भारत हा जगातला सर्वात मोठा लोकशाही देश आहे. लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवले जाणारे राज्य म्हणजे लोकशाही अशी या लोकशाहीची आपल्याकडे व्याख्या केली जाते. एक व्यक्ती एक मत या न्यायाने लोकशाहीत सर्वांच्या मताला सामान मूल्य देण्यात आले आहे. भारतात १८ वर्षे पूर्ण असणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकास मतदान करण्याचा अधिकार आहे. परंतु हा अधिकारच हिरावून घेतला तर ? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत हा प्रकार घडला होता.
नेमकं काय घडलं होतं ?
हि गोष्ट १९८७ सालची आहे. त्यावेळी विलेपार्ले मतदारसंघातील काँग्रेस आमदार हंसराज भुग्रा यांचे निधन झाल्याने त्यांच्या रिक्त असणाऱ्या जागेसाठी पोटनिवडणूक लागली होती.
शिवसेनेने डॉ.रमेश प्रभू यांना मैदानात उतरवले होते, तर काँग्रेतर्फे प्रभाकर कुंटे यांना उमेदवारी देण्यात आली होती. डॉ.रमेश प्रभू हे तत्कालीन मुंबईचे महापौर होते, तर प्रभाकर कुंटे हे त्यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्रातील एक दिग्गज नाव होते. याच पोटनिवडणुकीत बाळासाहेबांनी पहिल्यांदा हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करुन “गर्व से कहो….” चा नारा दिला.
बारा वर्षानंतर बाळासाहेबांवर बंदी
विलेपार्ले पोटनिवडणुक गाजली ती बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे ! त्या मुद्द्यासमोर कुंटेंचा निभाव लागला नाही आणि ते पराभूत झाले. त्यांनी निवडणुकीच्या निकालाला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. धर्माच्या नावावर मते मागितल्याचा बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांवर त्यांचा मुख्य आरोप होता. हा खटला बारा वर्षे चालला.
उच्च न्यायालयाने बाळासाहेबांना दोषी मानले. त्या निर्णयाच्या आधारे निवडणूक आयोगाने १९९९ मध्ये बाळासाहेबांवर सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्याची आणि मतदान करण्याची बंदी घातली. त्यानंतर २००७ साली झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत बाळासाहेबांनी मतदानाचा हक्क बजावला.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.