राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागुन १० दिवस झाले तरी सत्तासंघर्षाचा खेळ संपायला तयार नाही. कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने युती किंवा आघाडी करुनच सरकार स्थापन करावे लागणार आहे.
भाजप आणि शिवसेना युती झाल्यास स्पष्ट बहुमतात युतीचे सरकार येईल, पण भाजप-सेनेत मुख्यमंत्री पदावरुन एकमत होत नाही. शिवसेना अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळावे या मागणीवर ठाम आहे, तर भाजप पाच वर्षे मुख्यमंत्री पदावरील दावा सोडायला तयार नाही. मुख्यमंत्रीपदाच्या निर्णयावर काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष लक्ष ठेऊन सावध आहेत.
शपथविधीसाठी भाजपने केले वानखेडे स्टेडियम बुक
देवेंद्र फडणवीसांनी “मी पुन्हा येईन” म्हणत निवडणूक काळात दंड थोपटले होते. परंतु शरद पवारांनी जोरदार प्रत्युत्तर देत फडनवीसांच्या “मी पुन्हा येईन” डायलॉगला “शिवसेनेने ठरवले तरच मी पुन्हा येईन” या पातळीपर्यंत आणुन सोडले आहे.
शिवसेनेच्या संजय राऊत यांनी शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळावे ही मागणी लावून धरली आहे, तर भाजपकडून सुधीर मुनगंटीवार पाच वर्षे भाजपचाच मुख्यमंत्री होणार असे आव्हान देत आहेत. दरम्यान ७ नोव्हेंबर पर्यंत सरकार स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या त्यांच्या विधानामुळे प्रकरण आणखी तापले आहे.
एका बाजूला मुख्यमंत्री पदावरून भाजप – शिवसेनेत रस्सीखेच सुरु असताना भाजपच्या नेत्यांनी शपथविधीसाठी वानखेडे स्टेडियम बुक करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे शिवसेना आपला हट्ट सोडून देईल काय असा प्रश्न अनेकजण उपस्थित करू लागले आहेत.
सरकारस्थापनेबाबत कोणतीही चर्चा झाली नसताना ५ नोव्हेंम्बर रोजी वानखेडे स्टेडियमवर शपथविधी कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. पोलीस आणि अधिकाऱ्यांनी त्यासंदर्भात स्टेडियमची पाहणी करण्यात आल्याचे वृत्त आहे. “उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग” ही म्हण यानिमित्ताने प्रत्ययाला येत असल्याचे चित्र आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.