची आहे. सध्या ती पुण्यात शिक्षणासाठी वास्तव्यास आहे. असून ती मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्न, गडकिल्ले संवर्धन अशा वेगवेगळ्या विषयांवर सातत्याने सरकारला जाब विचारण्याचे काम करते.
काही दिवसांपूर्वी कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांच्या सभेत घुसून तिने पिकविम्याबाबत त्यांना जाब विचारला होता. या युवतीने सिंहगड किल्ल्यावरून मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचा कडेलोट केल्याचा व्हिडीओ आपल्या फेसबुक वॉलवरून शेअर केला आहे.
…आणि फडणवीसांचा कडेलोट केला !
आपल्या व्हिडिओमध्ये पूजा म्हणते, “शिवाजी महाराजांनी पराक्रमाने गडकिल्ले कमावले. ज्या गडकिल्ल्यांवर आपल्या पूर्वजांनी रक्त सांडले. स्वराज्य निर्माण केलं. असे किल्ले हे फडणवीस सरकार भाड्याने द्यायला लागलंय..लग्न समारंभासाठी आणि हॉटेलसाठी !
बरोबर आहे आपण भाड्यांकडून काय अपेक्षा करणार ? काय कळणार आहेत त्या शनिवारवाड्याला रायगडाच्या आणि सिंहगडाच्या वेदना ? फडणवीस साहेब तुम्हाला बायका नाचवायच्या असतील तर तुमच्या वर्ष बंगल्यावर नाचवा. तुमच्या शनिवारवाड्यावर नाचवा.
आमच्या किल्ल्यांवर होतात ती फक्त युद्ध ! अशी युद्ध ज्यांचा इतिहास रचला जातो आणि असा इतिहास जो आम्ही अभिमानाने सांगतो. ऐकणाऱ्याच्या अंगावरती शहारे निर्माण होतात. फडणवीस साहेब हा निर्णय तुम्ही लवकरात लवकर मागे घेतला पाहिजे आणि समंध शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे.
कारण हे गड, किल्ले म्हणजे आमच्या अस्मिता आहेत, आमचा इतिहास आहे. तुम्ही जो निर्णय घेतलाय त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शत्रूला आणि वाईट कृत्य करणाऱ्याला शिक्षा दिली जायची, कडेलोट केला जायचा; त्याप्रमाणे आज या सिंहगडाच्या कड्यावरून आम्ही तुमचा कडेलोट करतोय…”
व्हिडीओ बघा :
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.