डॉ.मेधा खोले या पुणे येथील भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या उपसंचालक (हवामान अंदाज) म्हणुन कार्यरत आहेत. त्या उच्चशिक्षीत आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत त्या उत्तीर्ण आहेत. भारतीय मान्सुनवर “एल निनो आणि ला नीना”चा होणारा परिणाम यावर त्यांचा अभ्यास आहे. परंतु दुर्दैवाने इतक्या उच्चशिक्षित असताना, इतक्या मोठ्या पदावर कार्यरत असताना सुद्धा आपल्या सोवळ्याओवळ्याची विषमता पाळण्याने समाजावर काय परिणाम होतो याबाबत बाईंचा अडाणचोटपणा प्रकर्षाने दिसुन येत आहे. आजकालची सुशिक्षित तरुण पिढी जातपात, स्पृश्य-अस्पृश्यता, सोवळं-ओवळ्यातील विषमता पाळत नाही असे जे सगळीकडे बोललं जातं, ते किती बकवास असतं याला बाईंच्या वागण्याने दुजोराच मिळाला म्हणायचा.
“मिळालेल्या माहितीनुसार निर्मला यादव (वय ६६) या मराठा समाजातील महिला असुन धायरी येथे केटरिंगचा व्यवसाय करतात. त्या विधवा आहेत. मराठा क्रांती मोर्चात त्यांनी योगदान दिले होते.
डॉ.खोले बाई यांना त्यांच्या घरी धार्मिक कार्यक्रमांसाठी “सोवळ्यातील” स्वयंपाक करणारी ब्राह्मण महिला हवी होती. खोले बाईंनी त्यांच्या परिचयाच्या “जोशी” नामक एका गृहस्थाकडे याबाबत विचारणा केली. यादव या अनेक धार्मिक कार्यक्रमांत स्वयंपाक करत असल्याने जोशींचा त्यांच्याशी परिचय होता. धार्मिक कार्यांसाठी स्वयंपाक करणारी एक महिला आपल्या परिचयाची आहे अशी माहिती जोशींनी खोले यांना दिली. त्यानुसार मे २०१६ मध्ये जोशींच्या सांगण्यावरुन यादव या डॉ.खोलेंच्या घरी गेल्या. त्यांना आपल्याबद्दल सांगितले. या माहितीवरुन खोले बाईंनी धायरी येथे त्यांच्या घरी जाऊन खात्री केली व आपल्या घरातील धार्मिक कार्यक्रमांच्या स्वयंपाकासाठी बोलावले. तेव्हापासुन यादव यांनी खोले बाईंच्या घरी एकुण सहा वेळा वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमात स्वयंपाक केला.
मागच्या काही दिवसांपुर्वी जोशी व यादव यांच्यात काही कारणावरुन खटका उडाला. त्यानंतर ६ सप्टेंबर २०१७ रोजी जोशींनी खोले बाईंच्या घरी येऊन तुमच्याकडे धार्मिक कार्यक्रमाचा स्वयंपाक करणारी महिला ब्राह्मण नसुन मराठा असल्याचे सांगितले. हे ऐकुन खोले बाईंना राग आला आणि त्यांनी धायरी येथे घरी जाऊन निर्मला यादव यांची चौकशी केली. आमच्याकडे फक्त ब्राह्मण स्त्री स्वयंपाकाला चालते, मग तुम्ही ब्राह्मण नाही हे का सांगितले नाही असा जाब विचारला आणि मारहाण करण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर खोले बाईंनी पोलिस स्टेशन गाठले व तिथे याबद्दल फिर्याद दिली.
अशा प्रकरणाची तक्रार कशी दाखल करुन घ्यावी हे पोलिसांना समजत नव्हते. खोले बाई हट्ट धरुन बसल्या. तक्रार करु नये यासाठी पोलिस व प्रतिष्ठित लोक खोले बाईंना विनंती करत होते, मात्र खोले बाई काही ऐकुन घ्यायला तयार नव्हत्या. शेवटी दबावाखाली येऊन पोलिसांनी कलम ४१९ (फसवणुक करणे), कलम ३५२ (हल्ला करणे) व कलम ५०४ (धमकी देणे) अशी कलमे लावुन निर्मला यादव यांच्यावर गुन्हा नोंदवला…”
एवढं वाचल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की यात निर्मला यादव यांची काय चुक ? जोशी नावाच्या गृहस्थाने खोले बाईंना अपुर्ण माहिती दिली, त्या अपुर्ण माहितीची अपुर्ण खातरजमा करुन खोले बाईंनी यादव यांना काम दिले. त्यांनीही खोले बाईंच्या स्वयंपाकाच्या कामाशी मतलब ठेवुन बाकीच्या गोष्टीशी संबंध न ठेवता काम केले. तरीही निर्मला यादव यांच्यावर गुन्हा ?
याला वर्णवर्चस्वाची मानसिकता म्हणतात. यादव नावाच्या मराठा स्त्रीने बनवलेला स्वयंपाक खोले नावाच्या ब्राह्मणांनी खाल्ल्याने यांचे सोवळं मोडते. ठीक आहे खोले बाई ! एवढ्याने जर तुमचं सोवळं मोडत असेल तर मग तुमच्या घरी येणारा किराणा, भाजीपाला, फळे, दुध, प्रोसेस्ड खाद्यपदार्थ, धार्मिक कार्यासाठी लागणाऱ्या वस्तु कुणाकुणाच्या हातच्या कुठल्याकुठल्या प्रक्रियेतुन तुमच्यापर्यंत पोहोचत असतील याचा विचार करा ? त्याने तुमचे सोवळं मोडत नाही का ? धार्मिक स्वातंत्र्य जरुर पाळा. घटनेने दिलेला तो अधिकार आहे. परंतु आपल्या आपल्या स्वातंत्र्याचा अर्थ कुणावर तरी वर्णवर्चस्व गाजवणे असा घेऊन तुम्ही घटनेची मुल्ये पायदळी तुडवत आहात.
प्रशासकीय पदावर राहुन घटनेची पायमल्ली करणाऱ्या, जातीभेद पाळणाऱ्या बेजबाबदार व मग्रुर डॉ.मेधा खोलेंचे तात्काळ निलंबन व्हायलाच हवे…
अवश्य निलंबन व्हायला पाहिजे