बुलेट गाडी म्हणलं की रुबाबदार पुरुषच बसून गाडी चालवत असणार असे काहीसे चित्र पटकन आपल्या डोळ्यात येते. पैलवान असो किंवा आर्मी, पोलिसातील जवान, बुलेट हीच त्यांची प्राथमिक पसंती असते. अनेक वर्ष बुलेटवर पुरुष वर्गाची मक्तेदारी राहिली. पण आता अलीकडच्या काळामध्ये बुलेट चालवण्यात महिलाही मागे नाहीत. मुलीही आता रुबाबात बुलेटची राईड करत आहेत.
या सगळ्यांमध्ये गुढीपाडव्याच्या मिरवणुकीत बुलेट राईड करणाऱ्या एका सुंदर युवतीचा फोटो आपण अनेकदा पाहिला असेल. वर्तमानपत्रातही या युवतीचा बुलेट चालवतानाचा फोटो दरवर्षी पाहण्यात येत असतो. मराठमोळी वेशभूषा आणि आभूषणे घालून बुलेट चालवणारी ही सुंदर युवती आहे तरी कोण असा प्रश्नही आपल्याला पडला असेल. आज आपण त्याच युवतीविषयी जाणून घेणार आहोत.
कोण आहे ती बुलेटराणी ?
दरवर्षी गुढीपाडव्याच्या मिरवणुकीत बुलेट चालवतानाच्या फोटोत दिसणाऱ्या त्या सुंदर युवतीचे नाव आहे डॉ.अपर्णा बांदोडकर ! मुंबईतील गिरगावमध्ये निघणाऱ्या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेचा चेहरा म्हणून अपर्णा प्रसिद्ध आहेत. २०१३ पासून त्या या शोभायात्रेतील आदिशक्ती रॅलीचे प्रतिनिधित्व करतात.
सुरुवातीला या शोभायात्रेत त्या एकट्याच बुलेट चालवणाऱ्या महिला होत्या, पण दरवर्षी वाढ होत होत आता ५० हुन अधिक बुलेट चालवणाऱ्या महिला गिरगावच्या या शोभायात्रेत बघायला मिळतात. यानिमित्ताने मुली बाईक्स चालवण्याचे कौशल्य आत्मसात करत आहेत ही अपर्णा यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण गोष्ट आहे.
डॉ.अपर्णा बांदोडकरांची बिजली बुलेट
डॉ.अपर्णा आपल्या वडिलांच्या प्रोत्साहनाने वयाच्या तेराव्या वर्षीच बुलेट चालवायला शिकल्या. लहानपणापासूनच त्यांना पर्यटन, ऍडव्हेंचरची आवड होती. स्वतःच्या पायावर उभ्या झाल्यावर त्यांनी स्वतःची बुलेट घेतली. या बुलेटला त्यांनी “बिजली” असे नाव दिले. या बिजलीचा सोबतीने त्यांनी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, एवढेच नाही तर अगदी प्रत्येकाची ड्रीम राईड असणाऱ्या लडाखची देखील राईड केली आहे. त्यांना केवळ बाईकचा चालवणेच माहित नाही, तर बाईकर्स म्हणून कुठे अडचणींचा प्रसंग आला तर त्याला तोंड देण्याचे कसबही माही आहे.
बीबीसीने घेतली दखल
पर्णा यांचे बुलेटप्रेम लग्नानंतरही कमी झाले नाही. सासरच्या मंडळींनीही त्यांच्या या बुलेटप्रेमाला तितकीच मनापासून दाद दिली. स्वतः व्यवसायाने डेन्टिस्ट असणाऱ्या डॉ.अपर्णा यांनी आपल्या दवाखाना, घर आणि आपल्या छंदाचा समतोलही तितकाच समर्पकपणे सांभाळला आहे.
त्यांची ही बुलेट पॅशन पाहून दस्तुरखुद्द BBC World यांनी त्यांची दाखल घेतली आणि डॉ.अपर्णा बांदोडकर यांच्यावर दोन-अडीच मिनिटांची डॉक्युमेंट्रीही बनवली होती. गुढीपाडव्याच्या मराठमोळ्या परंपरेला आधुनिकतेचा स्पर्श करत त्यांनी जपलेल्या या उपक्रमाला आमच्या मनापासून शुभेच्छा !