बाळासाहेबाच्या ह्या आदेशामुळे दादा कोंडके सगळ्यापर्यंत पोहचले..

दोन प्रतिभावान व्यक्ती, अर्थातच दोन तलवारी एकाच म्यानात फार काळ राहात नाहीत, असे म्हणतात. पण अभिनयसम्राट दादा कोंडके आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री याला अपवाद ठरली. बाळासाहेबांचे मराठी विषयाचे प्रेम आणि रसिकता यामुळे त्‍यांच्‍यात आणि दादांमध्‍ये विशेष जवळीक होती. दोघांमध्ये एक समान दुवा. तो म्हणजे भाषेवरची हुकमत आणि जनमानसाच्या मनाचा ठाव घेणारा हजरजबाबीपणा.

चित्रपट मुंबईमध्‍ये लावण्‍यात यावा यासाठी बाळासाहेबांनी शिवसैनिकांना ‘मराठा मंदिर’ वर राडा करण्‍याचा आदेश सोडला होता. दादा कोंडके यांचा आज जन्‍मदिवस आहे. त्‍यानिमित्‍त बाळासाहेब आणि दादा कोंडके यांच्‍यातील हा किस्सा आपण जाणून घेऊयात. साधारण १९७३-७४चा तो काळ. त्या काळात मराठी मानूस चित्रपट सृष्टीत असला तरीही, त्यावर अधिकाराज्य होते ते हिंदी भाषकांचेच. त्यामुळे मराठी मानसाचे बॅनरवाले चित्रपट वगळता इतरांचे चित्रपट थिएटरला लावायला थिएटर मालकांचा नकार असे. त्यात ‘सोंगाड्या’ हा दादांचा पहिलाच चित्रपट. दादांना चित्रपट प्रदर्शीत करण्याचा ना अनुभव होता ना त्यांच्याकडे पैसा होता. त्यामुळे ‘कोहिनूर’ चित्रपटगृहाच्या मालकाने दादांचा चित्रपट प्रदर्शीत करण्यास नकार दिला. दादांचा ‘सोंगाड्या’ आणि ‘एकटा जीव..’ भारतमातामध्‍येच लागले, पण फार कमाई झाली नाही. त्याचे कारण म्हणजे हे थिएटर लहान, त्यात तिकीट दीड रुपया अन् अडीच रुपये होते.

राम राम गंगाराम’ च्या वेळी दादांना दादरचे मराठा मंदिर हवे होते, पण मराठा मंदिरचा पारशी मालक त्यासाठी तयार नव्‍हता. त्याचवेळी ‘हाथी मेरे साथी’ आणि ‘बॉबी’ हे दोन सिनेमे प्रदर्शित होणार होते. दादांनी मराठा मंदिरचा मालक फिरदोस तारापोरवाला बरोबर चार महिने आधी ‘मॉर्निंग शो’चा करार केला होता. पण करारानंतरही तारापोरवाल्‍याने दादांकडे पाठ फिरवली. दादांचा पहिलाच चित्रपट प्रदर्शनासाठी थिएटर न मिळाल्यामुळे रखडतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली.दादांनी तारापोरवाल्याला थिएटरवर जाऊन हात जोडले, पण तो ऐकून घेत नव्‍हता. तारापोरवाल्याने गुंड बोलावले. दादांना बाहेर काढले. मग दादा थेट बाळासाहेबांकडे गेले. दरम्यान, मुंबईत शिवसेनेचा बोलबाला वाढत होता. दादांनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. मराठी मानसाचा चित्रपट प्रदर्शीत करायला थिएटरमालक नकार देतो. ही गोष्ट बाळासाहेबांना खटकली.

बाळासाहेब आपल्‍या खास शैलीत म्‍हणाले होते, ‘रडताय काय असे, त्या तारापोरवाल्याचा पायजमा फाडून तुमच्या हातात देतो. थांबा जरा. बाळासाहेबांनी लगेच छगन भुजबळ आणि मोहन रावलेंना बोलावून घेतले. आत्ताच्या आत्ता त्या पारश्याला उचलून माझ्यापुढे आणा आणि मराठा मंदिरवरचे बॉबीचे पोस्टर काढा, असा आदेश दिला. अर्ध्याच तासात मोहन रावळेंनी तारापोरवाल्याला बखोटीला धरून साहेबांपुढे आणले. तिकडे भुजबळांनी पोस्टर उतरवले होते.

बाळासाहेब ठाकरे यांनी तारापोरवाल्याला कडक शब्दात सुनावले. ‘चर्चा नको, दादा कोंडकें यांचा सिनेमा लावायचा! कळलं.. अन् फक्त मॉर्निंग नाही, चारही शो! मी सांगेपर्यंत सिनेमा उतरवायचा नाही! नाही तर तुला तुझ्या थिएटरसकट उतरवीन! बाळासाहेब म्हणाले होते, ‘चला निघा आता!’ पारशी उठला. पार गळपटला होता. रावळेंनीच त्याला धरून बाहेर आणले. मराठा मंदिरला सिनेमा लागला अन् अक्षरश: धो धो चालला.

स्पर्धेतले बॉबी अन् हाथी मेरे साथी सुपर हिट झालेच, पण राम राम गंगाराम सिल्व्हर ज्युबीली हिट झाला. त्यावेळी टॅक्स फ्रीची भानगड नव्हती. या चित्रपटानेच दादांना कमाई आणि प्रसिद्धी दिली. हा सिनेमा सिल्व्हर ज्युबीली हिट झाल्यावर स्पेशल शोला बाळासाहेब ठाकरे देखील आले होते. त्यावेळी तारापोरवाला याने दादांना मिठी मारून आता यापुढे दादाचा प्रत्‍येक सिनेमा आपण आधी लावणार अशी ग्वाही बाळासाहेबांना दिली होती.

बाळासाहेबांच्या आदेशाने ‘सोंगाड्या’ ‘कोहिनूर’ला झळकला त्या दिवसापासून दादा, शिवसेना आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नाते घट्ट झाले. इतके की, बाळासाहेब जेव्हा नाराज असत तेव्हा त्यांच्या खोलीत एकाच मानसाला प्रवेश असे, ते म्हणजे दादा कोंडके. बाळासाहेबांनीही दादांची मैत्री अखेरपर्यंत सांभाळली. इतकी की दादांचे निधन झाल्यावर बऱ्याच वर्षांनी शिवतिर्थावर अखेरचे भाषण करतानाही बाळासाहेबांनी दादा कोंडके यांची आठवण काढली होती.

किस्सा आवडल्यास अवश्य शेअर करा…

वाचा दादा कोंडके यांच्या बाबत अपरिचित गोष्टी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.