ज्यांच्याशिवाय भारतीय राजकारण पूर्ण होऊ शकत नाही त्यापैकी एक धुरंदर व्यक्तीमत्त्व म्हणजे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब जसे आपल्या निपूण राजकारणासाठी आणि वक्तृत्वासाठी ओळखले जातात, तसेच त्यांच्या धक्कातंत्रासाठी देखील ते चांगलेच ओळखले जात. बाळासाहेबांच्या हयातीत आणि नंतर अनेकांनी शिवसेना सोडली, पण दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरेंनीच शिवसेना पक्षातून राजीनामा देण्याचे धक्कातंत्र वापरले होते हे किती जणांना माहित आहे ?
प्रकाश अकोलकर यांनी लिहलेल्या “जय महाराष्ट्र हा शिवसेना नावाचा इतिहास आहे” या पुस्तकात या घटनांबाबत उल्लेख करण्यात आला आहे.
१९६६ साली बाळासाहेबांनी शिवसेना या पक्षाची स्थापना केली होती. पंरंतु त्यांच्याच कारकीर्दीत त्यांनी दोनदा आपला पक्ष सोडण्याचे जाहीर केले होते. परंतु बाळासाहेब हे शिवसैनिकांसाठी देव झाले होते आणि शिवसैनिक आपल्या देवाला सोडायला तयार नव्हते.
पहिला प्रसंग
१९७८ साली विधानसभा निवडणूकीत पराभव मिळाल्याने त्याच वर्षी होणार्या मुंबई महानगर पालिकेची निवडणूक बाळासाहेबांनी प्रतिष्ठेची केली होती. “जर या निवडणूकीत शिवसेनेला यश मिळाले नाही, तर मी शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा देईन” असे बाळासाहेबांनी जाहीर केले होते. परंतु आणिबाणी नंतर जनता पक्ष जोमात होता. मुंबईकरांनी शिवसेनेऐवजी जनता पक्षाला साथ दिली.
१९७३ साली पालिका निवडणूकीत शिवसेनेचे ४० नगरसेवक निवडून आले होते, परंतु १९७८ साली ही संख्या निम्मी होऊन २१ वर आली. यानंतर शिवाजी पार्कात झालेल्या सभेत बाळासाहेबांनी “मुंबई पालिकेवर भगवा फडकवण्यात मी अपयशी ठरलो. लोकांची माझ्यावर निष्ठा राहिली नाही. मी शब्दाला जागणारा मी माणूस आहे, म्हणून मी पक्षाचा राजीनामा देतो” असे म्हणून उपस्थित शिवसैनिकांना धक्का दिला. सर्व शिवसैनिकांनी त्यांची प्रचंड मनधरणी केल्यानंतर बाळासाहेबांनी आपला शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला.
प्रसंग दुसरा
१९९२ साली जेव्हा शिवसेनेमध्ये राज आणि उद्धव ठाकरे यांचे वर्चस्व वाढायला लागले होते, तेव्हा ज्येष्ठ शिवसैनिक माधव देशपांडे यांनी बाळासाहेंबांवर घराणेशाहीचा आरोप करत शिवसेनेत कशा पद्धतीने कुणालाच मोठं होऊ दिलं जात नाही याचा पाढा वाचला. त्यांनी एक पुस्तिका प्रसिद्ध करुन त्यात काही नेत्यांची जंत्रीच सादर केली आणि “बाळासाहेब कसे कण्या टाकून कोंबड्या झुंजवत” असे पुस्तिकेत नमूद केले.
याबाबत शिवसेनेतल्या नेत्यांनी आणि शिवसैनिकांनी काहीच प्रतिक्रिया न दिल्याने बाळासाहेबांचा राग अनावर झाला. त्यानंतर दुसर्या दिवशी १९ जुलै १९९२ रोजी त्यांनी सामनामध्ये एक अग्रलेख लिहला, त्याचे शीर्षक होते “अखेरचा दंडवत” आणि त्याद्वारे त्यांनी “आपण या पक्षात राहत नाही” असे जाहीर केले. या अग्रलेखानंतर शिवसेनेचे जत्थेच्या जत्थे मातोश्रीबाहेर जमले आणि बाळासाहेबांची मनधरणी करायला लागले. अखेर बाळासाहेबांनी शिवसैनिकांचे ऐकले आणि आपला पक्ष सोडण्याचा निर्णय मागे घेतला.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.